आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करत नांदेडमध्ये बंडाचा झेंडा, पंतप्रधान मोदी, शहांसोबत ऊठबस असलेल्या डॉ. तळेगावकरांचे बंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नांदेड- भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह बड्या नेत्यांसोबत ऊठबस असलेले डॉ. महेश तळेगावकर यांनी नांदेड लोकसभा निवडणूक आखाड्यात बंडाचे निशाण उभारले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षात डावलले जात असल्याची नाराजी दाखवत त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.  


डॉ. महेश तळेगावकर शहरातील प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ आहेत. संघशिस्तीत वाढलेल्या डॉ. महेश तळेगावकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने भाजपचे काम सुरू केले आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावांत मोफत आरोग्य रोगनिदान शिबिरे, मधुमेह तपासणी शिबिरे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आपल्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व  शहीद झालेल्या लष्करी जवानांच्या कुटुंबीयांना कायम मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी जिल्ह्यात संपर्क वाढवून भाजपचा प्रचार केला आहे.  


भाजप श्रेष्ठींच्या संपर्कातील कार्यकर्ता 
डॉ. महेश तळेगावकर हे महिन्यातील एक आठवडा दिल्ली येथेही वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यामुळे दिल्लीतील भाजप श्रेष्ठींशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्व. अटलबिहारी वाजपेयी, भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत स्नेहाचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे त्यांचे दिल्लीतील भाजप मुख्यालयात नेहमी राबता राहिला आहे.

 स्थानिक पातळीवर व्यवसायाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे केलेले काम आणि दिल्लीतील श्रेष्ठींशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क यामुळे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. तथापि ऐनवेळी आमदार प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली भूमिका जवळचे कार्यकर्ते, आप्त-स्वकीय, सोशल मीडियावरही स्पष्ट केली आहे.  

 

जनताच निर्णय घेईल : डॉ. तळेगावकर : मी नांदेड लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून  फॉर्म भरला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या काही वर्षांपासून प्रामाणिक कार्यकर्त्यांना सतत डावलले जात आहे. याचा मी व सर्वांनी वेळोवेळी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु सतत पक्षाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पक्षासाठी एकनिष्ठेने काम करणाऱ्या नेत्यांना बाजूला ठेवून भाजपच्या कुठल्याही विचारधारेशी बांधिलकी नसलेल्या नेत्याला उमेदवारी देण्याची परंपरा आजही कायम आहे. याचा पूर्वी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसला असतानाही उमेदवारी देणे सर्वस्वी चुकीचे आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचारासाठी २२ दिवस वाराणसीमध्ये होतो. आमचे पक्षप्रेम, मोदीभक्ती ही सत्तेवर अवलंबून नाही. चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे संघ शिक्षण लहानपणापासून अंगी असल्यामुळे आज पक्षाने दिलेल्या या उमेदवाराचा विरोध करीत मी ही लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझा निर्णय चुकीचा का बरोबर याचा आता जनताच निर्णय करेल.