आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपात केल्यानंतर शौचालयामध्ये लावली जात असे भ्रूणांची विल्हेवाट? 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. सूरज राणा याने ज्या डॉक्टरांची नावे घेतली त्यातील आणखी एका डॉक्टरला पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. वर्षा सरदारसिंग शेवगण ऊर्फ अंजली अजय राजपूत (३८, रा. मधुबन सोसायटी, एपीआय कॉर्नर) असे या डॉक्टरचे नाव असून, ती कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे वैद्यकीय अधिकारी आहे. गर्भपातानंतर शौचालयाच्या चेंबरमध्ये भ्रूणांची विल्हेवाट लावली जात असल्याचाही संशय आहे. 

 

तपास पथकाने एपीआय कॉर्नर येथील विमल मदर केअर सेंटरवर शुक्रवारी दुपारी छापा टाकला. पाच तास चौकशीनंतर संशयावरून पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रद्धा वायदंडे व मीरा लाड यांनी डॉ. राजपूतला अटक केली. दोन पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली. राजपूतचे ओळखपत्र अद्याप सापडलेले नाही. 

 

दोन तास टाळाटाळ 
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तब्बल दोन तास डॉ. राजपूतने पोलिसांना भेटण्यास टाळाटाळ केली. तसेच डॉक्टर घरी नसल्याचे सांगा, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलिसी खाक्या दाखवताच दोन तासांनंतर डॉ. राजपूतने स्वत:चे नाव सांगितले. यानंतर पोलिसांनी डॉ. राजपूतला अटक करत रुग्णालयातील काही सामानही जप्त केले. 

 

भ्रूणांच्या विल्हेवाटीसाठी रासायनिक पदार्थ? 
डॉ. राजपूत यांच्या रुग्णालयातील तळघरात अवैध मार्गाने गर्भपात केंद्र चालवले जात असे. गर्भपातानंतर मृत भ्रूण शौचालयाच्या चेंबरमध्ये टाकले जाई. नंतर रासायनिक पदार्थ टाकून या अर्भकांची विल्हेवाट लावली जायची, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवल्याने पथकाचे कौतुक होत आहे. 

 

आतापर्यंत पाच आरोपी न्यायालयीन, तर तिघे पोलिस कोठडीत 
नऊ दविसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर डॉ. राणा व त्याच्या चालकाला शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यानंतर या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत डॉ. सुनील बाळासाहेब पोते, डॉ. नईमोद्दीन रफिक शेख यांच्यासह लॅब टेक्निशियन राजेंद्र काशीनाथ सावंत, गर्भलिंगनिदान चाचणी करण्यासाठी आलेल्या महिलेचे नातेवाईक ज्ञानेश्वर सांडू लोंढे, राहुल हरिबा गोरे, कारभारी जगन्नाथ हविाळे यांना अटक केली आहे. यापैकी पाच आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर तीन डॉक्टर आणि एका लॅब टेक्निशियनची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...