मनोरंजन जगात वर्चस्व युद्ध, अब्जावधी रुपयांची बाजी, नुकसानीचीही तयारी; केवळ दोन-तीन कंपन्याच स्पर्धेत टिकण्याची शक्यता

दिव्य मराठी

Apr 06,2019 10:02:00 AM IST

अमेरिकेतील बड्या कंपन्यांनी माध्यम आणि मनोरंजन जगाचे नवे स्वरूप घडवण्यासाठी भरपूर निधी पणाला लावला आहे. मागील वर्षी जून महिन्यापासून एटीअँडटी, कॉमकॉस्ट आणि डिस्नेने इतर कंपन्यांच्या अधिग्रहणावर २१५ अब्ज डॉलर खर्च केले. त्यांनी अनुक्रमे टाइम वॉर्नर (१०४ अब्ज डॉलर), युरोपियन ब्रॉडकास्टर स्काय (४० अब्ज डॉलर) आणि ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्सचा मोठा वाटा (७१ अब्ज डॉलर) विकत घेतला. प्रत्येक कंपनी २०२० च्या सुरुवातीपर्यंत नव्या स्ट्रीमिंग सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. व्हिडिओ सबस्क्रिप्शनद्वारे पैसा कमावणे हेच सर्वांचे ध्येय आहे. पण यातून किती कंपन्या स्पर्धेत टिकतील, हा खरा प्रश्न आहे.

हॉलीवूडचे काही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि तारकांसोबत अॅपल अनेक कार्यक्रम बनवत आहे. २५ मार्चला कंपनीने अॅपलटीव्ही प्लस ही नवी स्ट्रीमिंग सेवा लाँच केली. अॅमेझॉनही नव्या कंटेंटवर ५ अब्ज डॉलर खर्च करेल. नेटफ्लिक्स जागतिक स्तरावर १३ कोटी ९० लाखांहून अधिक सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मूळ कंटेंटवर १५ अब्ज डॉलर खर्च करेल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या सहापैकी दोनच कंपन्या बाजारात टिकून राहतील. त्या मोबाइल सेवेसारखे बिझनेस मॉडेल लागू करतील. यात एकच डिस्ट्रिब्युटर अनेक चॅनल देतो.

एटीअँडटी मोबाइल सेवेशी मनोरंजन सेवा जोडेल. कॉमकास्ट अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्ये पाच कोटी २० लाख ब्रॉडब्रँड, पे-टीव्ही कस्टमरसाठी एनबीसी युनिव्हर्सलशी जाहिरातीसह स्ट्रीमिंग सेवा देईल. डिस्ने स्टार वॉर्स आणि मार्व्हल सुपरहीरोसह यशस्वी चित्रपटांद्वारे लोकांना डिस्ने प्लसकडे आकर्षित करेल.

१० कोटी प्रमुख परिवारांसह अॅमेझॉन सध्या स्पर्धेत अॅपलच्या पुढे आहे. अॅपल नवे कार्यक्रम जगातील १.४ अब्ज डिव्हाइसद्वारे सादर करेल. एटीअँडटी, कॉमकास्ट किंवा डिस्नेच्या तुलनेत अॅपल, अॅमेझॉनकडे नगदी पैसा जास्त आहे. या कंपन्या अनेक वर्षे स्ट्रीमिंग व्हिडिओ सेवेवर अब्जावधी रुपये खर्च करू शकतात. नेटफ्लिक्स मजबूत स्थितीत आहे. त्यांच्याकडे बहुतांश लोकांकडे पोहोचण्याची यंत्रणाही आहे. पण मंदीमुळे नुकसान होऊ शकते. कारण त्यावर दहा अब्ज डॉलरपेक्षा जास्त कर्ज आहे. एटीअँडटी आणि डिस्नेला स्ट्रीमिंगमध्ये प्रगती करण्यासाठी नफ्यातील काही व्यवसाय सोडावे लागतील. एटीअँडटीचे टीव्हीतील उत्पन्न २०१६ पासून २० टक्के घटले आहे. डायरेक्टटीव्ही नाऊच्या आक्रमक मार्केटिंगमुळे कंपनीला हे नुकसान झाले. डिस्ने प्लसकडे जास्त संधी आहेत. डिस्ने थेट ऑनलाइन चित्रपट प्रदर्शित करेल. त्यांच्याकडे लुकास फिल्म, मार्व्हल स्टुडिओ आणि पिक्सर अॅनिमेशनचे चित्रपटही प्रदर्शित होतील.

X