Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | double rise in molestation cases in nagar this year

नगर: विनयभंगाच्या गुन्ह्यांत वर्षभरात दुपटीने वाढ, जिल्ह्यात 381 गुन्ह्यांची नोंद

अरुण नवथर | Update - Aug 23, 2018, 04:59 AM IST

बलात्काराच्या ८७ घटना, सर्व गुन्ह्यांचा लागला तपास

 • double rise in molestation cases in nagar this year

  नगर - संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ८७ बलात्कार व ३८१ विनयभंगाच्या घटना घडल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत विनयभंगाच्या गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांचा तपास लावला असला, तरी गुन्हेगारीचे हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.


  देशभर गाजलेल्या कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतरही जिल्ह्यात बलात्काराचे प्रकार सुरूच आहेत. वर्षभरात (जुलै २०१७ ते जुलै २०१८) जिल्ह्यात बलात्काराच्या ८७ घटना घडल्या. सरासरी आठवड्यात बलात्काराच्या दोन घटना घडत असल्याने राज्यभर जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्याचबरोबर या घटनांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जात आहे. बलात्काराचे हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना राबवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. बलात्काराच्या घटनांसह विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षभरात विनयभंगाचे तब्बल ३८१ गुन्हे दाखल झाले. यातील निम्मे गुन्हे तांत्रिक असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी विनयभंगाचे अडीचशे गुन्हे दाखल झाले, यंदा त्यात १३१ गुन्ह्यांची भर पडली आहे. या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांचा मोठा वेळ खर्च झालेला आहे. अनेक आरोपींना शिक्षा झाली आहे. मुळात असे गुन्हे घडू नयेत, यासाठी गावपातळीवर, तसेच शहराच्या विविध भागात जनजागृती होण्याची गरज असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. विनयभंग हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आरोपीला पाच वर्षांपेक्षा अधिक शिक्षा या गुन्ह्यात होते. मात्र, अनेकदा हे गुन्हे केवळ एकमेकांच्या आकसापोटी नोंदवले गेल्याचे प्रकार समोर येत आहेत. एक शस्त्र म्हणून अनेकजण विनयभंगाच्या कायद्याकडे पहात आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये काही निर्दाेषही भरडले जात आहेत.

  विनयभंग हा अजामीनपात्र गुन्हा
  विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला सात वर्षांपर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. सुधारित कायद्यानुसार या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळत नाही. हे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना लवकर शिक्षा होईल, तसेच असे गुन्हे करण्याचे धाडस यापुढील काळात कोणी दाखवणार नाही.
  - सुरेश लगड, विधिज्ञ.


  ५० टक्के तक्रारी खोट्या
  लहान मुलींशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे शंभर टक्के खरे असतात. परंतु अनेकदा प्रौढ महिलादेखील विनयभंगाच्या तक्रारी देतात. त्यात निम्म्यापेक्षा अधिक तक्रारी खोट्या असतात. जमिनीचे वाद, शेजारधर्म, उसनवारी यासारख्या अनेक कारणांतून एकमेकांच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारी दिल्या जातात.
  - विनोद चव्हाण, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी.

  १४३ पीडितांना मिळाली मदत
  बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, तसेच अॅसिड अॅटॅक प्रकरणातील पीडितांना शासनाच्या मनोधर्य योजनेंतर्गत मदत निधी दिला जातो. कमीत कमी दीड व जास्तीत जास्त साडेसात लाखापर्यंत ही मदत दिली जाते. पूर्वी समाज कल्याण विभागामार्फत दिली जाणारी ही मदत आता जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत देण्यात येते. समाजकल्याण विभागाने २०१३ ते २०१७ या कालावधीत १४३ पीडितांना मदत दिलेली आहे.

Trending