आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत डॉक्टरांचा आज देशव्यापी संप, रुग्णसेवा काेलमडणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने बुधवारी (दि. ३१) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यात नाशकातील ३५०० डॉक्टर्स सहभागी होणार आहे. २४ तासांसाठी हा संप असणार असून या रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. 


मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'च्या (एमसीआय) जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करणारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक सोमवारी लोकसभेत संमत करण्यात आले. या विधेयकाला विरोध करत आयएमएने संपाची हाक दिली आहे. संपकाळात आयएमएचे सर्व सभासद आपली सेवा बंद ठेवणार आहे. बुधवारी(दि.३१) सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहपर्यंत केवळ अत्यवस्थ रुग्णच तपासले जाणार आहे. या संपात शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार असे साडेतीन हजार डॉक्टर सहभागी होणार आहे. बाह्यरुग्ण तपासणी खासगी डॉक्टरांकडून बंद ठेवण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय वैद्यकिय विधेयक श्रीमंती पोसणारे असून गरीबांवर यामुळे संकट येणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

 

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फक्त ५० टक्के जागांचे शुल्क नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण ही धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अशा इतर उपचार पद्धतीच्या पदवीधारकांना, एवढेच नव्हे तर, आरोग्य व्यवस्थेसबंधित नर्सेस यांना जुजबी प्रशिक्षण देऊन आधुनिक वैद्यकशास्त्राचा उपचार करण्याची मुभा मिळेल. सामाजिक आरोग्यसेवक अशा गोंडस नावाखाली खरेतर बोगस डॉक्टरांना कायदेशीर मान्यता देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप आयएमएने केला आहे. विधेयकानुसार वैद्यक परीषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार असून नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. ५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळेल. म्हणजे इतर राज्ये, विद्यापीठे व वैद्यकीय व्यावसायिक यांना थारा नाही. सध्या १३४ सदस्य असलेल्या परिषदेचे कार्य २५ जण कसे सांभाळतील असा प्रश्न आयएमएने केला आहे. 


शहरातील ३५० रुग्णालये राहणार बंद 
बुधवारी पुकारण्यात आलेल्या या संपात शहरातील १५५० डॉक्टरांचा सहभाग असणार असून तब्बल ३५० खासगी रुग्णालये बंद राहणार आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), सोनोग्राफी लॅब बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, अत्यावश्यक नसलेल्या काही शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहे.

 

आपत्कालीन सेवा राहणार सुरु.. 
लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला आयएमएकडून विरोध केला जात असून त्याचाच एकभाग म्हणून बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यासंपात जिल्हाभरातील ३५०० डॉक्टरांचा समावेश आहे. जिल्हाभरातील सर्व रुग्णालय बंद राहणार असून आपत्कालीन सेवा मात्र, सुरु राहणार आहे. - डॉ.प्रशांत देवरे, अध्यक्ष, आयएमए