आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. भानुमतींचा पेटारा उघडू नका किंवा इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करू नका : मुस्लिम पक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात अयोध्या वादावर सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. दसऱ्याच्या सुटीनंतर सोमवारी ३८ व्या दिवशी सुनावणी झाली. मुस्लिम पक्षकारांनी सांगितले, मशिदीत नमाज बंद झाल्याने तेथे हिंदूचा मालकी हक्क सिद्ध होत नाही. आम्ही आमच्याच घरातून दोन वर्षे बाहेर गेलो तरीसुद्धा घरावर ताबा आमचाच असेल. न्यायमूर्तींनी भानुमती यांचा पेटारा उघडू नये अथवा नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करू नये, असे ठामपणे सांगू इच्छितो, असे ते म्हणाले.  दरम्यान, मुस्लिम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी कायदेपीठाकडे तक्रारीच्या सुरात म्हटले, न्यायमूर्ती आम्हालाच प्रश्न विचारतात. हिंदू पक्षकारांना कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. यानंतर आज व उद्या हिंदू पक्षकार आपला युक्तिवाद सादर करतील. गुरुवारी मोल्डिंग ऑफ रिलिफवर सर्वोच्च न्यायालय पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेईल. त्याच दिवशी निर्णय राखून ठेवला जाईल. 
 

कोर्टरूम लाइव्ह

मुस्लिम पक्षकार म्हणाले, हिंदू पक्षकार कुराणातील तज्ञ नाहीत.
 
धवन : ब्रिटिशांनी मशिदीच्या देखभालीसाठी १८५४ पासून निधी देण्यास सुरुवात केली. यावरून आमचा मालकी हक्क सिद्ध होतो. 
 
न्या. चंद्रचूड : पुरातत्त्व विभागाच्या अहवालावर तुम्ही काय सांगाल? 
धवन : अहवाल मशीद पाडल्यानंतर आलेला आहे. त्यात मंदिर पाडून मशीद बांधली हे स्पष्ट होत नाही.  हिंदूच्या ताब्यात ही जागा नव्हती. 
 
न्या. चंद्रचूड : परंतु १८५८च्या कागदपत्रानुसार तेव्हाच्या राम चबुतऱ्याचा ताबा हिंदूकडे होता. 
धवन : त्यांनी पूजेचा अधिकार मागितला होता. तो ब्रिटिशांनी दिला होता. 
 
न्या. बोबडे : तो किती काळासाठी होता? 
धवन : माहिती नाही. हिंदूचा दावा आहे की, मुस्लिमांनी अवैध ताब्याचा पुरावा दिलेला नाही. हे खोटे आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी जे बांधकाम पाडण्यात आले त्या ५ डिसेंबर १९९२ पर्यंतच्या अवस्थेत आमची मशीद ताब्यात द्यावी. 
न्या. चंद्रचूड : पण २३ डिसंेबर १९४९ नंतर तेथे नमाज झालेली नाही. 
धवन : यामुळे त्यांचा मालकी हक्क सिद्ध होत नाही. हिंदू पक्षकारांकडे अर्धवट ज्ञान आहे.