आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी करू नका, आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : तुम्ही रडायचं नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काळजी करू नका. आत्महत्या करू नका. आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. लवकरच चेहऱ्यावर हसू दिसेल, अशा शब्दात मंगळवारी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर दिला. उद्धव ठाकरे यांनी लोहा, कंधार तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.


जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे यांचे सकाळी साडे अकराच्या सुमाराला येथील विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. आगमन झाल्यानंतर पत्रकारांना टाळत उद्धव ठाकरे सरळ गाडीत बसले व लाेह्याच्या दिशेने रवाना झाले. या वेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयदत्त क्षीरसागर, अनिल देसाई आदी नेते होते. त्यांनी लोहा तालुक्यातील जानापुरी, आंबेसांगवी, सोनखेड, किरोडा, गोलेगाव फाटा या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरेही त्यांच्यासोबत होते.

मुलींनी दाखवले नुकसान
जानापुरी येथे उद्धव ठाकरे यांनी बापूराव कदम, धोंडिबा पाटील व पांडुरंग कदम यांच्या शेतात पाहणी केली.
दोन लहान मुलींनी ठाकरे यांना खराब झालेले सोयाबीनचे पीक दाखवले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या मुलींनाही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीर उद्धव ठाकरे यांनी या मुलांना दिला.

शेतकरी ओक्साबोक्सी रडले
आंबेसांगवीत गोविंद सावंत, माधव सावंत, भानुदास वाघमारे, राम सावंत, बालाजी कदम, नितीन कदम, सुभाष सावंत, संभाजी कदम यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या व्यथा मांडल्या. किरोडा येथे शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. मारुती लक्ष्मण जाधव, देवबा जाधव, उद्धव केशव जाधव, विठ्ठल गणपती माने, माधव जाधव, जनाबाई धोंडिबा फुलवळे या शेतकऱ्यांना व्यथा मांडताना रडू कोसळले. तेव्हा ठाकरे यांनी तुम्ही रडू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीर दिला.

लातूर : उद्धव ठाकरेंनी मंगळवारी दुपारी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितले.

तालुकास्तरावर मदत केंद्र उभारा
जिल्ह्यातील बुरशी आलेले सोयाबीन, कापूस, ज्वारी पाहून उद्धव ठाकरेही व्यथित झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची झालेली हानी, कर्जमाफी झाली नाही, सन्मान योजनेचे पैसे मिळाले नाहीत, पीक विमा भरला, पण पैसे भेटले नाही, बँक कर्ज देत नाही, कर्जाचा तगादा लावते, नोटीस देते अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत, असे सांगितले. त्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांची यादी करताना तालुकास्तरावर एक शेतकरी मदत केंद्र उभारून ते मोतोश्रीशी जोडले जाईल, अशा सूचना शिवसैनिकांना दिल्या.

गंगाखेड तालुक्यातील गावांना भेटी
परभणी : आपत्कालीन स्थितीत शेतकऱ्यांना निश्चितच सर्वोत्तोपरी मदत मिळण्याच्या दृष्टीने सर्वार्थाने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाकरे यांनी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे मंगळवारी दुपारी पीक पाहणी दरम्यान दिली.

हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
आम्ही असे करू, तसे करू यासाठी शिवसेना नाही. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. या परिस्थितीतून तो सावरला पाहिजे. यासाठी आम्ही सगळे फिरत आहोत, असे शेतकऱ्यांना ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना हेक्टर ५० हजार रुपयांची मदत करावी व त्याला तत्काळ २५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
शेतकऱ्यांनी साध्या कागदावर आपले नाव, गट नंबर, पेरलेले पीक याची माहिती व पीक विमा भरलेल्या पावतीची झेराॅक्स जोडून तलाठी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयात द्यावी.
 

बातम्या आणखी आहेत...