आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ घाबरू नका, पुढच्या वेळी मी तुमच्यासकट येईन! विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत टाेलेबाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर रविवारी विधानसभेत बाेलताना सत्ताधारी पक्षांनी त्यांना जाेरदार काेपरखळ्या मारल्या. 'मी पुन्हा येईन' या त्यांच्या घाेषणेची खिल्ली उडवली. फडणवीस यांनीही त्याला अापल्या खास शैलीत उत्तर दिले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून ते म्हणाले, 'भुजबळ साहेब, घाबरू नका. पुढच्या वेळी आलो, तर तुमच्यासकट येतो. कारण राजकारणात काहीही अशक्य नाही. जिथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले, तिथे काहीही अशक्य नाही. सभागृह नियमानुसार चालायला हवे हीच माझी जबाबदारी आहे. संविधानाने इतकी मोठी शक्ती देशाला दिली आहे की, कोणतीही समस्या या संविधानाच्या माध्यमातून सोडवता येते. विधिमंडळाची रचनाही त्या संविधानानुसार केली आहे,' असेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, 'जनतेने महायुतीला निवडून दिले. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे एकत्र आले आणि त्यांनी १२० टक्के मार्क दाखवून मेरिट मिळवले. लोकशाहीत संख्येला महत्त्व असते, त्यामुळे त्या विषयावर मी जास्त भाष्य करणार नाही. मी कधी नियमाच्या बाहेर गेलो नाही. सभागृहात मी माझे मुद्दे संविधानातील चौकटीनुसारच मांडले होते. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो, पण आम्ही समाधानी नव्हतो म्हणून सभागृहाबाहेर गेलो. कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्याकरिता कुणाचीही मनाई नाही. तुम्ही सकाळ, संध्याकाळ कितीही वेळा यांचं नाव घ्या, पण संविधानातील तरतुदीनुसार, संविधानाने आखून दिलेल्या आराखड्यानुसार शपथ घेणे आवश्यक होते, इतकेच आमचे म्हणणे होते, असे म्हणत त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली असल्याचा उल्लेखही केला.

'शाेले'तील बच्चनची अाठवण

काही सदस्य माझे अभिनंदन करत असताना मला 'शोले' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची आठवण झाली. धर्मेंद्रसाठी मौसीकडे गेल्यानंतर त्यांनी ज्या शब्दांत धर्मेंद्रची प्रशंसा केली तशी ही होती. आमच्या डीएनएमध्ये विरोधी पक्षाचे काम करणेच अाहे. विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नाही. मी पुन्हा येईन असे मी म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितले नव्हते, त्यामुळे वाट पाहा. लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात, असेही फडणवीस म्हणाले.