आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातला भक्तिभाव कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली की मला पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात. तेव्हाच्या आताच्या काळात आपण काय हरवले, याचाही विचार मनात येतो. तेव्हाचे दिवस शांत, समाधानी जीवनाचे प्रतिबिंब होते. गणेशोत्सवाचा उत्साह, आनंद घरोघरी आणि गावात सर्वत्र दिसून यायचा. वर्गणीसाठी प्रेमळ आग्रह असायचा, धाक किंवा सक्ती केली जात नव्हती. स्वखुशीने गोळा करण्यात आलेली वर्गणी, तरुणांचा नियोजनाचा उत्साह, आरास, देखावे याची तयारी महिनाभर आधीपासून चालायची. मेळ्यात बसवण्यात येणारी गाणी, नाच आदींची तयारी जुलैपासूनच सुरू व्हायची.

उत्सवाला सुरुवात झाली की मंगलमय वातावरणाची निर्मिती व्हायची! प्रथम दिवसापासून ते विसर्जनापर्यंत गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, व्याख्याने, भाषणे, एखाद्या मोठ्या मैदानावर हिंदी चित्रपट, नाटके, प्रबोधनपर कार्यक्रम याची रेलचेल असायची. यासाठी विविध गणेश मंडळांत जबरदस्त स्पर्धा असायची. विविध गणेश मंडळांचे गणपती, मंडळांनी केलेले सजीव-निर्जीव देखावे, आकर्षक लायटिंग पाहण्यासाठी रस्त्यावर रात्रीच्या बारापर्यंत गर्दी उसळत असे. डेकोरेशन, लायटिंगची भव्यता यावर शहरात सर्वत्र चर्चा होत असत. वृत्तपत्रांतून फोटो प्रसिद्ध होत होते. हा सगळा उत्साह व आनंद घराघरात, मनामनात असायचा. आता सगळे स्वरूप बदलले आहे. प्रचंड गर्दी, राजकारणाचा प्रभाव, पोलिस यंत्रणेवर येणारा बंदोबस्ताचा ताण, ध्वनिप्रदूषण आणि वर्गणीची सक्ती यामुळे आनंद आणि उत्साहाची जागा काहीशा धास्तीने घेतली आहे. आता घरोघरी टीव्ही आल्याने व्याख्याने आणि भाषणाला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. एकंदरीत उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. तरीही मनातला भक्तिभावाचा आनंद अजूनही टिकून आहे. श्रीगणेश सर्वांना सद्बुद्धी देवो. अनेक प्रश्न आणि समस्या लवकर सुटाव्यात. एकंदर जीवन सुखासमाधानाचे असावे, हीच श्रीगणेशचरणी प्रार्थना!