Home | Magazine | Madhurima | Dr. Pavan Chandak Write About Sanitary pad

सकारात्मक वैचारिक परिवर्तन

डॉ. पवन चांडक | Update - Aug 14, 2018, 12:34 AM IST

मासिक पाळीतील स्वच्छतेच्या दृष्टीने ‘सॅनिटरी पॅड’ ही लाजिरवाणी नसून जीवनावश्यक बाब आहे.

 • Dr. Pavan Chandak Write About Sanitary pad

  मासिक पाळीतील स्वच्छतेच्या दृष्टीने ‘सॅनिटरी पॅड’ ही लाजिरवाणी नसून जीवनावश्यक बाब आहे. जिथे साध्या सॅनिटरी पॅड मागताना किंवा देताना संकोच किंवा लाज बाळगली जाते तिथे आपल्या समाजातील आपल्या आई, बहीण, पत्नी त्यांच्या मासिक पाळीशी संबंधित आरोग्याच्या समस्यांवर मुक्तपणे भाष्य कसे करणार?


  मागच्या वर्षी शनी मंदिर येथील स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न असो व शबरीमला मंदिर येथील प्रश्न त्यानंतर झालेला विविध वाद, चर्चा आणि त्यानंतर विचारमंथन करायला लावणारे विविध लेख, सदर आणि व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक विद्यापीठात झालेल्या विविध चर्चा आणि पोस्ट व कमेंट्सच्या माध्यमातून झालेले विचारमंथन याचा आजघडीला सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. यातील विनाकारण धर्म मुद्द्यावरील झालेला वाद आपण बाजूला ठेवू. परंतु मासिक पाळी चक्र, त्यात घ्यायची स्वच्छतेची काळजी, आहार, दिनचर्या, मानसिक स्थिती याविषयी स्त्रिया मोकळेपणाने व्यक्त होऊ लागल्या आहेत, मग ते यूट्यूब, फेसबुक लाइव्ह असो व विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून असो. यातून मग मासिक पाळीत पारंपरिक पॅड वापरावे की, सॅनिटरी पॅड अशी चर्चा होऊ लागली. वापरलेल्या ‘सॅनिटरी पॅड’मुळे होणाऱ्या कचऱ्याच्या समस्या व पॅडची विल्हेवाट हा गंभीर प्रश्न लोकांच्या समोर अाला.


  सॅनिटरी पॅडवरील जीएसटी रद्द केल्यामुळे लगेच किमतीमध्ये फरक दिसणार नसला तरी त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात सुलभ व करमुक्त होणार आहे त्यामुळे भविष्यात पॅडची किंमत कमी होईल. शिवाय ग्रामीण भागातील महिलांना पूर्वी सॅनिटरी पॅड आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातील ६२% महिला मासिक पाळीत कापड वापरायच्या. आता जीएसटीमुक्त झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना हे पॅड परवडतील, अशी अपेक्षा आहे.


  मासिक पाळीत प्रत्येक सहा ते आठ तासांनी पॅड बदलणे आवश्यक आहे, पण अनेक वेळा ‘लाँग लास्टिंग प्रोटेक्शन’सारख्या जाहिरातीला बळी पडून अनेक वेळा स्त्रिया एकच पॅड १२-१४ तास वापरतात. त्यामुळे यात वापरलेल्या ‘विस्कोज रेयॉन’ आणि ‘डाय ऑगझिन’सारख्या प्रचंड घातक रासायनिक घटकांमुळे ‘टीएसएस’ (टॉक्झिक शॉक सिंड्रोम) आणि सर्व्हायकल कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात असे अनेक संशोधनात दिसून येत आहे. त्यामुळेही पर्यावरणपूरक व आरोग्यास कमी धोकादायक पॅडच्या शोधात महिलाही आहेतच.


  आमची संस्था एचएआरसी ट्रस्ट ‘स्पर्श’ प्रकल्पाच्या माध्यमातून १८ वर्षांवरील समाजातील एचआयव्ही बाधित मुली, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, विधवा स्त्रियांना स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या अंतर्गत सॅनिटरी पॅड तयार करण्याचे प्रशिक्षण देते, सोबत मानधन/विद्यावेतनदेखील देण्यात येते. येथे तयार झालेले सॅनिटरी पॅड सेवालय एड्स प्रकल्प हसेगाव लातूर, इन्फंट इंडिया एड्स बालगृह बीड, सहारा अनाथालय गेवराई, सूर्योदय एड्स बालगृह अकोला येथील १३ ते १८ वयोगटातील शंभरेक विद्यार्थिनींना मासिक पाळीत स्वच्छतेच्या दृष्टीने मोफत पुरवत आहोत. स्पर्श प्रकल्पातून एक मूलभूत उद्देश हादेखील होता की, पर्यावरणपूरक व स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट अशा सॅनिटरी पॅडच्या निर्मितीसोबत गरजू, अनाथ, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील स्त्रियांना रोजगार देणे. सध्या आठनऊ स्त्रियांना या प्रकल्पातून स्वयंरोजगार व प्रशिक्षण दिल्याचे समाधान आहे.

  - डॉ. पवन चांडक, परभणी
  pavanchandak498@gmail.com

Trending