आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको: गडकरी, 32 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- राजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे आयोजित ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी दिला. साहित्य, कला आणि इतर स्वायत्त संस्थांमध्ये राजकारण्यांनी ढवळाढवळ करूच नये, परंतु या दोघांमध्ये लोकशाहीत समन्वय असायलाच हवा, असे गडकरी म्हणाले.

 

साहित्य संमेलनाच्या उद‌्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण आयोजकांनी ऐनवेळी रद्द केले. याचा संदर्भ सरकार व भाजपशी जोडला गेल्याने उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरतो. लोकशाही व स्वातंत्र्याकरिता राजकारणी व साहित्यिकांतील संबंध आवश्यक आहेत, असे सांगून आणीबाणीच्या काळात पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांच्या सभांना तेव्हा होत असलेल्या गर्दीचा दाखला गडकरी यांनी दिला. लेखकांनी त्या काळात समाजप्रबोधन केल्याचे ते म्हणाले. म्हणूनच या दोहोंतील संबंध महत्त्वाचे ठरतात, अशी पुष्टी त्यांनी जोडली. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, साहित्य महामंडळ अध्यक्ष डॉ. विद्या देवधर, स्वागताध्यक्ष व पालकमंत्री मदन येरावार, उद्घाटक वैशाली येडे, आयोजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलतेंसह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

 

मूल्यनिष्ठ जीवनपद्धतीचे भान साहित्य-संस्कृती देेते 
मूल्याधिष्ठित जीवनपद्धती हा भारतीय समाजाचा आणि संस्कृतीचा पाया आहे. हा पाया साहित्यिक - कलावंतांनी घडवला आहे. लोकशाही शासनात मतभिन्नता असणे गैर नाहीच, ती जरूर असावी पण मनभिन्नता नसावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. माणूस म्हणून आपले जीवन घडवण्यासाठीचा दृष्टिकोन साहित्य आणि कलासंस्कृतीचे विविध घटक करत असतात. तो दृष्टिकोन मिळवण्याचे स्थान म्हणून साहित्य संमेलने महत्त्वाची आहेत, असे गौरवोद्गारही गडकरी यांनी काढले. 

- ९३व्या साहित्य संमेलनासाठी बुलडाणा जिल्ह्यातून प्रगती सार्वजनिक वाचनालयातर्फे, तर दुसरे निमंत्रण लातूर येथील जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात आले आहे. 

 

सैनिकाने घेतली ५ हजारांची पुस्तके 
केतन शेलोटकर हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीचे. सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट असलेले शेलोटकर सध्या जम्मू-काश्मीरमध्ये ड्यूटीवर आहेत. संमेलनाच्या तारखांनुसार त्यांनी सुट्या काढल्या. या संमेलनात ४ ते ५ हजार रुपयांची पुस्तके विकत घेतल्याचे शेलोटकर यांनी दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 

 

समारोप समारंभासही मुख्यमंत्री अनुपस्थित 
यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून अखेर दूर राहणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंत केले. संमेलनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांदरम्यान मुख्यमंत्री दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यग्र होते. मात्र रविवारी संमेलनाच्या शेवटच्या दिवशीही मुंबईतील कार्यक्रमास हजेरी लावण्यातच त्यांनी धन्यता मानली. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यामागे आयोजकांवर राजकीय दबाव होता, असा आरोप करत अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकला होता. 

 

गडकरींकडून वैशाली येडेंचे कौतुक 
नितीन गडकरी यांनी संमेलनाच्या उद‌्घाटक वैशाली येडे यांचा विशेष उल्लेख केला. वैशालीताईंना उद‌्घाटक म्हणून आमंत्रित केल्यामुळे संघर्षाने जीवन जगण्याचा सन्मान झाला आहे. संघर्षातूनच जगण्याची प्रेरणा मिळत असते. वैशालीताईंनी त्यांच्यावर बेतलेल्या अत्यंत वाईट प्रसंगांचा स्वीकार करत संघर्षाचा निर्णय घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. वैशाली येडे यांनी पतीच्या आत्महत्येनंतर मुलांसाठी जिद्दीने जगत असल्याचे उद‌्घाटनावेळी म्हटले होते. 
 

 

बातम्या आणखी आहेत...