स्‍वातंत्र्याचा शिक्षणनामा / स्‍वातंत्र्याचा शिक्षणनामा

Aug 12,2018 06:33:00 AM IST

एक सुखद योग जुळून आला. ७१ वा स्वातंत्र्यदिन हाकेच्या अंतरावर असताना निराश्रित मानसिक रुग्णांची निरलस सेवा करणाऱ्या डॉ. भारत वाटवानींसह मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या लेह-लडाखस्थित सोनम वायचुंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. या घटनेने शिक्षण आणि स्वातंत्र्य यातील परस्परप्रभावाकडेही लक्ष वेधले. ज्ञानवर्धित शिक्षणातून स्वातंत्र्याचा उमगणारा खरा अर्थही अधोरेखित केला...


गेल्या अडीच-तीन दशकांमध्ये देशात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच शिक्षणक्षेत्रात झालेल्या व्यापारीकरणामुळे, समाजाचा विशेषत: उच्चमध्यमवर्गीय समाजाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ‘शिक्षण म्हणजे उत्तम आर्थिक संधी प्राप्त करण्याचे साधन’ असा मर्यादित झाला असला तरी मानवी जीवनाच्या इतिहासात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. २५०० वर्षांपूर्वी ग्रीसच्या सामाजिक आणि राजकीय रंगभूमीवर सॉक्रेटिस आणि प्लेटो यांचा उदय होण्यापूर्वी जी बजबजपुरी माजली होती, त्यात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना प्लेटो म्हणतो, ‘शरीर व आत्मा यांना त्याच्या जन्मजात योग्यतेप्रमाणे पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण’. तो पुढे म्हणतो, ‘चांगले शिक्षण कोणते हे तुम्ही मला विचाराल, तर त्याचे सरळ उत्तर जे चांगली माणसे घडविते, चांगल्या माणसांना उदात्त वागणुकीची प्रेरणा देते, ते चांगले शिक्षण. थोडक्यात, नागरिकत्व निर्माण करणे (Ideal of Citizonship) हे शिक्षणाचे ध्येय असून तीच आदर्श समाजव्यवस्थेकडे जाण्याची खरी वाटचाल आहे.’

स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार प्लेटोहून फारसे भिन्न नाहीत. स्वामी विवेकानंद धर्म आणि शिक्षण यांमध्ये फारसा फरक मानत नाहीत. ‘माणसात विद्यमान असणाऱ्या दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म’ तर ‘माणसाच्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण’ असे स्वामीजी म्हणतात. रवींद्रनाथांनीही शिक्षणाविषयी सखोल चिंतन केले होते. शिक्षण आणि जीवनाचे ध्येय काय असायला हवे, याचे उत्तर देताना गुरुदेव म्हणतात, ‘दोघांचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे आत्म्याचा विकास आणि मुक्ती.’ महात्मा गांधीही जीवन आणि शिक्षण यांचे उद्दिष्ट एकच आहे, असे म्हणत. त्यामुळेच जीवन शिक्षण या संकल्पनेविषयी ते आग्रही होते. साक्षरता म्हणचे शिक्षण नव्हे. माणसाचा आत्मा आणि मन यांचा परिपूर्ण विकास म्हणजे शिक्षण असे त्यांचे मत होते. त्यातूनच त्यांच्या बुनियादी शिक्षणाची विचारधारा सुरू झाली होती.

भारतीय शास्त्रकारांनी शिक्षणाची व्याख्या ‘सा विद्या या विमुक्तये’ अशा समर्पक शब्दांत केली आहे. जे मुक्ती देते ते शिक्षण. ज्याद्वारे आम्हाला रोग, शोक, द्वेष, पाप, दीनता, दासता, गरिबी, बेरोजगारी, अज्ञान, दुर्गुण इत्यादी दास्यतांतून मुक्ती प्राप्त होते,ते शिक्षण. विद्येचा आणखी एक अर्थ ज्ञान असा आहे, ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्याचे कार्य ज्ञान करते. म्हणूनच ‘नास्ति विद्या समम चक्षु’ विद्येसारखा दुसरा डोळा नाही, असे एक सूक्तिवाक्य आहे. म्हणूनच अमेरिकेत जेव्हा गुलामगिरी कायदेशीर होती, तेव्हा गुलामांना शिक्षण दिले जात नव्हते. नॉर्थ कॅरोलिना राज्याने तर गुलामांना शिक्षण देणाऱ्या व्यक्तीला १०० पौंड आर्थिक दंडाची तरतूद करणारा कायदा केला होता. इतरत्र दिलेच, तर काही धार्मिक स्वरूपाचे शिक्षण दिले जात होते. कारण धर्म केवळ गुलामांनाच नव्हे; तर आज आपण ज्या अर्थाने स्वातंत्र्याकडे पाहतो, त्या अर्थाने कोणालाच स्वातंत्र्य देत नव्हता आणि ज्यांना धर्माआड लपून केवळ एका अत्यल्प वर्गाचे हितसंबंध जपायचे होते, त्यांच्यासाठी ही उत्तम सोय होती. गुलामी जशी माणसाने माणसावर लादलेली होती, राष्ट्राने राष्ट्रावर लादलेली होती, तशीच ती राजाने प्रजेवर लादलेली होती व धर्म या गुलामीच्या बाजूने उभा होता. त्या काळी युरोपात शिक्षण धर्माच्या म्हणजे चर्चच्या ताब्यात होते. जोवर हे चर्चच्या ताब्यात होते, तोवर त्या शिक्षणाने राजसत्तेच्या हितसंबंधांचे रक्षण केलेले दिसते. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने साऱ्याच धर्मांत पाहायला मिळते. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून एकमेकांचे हितसंबंध जतन करताना दिसतात त्याचे कारण हेच आहे.

ग्रानदाची लढाई १४९२ मध्ये झाली. यानंतर धर्मयुद्धांमध्ये युरोपची म्हणजे ख्रिश्चनांची सरशी होत राहिली आहे. परंतु बाझंटाइन साम्राज्य कोसळल्यावर आपला जीव वाचविण्यासाठी अनेक धर्मपंडित आपल्या पोथ्या आणि ग्रंथ घेऊन युरोपात शिरत होते. त्यांना आपल्याकडचे ज्ञान लोकांना दाखवून देणे भाग होते. या ग्रीक पंडितांनी ग्रीकांचे गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र लोकांना शिकविण्यास सुरुवात केली.त्यामुळे पहिल्यांदाच शिक्षण चर्चच्या शाळांबाहेर पडले. काही वैज्ञानिक सत्ये प्रस्थापित होऊ लागली. विज्ञानाचे शिक्षण हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू लागले. आरंभी बायबलविरुद्ध बोलणाऱ्यांना छळ, यातना सहन कराव्या लागल्या. पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करण्यासाठी ब्रूनो व कोपर्निकस यांना बलिदानही करावे लागले. पण युरोपचे वातावरण बदलत होते. नरहर कुरुंदकर लिहितात, ‘मानवी मनाची गुलामगिरीतून सुटका तीन कारणांनी होते. एक तर पराभवामुळे धर्मश्रद्धांना धक्का बसलेला असतो. दुसरे विज्ञान धर्माला मान्य नसणारी, पण नाकारता न येणारी सत्ये प्रस्थापित करते. या सत्यांच्या भोवताली समाजाचे नवे हितसंबंध निर्माण होतात. या हितसंबंधांना धर्माची मान्यता नसली, म्हणजे इहलोक आणि परलोक यांचा संघर्ष सुरू होतो. तिसरे धर्मच धर्माच्या विरुद्ध झगडू लागतो. या साऱ्या कल्लोळात सर्व युरोप खळबळून निघत होता. आजवर युरोपातील ख्रिश्चनांनी आपल्याविरुद्ध अन्य श्रद्धांचा विध्वंस हे काम पार पाडले होते.आता ख्रिस्ती धर्मपंथातच एकमकांच्या कत्तली करण्यास सिद्ध झालेले नवे धार्मिक गट परस्परांच्या विरोधी उभे राहिले होते. सेक्युलॅरिझमच्या युरोपातील उदयाची ही पार्श्वभूमी आहे. (जागर: पृष्ठ १८१)

आज ज्या अर्थाने आपण स्वातंत्र्य हा शब्द वापरतो, त्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत सेक्युलॅरिझमने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सेक्युलॅरिझमने केवळ राजसत्ता आणि धर्मसत्तेचीच फारकत केली नाही तर मानवी मनाला धार्मिक गुलामीतून मुक्त करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आरंभले. या सेक्युलर विचारसरणीला प्रेरक ठरण्याचे कार्य शिक्षण करते आणि म्हणूनच स्वातंत्र्य आणि शिक्षण यांचे साहचर्य नेहमीच आवश्यक असते. युरोपात जसजसा विज्ञानाचा प्रसार वाढला तशा क्रमाने तिथली लोकशाही सुदृढ होत गेली ही गोष्ट आपण पाहिली आहे. आजच्या युरोपीय लोकशाही स्वातंत्र्याचा पाया शिक्षणाने घातला. ‘सा विद्या या विमुक्तये’ ही शिक्षणाची व्याख्या बरोबरच आहे. शिक्षण मुक्तीचे, स्वातंत्र्याचे साधन आहे.


आज जे लोकशाही स्वातंत्र्य आपण सारे उपभोगत आहोत, त्या लोकशाही स्वातंत्र्याचा पाया आधुनिक शिक्षणातूनच घातला गेला. १७५७च्या प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिश सत्ता स्थिरावत असतानाच ब्रिटिशांविरोधात जंगल महल, संन्यासी-फकीर,चुआडांचे बंड, निरीह संथालांचे बंड घडून आले. पण या साऱ्या संग्रामांची स्वातंत्र्याची कल्पना परकीय सत्ता बदलून स्वकीयांचे राज्य आणणे इतकीच मर्यादित होती. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातच आधुनिक शिक्षणाचा पाया देशात घातला गेला होता. ब्रिटिशांना कारकून पुरविणारे शिक्षण म्हणून या शिक्षणाची कितीही हेटाळणी केली, तरी हेच शिक्षण घेतलेल्या नवसुशिक्षित वर्गाने पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि याच नवसुशिक्षितांच्या काँग्रेसने ब्रिटिश राज्य बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही स्वातंत्र्य देणारे आधुनिक राष्ट्र निर्माण केले.

अर्थात, भारतीय स्वातंत्र्य लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठीचाच लढा होता असे नाही. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुक्ती त्यात अनुस्यूत होतीच. कधी ही चळवळ या साऱ्या संकल्पना एकत्रितपणे पुढे रेटत नेत होती. तर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, पेरियार, अशी मंडळी सामाजिक मुक्तीचे लढे पुढे नेत होती. लढा राजकीय असो, समाजपरिवर्तनाचा असो वा सामाजिक मुक्तीचा, साऱ्याच लढ्याचे नेते शिक्षणाचा पुरस्कार करत होते. म्हणूनच टिळक, आगरकर, गोखले, गांधी, आंबेडकर साऱ्यांनीच शिक्षणाच्या माध्यमाचा वापर आपल्या लढ्यांसाठी केला, शिक्षणसंस्था स्थापन केल्या. याचे कारण शिक्षणच सर्व प्रकारच्या मुक्तीच्या, स्वातंत्र्याच्या लढ्यांची प्रेरणा देते हेच आहे. त्यात डॉ. आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा मंत्र तर शिक्षण आणि स्वातंत्र्य यांचा अन्योन्यसंबंध स्पष्ट करतो. म्हणूनच ज्या राज्यकर्त्यांना लोकशाही स्वातंत्र्याचा संकोच करायचा असतो, असे राज्यकर्ते आचार-विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करतात. विशिष्ट विचारांच्या वर्तमानपत्रांवर आणि ग्रंथांवर बंदी घातली जाते. राज्यकर्त्यांना अनुकूल असलेले विचार वारंवार लोकांसमोर मांडले जातात. त्या विचारांची माणसे विविध शिक्षणसंस्थांच्या प्रमुखपदी जाणीवपूर्वक नेमली जातात. जे विचार, जी शास्त्रे जुनाट, गुलामीचे शोषण करणारी आणि समाजाला विज्ञानाभिमुख बनण्यापासून परावृत्त करत राहिली,असे विचार आणि शास्त्रे वेगवेगळ्या प्रकारे प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा एक विशिष्ट वर्ग शिक्षणापासून वंचित कसा राहील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. तसे धोरण आखले जाते. मानव जातीचा इतिहास हा एका अर्थाने गुलामीचा इतिहास आहे. ही गुलामी कधी धर्माने लादली, कधी राज्याने लादली तर कधी एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर लादली. या साऱ्या गुलामीविरोधात स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्यात आणि त्यातून ‘मनुष्याला मनुष्य म्हणून एका किमान प्रतिष्ठेने जगण्यासारखी स्थिती’शिक्षणाने निर्माण केली आहे. साऱ्या गुलामीविरुद्धचा स्वातंत्र्याचा एल्गार शिक्षणाने पुकारला आहे. म्हणूनच शिक्षणाची स्वायत्तता जपणे हे स्वातंत्र्य जपण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

[email protected]
लेखकाचा संपर्क : ८३६९७९८७६४


X