सियामचा अहवाल / प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत ६.२%घट, जानेवारी २० मध्ये देशात २.६२ लाख प्रवासी वाहनांची विक्री

  • दुचाकी वाहनांची विक्री १६.०६% घटली, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १४% घसरण 
  • जानेवारीत ८.७१ लाख मोटारसायकल, ४.९७ लाख स्कूटर विकल्या

वृत्तसंस्था

Feb 11,2020 09:32:00 AM IST

नवी दिल्ली - भारतीय वाहन क्षेत्रात २०२० च्या सुरुवातीस मरगळीचा टप्पा सुरू आहे. जानेवारीत प्रवासी वाहनांच्या देशातील विक्रीत ६.२% घसरण नोंदली गेली. वाहन उत्पादकांची संघटना सियामने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली.


सियामच्या आकडेवारीनुसार, जानेवारीत देशांतर्गत बाजारात एकूण २,६२,७१४ प्रवासी वाहनांची विक्री झाली. जानेवारी २०१९ मध्ये हा आकडा २,८०,०९१ होता. या अवधीत कारची विक्री ८.१ टक्के घटून १,६४,७९३ वाहन राहिली. गेल्या वर्षी जानेवारीत १,७९,३२४ कारची विक्री झाली. सियामने सांगितले की, विविध श्रेणीतील वाहनांची विक्री जानेवारीत १३.८३ % घटून १७,३९,९७५ वाहन राहिली. सियामचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, जीडीपी वृद्धी दर
खाली राहणे आणि वाहन खरेदीच्या वाढत्या खर्चामुळे वाहन विक्रीवर दबाव कायम आहे. देशात १ एप्रिलपासून भारत स्टेज-६ उत्सर्जन मानक लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहन निर्मात्यांनी बीएस-४चे बीएस-६ मध्ये रूपांतर केले आहे. या कारणास्तव वाहनांची किंमत वाढली आहे.


दुसरीकडे, गुंतवणुकीतील वाढीमुळे अनेक कंपन्यांनी जानेवारीत वाहनाच्या किमती वाढतील. वढेरा यांनी सांगितले की, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण अर्थव्यव्यवस्थेबाबत सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणांमुळे वाहन विक्री वाढेल आणि वृद्धीला पाठबळ मिळेल, अशी आशा आहे.

दुचाकी वाहनांची विक्री १६.०६% घटली


सियामनुसार, जानेवारी महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री १६.०६ घटून १३,४१,००५ वाहने झाली. गेल्या वर्षी जानेवारीत हा आकडा १५,९७,५२८ वाहने होती. समान अवधीत मोटारसायकलची विक्री १५.१७ टक्के घटून ८,७१,८८६ वाहन आणि स्कूटरची विक्री १६.२१% घटून ४,१६,५९४ राहिली. जानेवारी २०१९ मध्ये हा अनुक्रमे १०,२७,७६६ आणि ४,९७,१६९ वाहन होते.

व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १४% घसरण


जानेवारी २०२० मध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १४.०४% घट होऊन ७५,२८९ वाहन राहिली. जानेवारी २०१९ मध्ये ८७,५९१ व्यावसायिक वाहने विकली होती. सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले, तीनचाकी वाहन श्रेणी वगळता अन्य वाहनांची ठोक विक्री घसरली आहे.ते म्हणाले, ऑटो एक्स्पोमधील प्रतिक्रिया पाहता ग्राहकांची धारणा बळकट होण्यास मदत मिळेल.


डिसेंबरच्या तुलनेत प्रवासी वाहने वाढली


जानेवारी २०१९ च्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये प्रवासी वाहनांची विक्री भलेही घटली असेल, मात्र डिसेंबर २०२० च्या तुलनेत विक्री वाढल्याचे समारे आले आहे. सियामने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये एकूण २,३८,७५३ प्रवासी वाहनांची विक्री झाली नाही. या वेळी २,६२,७१४ प्रवासी वाहने विकले. म्हणजे
यामध्ये १० टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

कोरोना विषाणूमुळे वाहनाच्या सुट्या भागाच्या पुरवठ्यावर परिणाम :

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनकडून वाहनाच्या सुट्या भागाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याबाबत भारतीय उद्योग भयभीत आहे. याची वास्तविक स्थिती चीनमधील कारखाने पुन्हा सुरू झाल्यानंतर समाेर येईल. सियामने सोमवारी ही माहिती दिली.

X