Home | Mukt Vyaspith | DR. Mohan Ninave Writes About About Navi Mumbai

नवी मुंबई असेल स्मार्ट सिटीची प्रेरणा (डॉ. मोहन निनावे)

दिव्‍य मराठी | Update - Mar 15, 2016, 02:23 AM IST

सिडकोचा नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्प स्वयंअर्थव्यवस्थापनावर आधारित असून उभारणीस ३४ हजार सातशे कोटींची गुंतवणूक हाेईल. त्यामुळे २०१९ पर्यंत पूर्ण रूप धारण केलेली नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी देशातील आदर्श असे पहिले शहर असेल.

  • DR. Mohan Ninave  Writes About About Navi Mumbai
    का ही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या प्राथमिक टप्प्यात देशभरातून ९८ शहरांची निवड करण्यात आली व नंतर निवडक २० शहरांची यादी जाहीर झाली त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोनच शहरांचा समावेश करण्यात आला. नवी मुंबईसारखी अनेक शहरे पहिल्या फेरीतून बाद झाली. याचा अर्थ त्यांचे स्मार्ट सिटीचे आव्हान संपुष्टात आले, असे चित्र रंगवले गेले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, सिडकोने जाहीर केलेल्या नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी या स्पर्धेत नव्हती तरी हे शहर स्मार्ट सिटीची मानके कित्येक वर्षे राबवत आहे. राज्यातल्या नव्हे तर देशातल्या स्मार्ट सिटींचा रोडमॅप कसा असावा याचा आदर्श सिडकोकडून घ्यावा लागेल. १९७० पासून सिडकोने महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून नवीन ग्रीनफील्ड शहरे विकासाच्या रथाचे सारथ्य केले आणि भविष्यातील शाश्वत शहराची निर्मिती हे ध्येय जोपासले. २१ व्या शतकातील शहर अशी बिरुदावली मिरवणारे नवी मुंबई शहर विकसित केले. दिवसेंदिवस उंचावणारे जीवनमान, नवनवे तंत्रज्ञान आणि समृद्ध जीवनशैली यांचा संगम अनुभवणारे सान्निध्य अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याने स्मार्ट सिटीचे स्वप्न आता अनेक शहरे बघू लागली आहेत.
    स्मार्ट सिटी कृती योजनेची आखणी दहा प्रमुख घटकांवर आधारित असून स्मार्ट संघटना म्हणजेच स्मार्ट ऑर्गनायझेशन हा पहिला प्रमुख घटक मजबूत करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. प्रामुख्याने पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे प्रमुख ध्येय प्रस्तूत करण्यात आले. प्रशासकीय प्रक्रियांचे पुन:अभियांत्रिकीकरण, संघटनात्मक पुनर्रचना, संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रणालींचा अवलंब आदींचा समावेश आहे. मनुष्यबळाच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण आणि संतुलित जीवनमानासाठी ‘चेंजिंग माइंड्स’ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन आदी बाबींचाही यात समावेश आहे. त्याचबरोबर संशोधन आणि क्षमता बांधणीसाठी अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. सिडकोने सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा व नागरिकांच्या अपेक्षापूर्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पारदर्शकता योजनेची रचना केली. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांना मार्गदर्शक ठरतील अशी धोरणे, कार्यपद्धती तयार करण्यात आली. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रामुख्याने २१ उपप्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली असून यामध्ये रु. १७०.०४ कोटी रु.ची गुंतवणूक करण्यात आली. २०१५ मध्ये संगणकीकृत नागरी सुविधा केंद्रे, लीगल ट्रॅकिंग प्रणाली, माय सिडको, स्मार्ट तक्रार निवारण व सिटीझन कनेक्ट यांसारखे मोबाइल ॲप, ऑनलाइन भरणा, नवी मुंबई पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठी संकेतस्थळ, सामाजिक सेवा सुविधा भूखंडांच्या अर्जांच्या नोंदणीसाठी विशेष सॉफ्टवेअर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्टल, कोपास (ऑटो डीसीआर), दक्षता संकेतस्थळ यांसारख्या पारदर्शक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. २०१६ मध्ये ई-ऑफिस, जीआयएस मॅपिंग, सॅप प्रणाली, गृहप्रकल्पांचे स्मार्ट वाटप (मास हाउसिंग ॲलोकेशन), स्मार्ट अतिक्रमण विरोधी प्रणाली, ऑनलाइन माहितीचा अधिकार, सर्व सेवांसाठी नागरी संकेतस्थळ, इस्टेट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, ४ जी नेटवर्क, महापालिका शाळांना ब्रॉडबँड जोडणी, वायफाय व सोशल मीडिया इंटरॲक्शन हे प्रकल्प सुरू होतील. आज या घडीला १६ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे जेएनपीटीचे विस्तारीकरण, १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवणुकीचा नैना पायलट प्रकल्प, ३ हजार कोटी गुंतवणुकीचे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण, १३ हजार ६० कोटी रु. गुंतवणुकीचे रेल्वे आणि मेट्रो प्रकल्प त्याचप्रमाणे ७,४०० कोटी रु. गुंतवणुकीचे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प अशा एकूण ५० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक असणाऱ्या प्रकल्पांमुळे दक्षिण नवी मुंबई जागतिक नकाशावर वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे ८.७ लाख रोजगारांची निर्मिती होत आहे. सिडकोचा नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्प स्वयंअर्थव्यवस्थापनावर आधारित असून यात १० मुख्य घटकांचा समावेश आहे. या १० घटकांमध्ये ८८ उपप्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या १० घटकांच्या उभारणीसाठी एकूण ३४ हजार सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या दहाही घटकांची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली असून २०१९ पर्यंत पूर्ण रूप धारण केलेली नवी मुंबई दक्षिण स्मार्ट सिटी देशातील आदर्श असणारे पहिले शहर असेल. सिडकोने नवी मुंबईमध्ये परिवहन सेवांवर आधारित विकास हा विचार सर्वप्रथम राबविला आहे. सिडकोने बस व रेल्वे वाहतूक सेवा विकसित केली आहे. स्मार्ट तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास व दर्जेदार जीवनशैलीमुळे कार्यक्षमतेमध्ये सुधारणा, आर्थिक क्षमतावृद्धी, अल्प खर्च यामुळे नवी मुंबईत नवीन व्यापार-उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहेच. एक रोजगाराभिमुख शहर अशी या शहराची ओळख निर्माण होणार आहे, अशा सर्वसमावेशक पुढाकारांमुळेच स्मार्ट शहर निर्मितीचा प्रवास सुकर होणार आहे.

Trending