आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यासोबत फिरुन आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका; पोलिस चकमकीत ठार झालेल्या तरुणीच्या वडिलांचे आदिवासी तरुणांना भावनिक आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - तरुणांनो कष्ट करा अन् स्वतःचे पोट भरा नक्षलवादाच्या नादाला लागून आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका असे भावनिक आवाहान चकमकीत ठार झालेल्या मुलीचे वडील महारु नरोटे यांनी केले आहे. 20 जुलै 2019 रोजी पोलिस आणि नक्षल यांच्या चकमकीत रुपी नरोटे ही महिला ठार झाली होती. महारु पुढे बोलतांना म्हणाले की, रुपीला बालवयातच नक्षलवादी आपल्या सोबत बळजबरीने घेवून गेले. तिला नेताना नक्षलवाद्यांनी ना आम्हाला विचारले ना त्या विषयी काही माहिती दिली. आम्ही तिचे नाव रुपी ठेवले होते. नक्षलवद्यांनी रुपीला 'सुशीला' नाव दिले.
 
नक्षलवादी रुपीला घेवून गेल्यापासून फक्त दोन वेळेस घरी आली होती. यावेळी तू आमच्यासोबतच राहा असे तिचे आई-वडील म्हणाले होते. पण तिने ऐकले नाही. 
 
दरम्यान पोलिसांनी महारु नरोटे यांना आत्मसमर्पण योजनेविषयी माहिती दिली होती. दुसऱ्यांदा जेव्हा रुपी घरी भेटायला आली तेव्हा तु नक्षलवाद्यांसोबत फिरणे सोडून दे, तु आत्मसमर्पण कर असे. आम्ही तुला पोलिसांकडे घेवून जातो असे म्हणत तिच्या वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाही तिने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा जर तिने त्यांचे म्हणणे ऐकले असते तर आज ती हयात असती. नक्षलवाद्यांमुळे आपली मुलगी मारली गेली. आमच्या म्हतारपणाचा आधार गेला असे सांगतांना महारु नरोटो यांना रडू कोसळले होते. 

नक्षलवादी हे रुपी उर्फ सुशिला नरोटो यांच्यासारख्या आदिवासी मुलींना व मुलांना बालवयातच त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय आपल्या सोबत घेवून जातात. त्यांनी बळजबरीने नक्षल दलममध्ये काम करावयास भाग पाडतात. हे महारु नरोटे यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते. तसेच बालवयातच त्यांना नक्षलवादी आपल्यासोबत घेवून जावून त्यांचे इतर जनसामान्यांशी असलेली नाळ तोडतात. त्यांचे निरागस बालपण व शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतात. यामुळे ही मुले अशिक्षित राहतात आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध न आल्यामुळे ते विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यास टाळाटाळ करतात. 

रुपीने जर तिच्या आई-वडिलांचे ऐकले असते तर आज ती आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेवून जनसामान्यांसारखे सुंदर जीवन जगत असती. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेवून अशा नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. 

पोलिसांनी केले आवाहन 
दलममध्ये गेलेल्या आदिवासी तरुणांनी 'नवजीवन योजनेचा' लाभ घेवून विकासाच्या मुळ प्रवाहात परत येण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, पोलिस दल त्यांना सर्वोतोपरी मदत करील, असे आवाहन मा.पोलिस अधिक्षक गडचिरोली श्री.शैलेश बलकवडे यांनी केलेले आहे.