आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dogs Eat Half Body Of Newborn Infant Dumped Dustbin, Found Near Kalmanuri Sub district Hospital

कचऱ्यात टाकून दिलेल्या नवजात अर्भकाचे अर्धे शरीर कुत्र्यांनी खाल्ले, कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ सापडले मृत अर्भक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली : कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ साडीमध्ये गुंडाळून फेकलेले मृत अर्भक गुरुवारी (ता.२६) दुपारी आढळून आले आहे. या अर्भकाच्या पोटाच्या खालील सर्व भागाचे कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे हे अर्भक स्त्री जातीचे का पुरुष जातीचे हे कळणेही कठीण झाले आहे. त्या मातेचा शोध घेण्यासाठी मागील दोन दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातून रेफर झालेल्या महिलांची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिल्या आहेत.

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ कचराकुंडी आहे. या ठिकाणी गुरुवारी साडीमध्ये गुंडाळून फेकलेले अर्भक असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक आर. व्ही. भोईटे, जमादार गणेश सूर्यवंशी, श्री. पोटे, श्री. उरेवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर अर्भक बाजूला काढले असता त्या अर्भकाच्या पोटाच्या खालील भागाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अर्भक उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अर्भक दोन दिवसांपूर्वीच जन्मलेले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात कळमनुरी पोलिस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, सदर अर्भक कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाजवळ का टाकण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. रुग्णालयातून हिंगोलीकडे रेफर केलेल्या मातेचे हे कृत्य असावे अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के. बी. श्रीवास यांनी मागील दोन ते तीन दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातून किती गरोदर महिलांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालय किंवा नांदेड येथे पाठवण्यात आले याची माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयास दिल्या आहेत. त्यानुसार प्रसूतीसाठी पुढे पाठवण्यात आलेल्या सर्व गरोदर महिलांची चौकशी केली जाणार असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले

उत्तरीय तपासणीनंतर मिळाली महत्वाची माहिती

या अर्भकाची उत्तरीय तपासणी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये सात महिन्यांतच त्या मातेची प्रसूती झाली असावी असा अहवाल रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या माहितीमुळे आता त्या मातेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अर्भक हिंगोली शासकीय रुग्णालच्या शीतगृहात ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...