Home | Magazine | Rasik | Dr. G. B. Deglurkar write about Craft form of Seeta

रामपत्नी सीता

डॉ. जी. बी. देगलूरकर | Update - Aug 26, 2018, 12:37 AM IST

ज्यांचे नित्य स्मरण व्हावे, अशा पंचकन्यांपैकी एक म्हणजे सीतामाई! रामायणाने तिचे सारे आयुष्य आपल्यासमोर आणले आहे.

 • Dr. G. B. Deglurkar write about Craft form of Seeta

  ज्यांचे नित्य स्मरण व्हावे, अशा पंचकन्यांपैकी एक म्हणजे सीतामाई! रामायणाने तिचे सारे आयुष्य आपल्यासमोर आणले आहे. साहाजिकच तिचे व्यक्तिचित्रण शिल्पातून उमटणे स्वाभाविकच आहे. किंबहुना, असेही म्हणता येईल की, तिने सर्वच ललित कलाक्षेत्रांतील कलाकारांना आपल्या व्यक्तित्वाने आणि व्यक्तिमत्त्वाने भुरळ पाडली आहे; म्हणूनच चित्रात ती आहे, नृत्यात ती आहे, नाट्यात ती आहे आणि शिल्पसृष्टीतही ती आहे. तिच्या मुक्या भावनांना तर कलाकारांनी शिल्परूप दिले आहे...


  शेतात सापडलेली अयोनिजा सीता पुढे अयोध्येच्या राज्याची राणी होते, हे शिल्पींना महत्त्वाचे वाटते. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडी मंदिरात रामाला आणि तिला अभिषेक होतो आहे, असे एक भावपूर्ण शिल्प आहे. आठवले असेल, त्याक्षणी त्या उभयतांना मनांना, भावनांना, देहांना किती खडरतेतून जावे लागले, हे.


  रामाशी सीतेचा विवाह झाला, या संबंधीची जनसामान्यांना ज्ञात असलेली कथा आणि प्रत्यक्ष वाल्मीकींनी सांगितलेली तत्संबंधीची कथा, यात मेळ बसत नाही. पण विवाह होतो ही मात्र वस्तुस्थिती आहे. सीता विचारी होती, रामावर तिचे जिवापाड प्रेम होते. वसिष्ठ ऋषी तर सांगतात की, सीता रामाची ‘आत्मेय’ म्हणजे, आत्मा होती. त्यामुळे जेव्हा राम वनवासास जायला निघतो, तेव्हा त्याची इच्छा असते, की त्याने एकट्यानेच जावे. पण सीता म्हणते ‘इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गति: सदा (पत्नी ही पतीच्या भाग्याची वाटेकरीण असते,) म्हणून जेथे राघव तेथे सीता. या प्रसंगाचे यथोचित वर्णन भावार्थ रामायणात संत एकनाथ करतात, ‘जेव्हांचि तुझे वनप्रयाण । तुजसवे येती माझे प्राण.’ हा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे वेरूळ येथील कैलास लेणीतील रामायणातील पहिल्याच ओळीत. राम दशरथाची अनुमती घेऊन त्याला नमस्कार करण्यासाठी वाकलेला असतो, तेथेच नतमस्तक अशी सीता उभी असते.


  वनवासात असताना सीतेचे दोन वेळा अपहरण होते, हे आपणास माहिती नसते. शापित गंधर्व विराध नामक राक्षसाच्या रूपात वनात वावरत असतो. रामाच्या हातून मरण आल्यावरच तो शापमुक्त व्हायचा असतो. राम, लक्ष्मण, सीता वनात आल्याचे कळताच तो यांना सळो की पळो करून सोडतो. उद्देश हा की, रामाने क्रोधदग्ध होऊन त्याचा वध करावा. मात्र, राम हे त्याचे छळणे गांभीर्याने घेत नाही, हे पाहून तो सीतेचे अपहरण करतो; अर्थातच तो मारला जातो. या प्रसंगावर आधारित दोन शिल्पांकने तरी उपलब्ध आहेत. उत्तरेकडील एका उत्खननात इसवीच्या प्रारंभीचा एक मक्वमृदा (टेराकोटा) फलक (प्लाक) प्राप्त झाला आहे. त्यात एक अक्राळविक्राळ, बलदंड राक्षस कोमलांगना अशा एका पुरंध्रीला उचलून घेऊन पळत असल्याचे दृश्य कोरलेले आढळते. हा राक्षस म्हणजे विराध आणि पुरंध्री म्हणजे सीता. विशेष म्हणजे, या प्रसंगाचे दुसरे अंकन आढळते, ते कंबोडिया या देशातील बांटीश्राय (Banteay Srei) या देखण्या मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर. येथे तो राम-सीतेला कसा छळतो. त्याचेही शिल्पांकन आढळते. काय आणि कसे आहे पाहा सीतेचे नशीब! अर्थात ते कलाकारांच्या नजरेतून सुटले नाही.
  सीतेचे झालेले दुसरे अपहरण सर्वांच्या परिचयाचे आहे. या प्रसंगाचे शिल्पांकन भारतात अनेक ठिकाणच्या मंदिरावर आढळते. कैलास लेणीतील रामायण प्रसंगात तर ते आढळतेच शिवाय कैलासातच आणखी एके ठिकाणी ते आहे. एका मोठ्या शिल्पपटात ते आहे. ‘जितंमया’ या भावनेने अहंकारमत्त झालेला रावण, (तो चौकटीत मावत नाही अहंकारामुळे, त्याला तिरपा दाखवला आहे) रथातून तो सीतेला पळवून नेताना, जटायू त्याच्या मांडीला टोचा मारतो आहे, म्हणजेच, त्याच्या सद्सद् बुद्धीला जागवतो आहे, आणि रथात उभी असलेली सीता असहाय आहे. ‘अङ् के नादाय वैदेहीं रथम् आरोपयत् तदा’ असे हे दृश्य आहे.


  पण हे अपहरण घडण्याचे एक कारण घडले, त्याचेही शिल्प रामायण प्रसंगात कोरलेले आहे. फार प्रत्ययकारी आहे ते. बसलेल्या रामाच्या पुढ्यात अगदी त्याच्यावर रेलून सीता बसलेली आहे. दूर अंतरावर सुवर्णमृग दिसतो आहे, मान वेळावून, अंगुलिनिर्देश मृगाकडे करून, सीता रामाला गळ घालते आहे ‘हवाच मृग तो मला राघवा’ पुढचा घटनाक्रम आपणास माहितीच आहे. कोल्हापूरपासून सुमारे ५५-६० कि.मी. वर असलेल्या खिद्रपूर येथील कोप्पेश्वर मंदिराच्या अधिष्ठानावर, सीता चिंताग्रस्त होऊन अशोकवनात वृक्षाखाली बसली आहे, आणि तेवढ्यातच हनुमान तिला राममुद्रा देतो आहे, असे एक सुंदर शिल्प, आपल्यासमोर तो प्रसंग उभा करणारे, आढळते. सीतेचे वनात जाणे, मृगाचा तिला मोह होणे, तिचे अपहरण आणि राममुद्रेची प्राप्ती झाल्यामुळे तिला सुटकेची खात्री होणे असे तिच्या आयुष्यातील संघर्षमय नाट्यप्रसंग वाल्मीकींनी शब्दबद्ध केले आणि कलाकारांनी प्रत्ययकारी पद्धतीने ते शिल्पबद्ध केले आहेत. रामायणातली सीता बुद्धिमान आहे, सोशिक आहे, चतुर आहे. एकदा ती रामाला म्हणते ‘रामा, असत्य भाषण, परस्त्रीसंबंध आणि वैराशिवाय हिंसा अशी तीन पापे आहेत. वनवासात असूनही धनुष्य-बाण सतत बाळगले, तर त्याचा उपयोग करण्याचा मोह होतो आणि वैराशिवाय हिंसा घडते. तर वनवासाला राम एकदाच निघाला, तेव्हा सीता म्हणते की तीही रामासवे जाणार, न संमती दिल्यास प्रजा म्हणेल ‘राम पत्नीचे संरक्षण करण्यास अपात्र आहे.

  तिच्या आयुष्यातले खडतर घटना, काही काळापुरता का होईना, पतिवियोग इत्यादी पाहून वाटते, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे.’

  - डॉ. जी. बी. देगलूरकर
  udeglurkar@hotmail.com

 • Dr. G. B. Deglurkar write about Craft form of Seeta
 • Dr. G. B. Deglurkar write about Craft form of Seeta

Trending