आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: देशद्रोहाचे राजकारण नको

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नालासोपारा परिसरात ऑगस्ट महिन्यात एटीएस म्हणजे दहशतवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात बेकायदा जमा केलेला मोठा शस्त्रसाठा, गावठी बॉम्ब आणि स्फोटके पकडली. दहशत माजवण्यासाठी या स्फोटकांचा वापर होणार होता. ही कारवाई झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी हे सनातन संस्था आणि हिंदू जागृती समितीसह तत्सम संघटनांचे पदाधिकारी होते, असा आरोप झाला. अनेक हिंदू संघटनपर कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांनीच मोठा कट रचत विविध शहरांत स्फोट घडवून आणण्यासाठी हा साठा जमा केला होता, असे समोर आले होते. या प्रकरणात एटीएसने मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथून सुमारे ९ जणांना ताब्यात घेत १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. तिघा फरारी दोषींना शोधण्याचे काम सुरूच आहे. साधारण ४ ते ५ महिन्यांच्या कालावधीत प्रकरणाचा छडा लावत १२ जणांविरोधात एनआयए न्यायालयात ६ हजार ८४२ पानी आरोपपत्र दाखल केले.  


हे आरोपी सनातन संस्था, हिंदू जागृती समितीसह तत्सम संघटनांचे सदस्य आहेत. त्यांनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केल्यानुसार हिंदू राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन समविचारी युवकांची दहशतवादी टोळी निर्माण केल्याची बाब तपासात उघड झाल्याचा दावा एटीएसने या आरोपपत्रात केला आहे. या लोकांनी ही शस्त्रे कोठून मिळवली, ती कशी तयार केली, ती चालवण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले याचा एटीएस शोध घेत आहे. त्यांनी आखलेल्या कटाच्या संदर्भातील काही टिपण असलेल्या काही डायऱ्याही जप्त केलेल्या आहेत. भारत देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने या टोळक्याने हा सगळा कट रचला होता इथपर्यंत एटीएसचा तपास पोहोचला अाहे.   


एटीएसने छापा टाकून पकडलेला शस्त्रसाठा, तो बाळगण्यामागची कारणे हा देशद्रोही कावा होता,  हे प्राप्त माहिती आणि सापडलेल्या साठ्यावरून स्पष्ट होते. देशविघातक कृत्य करणारा कोणीही असो, त्याविरोधात त्याच पद्धतीने कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि या संदर्भाने झालेला तपास आणि त्यात समोर आलेल्या तथ्यानुसार न्याय देण्यासाठी आपल्याकडची न्याय यंत्रणा नक्कीच सक्षम आहे. पण जेव्हा हा प्रकार समोर आला आणि यात हिंदुत्ववादी गटाचे लोक सहभागी आहेत हे स्पष्ट झाले तेव्हा मूळ विषय सोडून भलत्याच चर्चा झडू लागल्या. सर्वप्रथम सनातनने ते आमचे साधक नाहीत, हे स्पष्ट करत त्यांच्या कृत्यांशी आमचा संबंध नाही, हे जाहीर केले. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही त्यांचे तेच म्हणणे आहे. एवढेच नाही, तर सनातनने या कारवाई आणि तपासासंदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून तपास यंत्रणा आणि जनमानसात संभ्रमाचे वातावरण तयार करण्यात हातभार लावायचे काम केले आहे. या सगळ्या घटनाक्रमाला यापूर्वी मालेगाव बॉबहल्ल्यानंतर हिंदू दहशतवाद्यांचा संदर्भ पहिल्यांदा समोर आला त्याच्यासोबत या घटनेचा संदर्भ जोडला गेला. आणि हे प्रकरण म्हणजे मालेगाव पार्ट -२ असल्याची चर्चा सुरू झाली. मालेगाव बॉबस्फोट प्रकरणात हिंदू दहशतवाद्यांच्या सहभागाचे  


ठोस पुरावे सिद्ध होऊ शकलेले नाहीत. त्यातील कथित आरोपी अनेक वर्षांनंतर जामिनावर बाहेर आलेले आहेत. देशात गेल्या काही वर्षांत पुरोगामी चळवळ चालवणारे काही लोक, लेखक यांच्या हत्या झाल्या. त्यांच्या मारेकऱ्यांच्या वेळीही सनातन आणि अशाच संघटनांशी विचाराशी संबंधित असलेल्यांची नावे समोर आली. याही प्रकरणांचा अद्याप थेट शोध लागलेला नाही. अनेक जण यंत्रणेच्या ताब्यात आहेत. अनेकांवर संशय आहे. सुनावणीही सुरू आहे. अनेकांचा या पुरोगामींना मारण्यात कसा हात होता, हे तपास यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे. तेव्हाही अशाच संस्थांचे, विचाराचे लोक यात असल्याचे समोर आले होते. त्या संस्था या सगळ्या प्रकारात आमचा काही संबंध आहे हे नाकारतात, मग यांचीच नावे का समोर येतात, हा प्रश्न राहतोच. कोणत्याही कारणाने एखाद्या व्यक्तीचा खून करणे असो किंवा मग देशविघातक कृत्य असो, तो केवळ गंभीर गुन्हाच नाही, तर तो देशद्रोह आहे. त्यात कायद्याने शिक्षेची तरतूद आहे. सापडलेली स्फोटके हजारो निष्पापांचे बळी घेणार होती हे सगळं उघड आहे. तर मग ते करणारे लोक कोण आहेत, हा मुद्दाच नसावा. अशा घटनांत तत्काळ तपास होऊन त्यांचे गुन्हे सिद्ध केले गेले आणि त्यांना शिक्षा झाली तरच या बाबींवरून होणारे राजकारण थांबेल, अन्यथा गुन्ह्यापेक्षा तो कोणी केला यावर चर्चा होत राहिल्यातर सगळेच भरकटतील. हे थांबायला हवे.

 

बातम्या आणखी आहेत...