Home | Magazine | Rasik | Dr. G.B. udeglurkar article in Rasik

लोभसवाण्‍या शालभंजिका

डॉ. जी. बी. देगलूरकर | Update - Sep 09, 2018, 07:52 AM IST

भारतातील अनेक मनोहारी स्त्री-शिल्पांत गणना व्हावी अशा एका शिल्पप्रकाराला संज्ञा दिली गेलीय, ती ‘शालभंजिका’ अशी.

 • Dr. G.B. udeglurkar article in Rasik

  भारतातील अनेक मनोहारी स्त्री-शिल्पांत गणना व्हावी अशा एका शिल्पप्रकाराला संज्ञा दिली गेलीय, ती ‘शालभंजिका’ अशी. अशा शालभंजिका शिल्पांनी संस्कृत कवींना, साहित्यकारांना मोह पाडला होता. त्याचे प्रत्यंतर येते ते ‘विद्वशालमंजिका’ नामक नाटकामुळे. खरे तर शिल्पातून दृश्य होणाऱ्या भारतीय संस्कृतीसंबंधीच्या काही संकल्पनांचा प्रेरणादायी श्रोत म्हणजे, संस्कृत साहित्य होय, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. म्हणजेच असेही म्हणता येईल, की साहित्य आणि कला भारतीय संस्कृतीचा आरसाच आहे...

  शालभंजिकाचा अर्थ प्रतिमा कसा होतो, हे अजमावयाचे झाल्यास त्यांचे प्रारंभीचे शिल्पांकन आणि त्याचा गर्भितार्थ लक्षात घ्यावा लागतो. महान् वैख्याकरणी पाणिनीच्या काळात शालभंजिका, उद्दालकपुष्पभंजिका, अशोक पुष्प प्रच्छालिका या संज्ञा शाल आणि अशोकाच्या झाडावरील फुले गोळा करून मुली/तरुणी, खेळत असत, यासाठी वापरल्या जात. याचे प्रत्यंतर त्यावेळच्या काही शिल्पातून आढळते. पण कालांतराने हे खेळ मागे पडले, तरी शिल्पकारांनी तरुवराच्या सांगाती असल्याची शिल्पे अजरामर केलीच. आणखी पुढच्या काळात तर झाड असो वा नसो काही विशिष्ट प्रकारची शिल्पे शालभंजिका म्हणून ओळखली जाऊ लागली. अश्वघोषाच्या काळात तर म्हणजे इसवीच्या दुसऱ्या शतकात तोरणांच्या कडेवरील किंवा स्तंभावरील स्त्रीशिल्पांना (Caryatids) शालभंजिका म्हणूनच संबोधण्यात येऊ लागले असे दिसते. यांची अनुक्रमे तोरणशालभंजिका किंवा स्तंभपुत्तलिका अशी ओळख देण्यात आली. उदाहरणार्थ
  अवलम्ब्य गवाक्षपार्श्वमन्या शयिता चापविभुग्नगात्रयष्टि:।
  विरराज विलम्बिचारूहरा रचिता तोरणशालभंजिकेव।।
  म्हणजे, जालवातायनाशी ओंढगून उभी असलेली, कमनीय बांध्याची, झोकावत असलेल्या गळाहाराची ही तरुणी तोरणावरील शोभिवंत असे स्त्री शिल्पच जणू! म्हणजे, आता शालभंजिका स्थापत्याचेच एक अंग झालेले दिसते. जालवातायनाशी (खिडकीशी) उभी असलेल्या प्रमदेजवळ झाडाचा मागमूसही नसताना, अश्वघोष मात्र तिची तुलना तोरणशालभंजिकेशी करतो आहे, हे या संबंधात लक्षात घेण्यासारखे आहे. जर्मन पंडित फोगेल (Vogel) याने शालभंजिका या संज्ञेकडे लक्ष वेधून संस्कृताध्यायी मंडळीचे काम हलके केले, असे सुप्रसिद्ध कला समीक्षक डॉ. सी. सिवराम मूर्ती यांचे म्हणणे आहे. या तोरणशालभंजिकेचे सर्वोत्कृष्ट शिल्प सांची (मध्यप्रदेश) येथील भव्य स्तूपाच्या तोरणद्वारावर आहे.

  सांची येथील ही शालभंजिका झाडाला नागवेलीसारखी लपेटून असलेली नागमोडी वळणाच्या देहाची आहे. उजव्या बाहूने तिने वृक्षाला कवेत घेतले आहे आणि डावा हात डोक्यावरील फांदीवरील आम्रफलााच्या घडावर टेकवला आहे. सुरसुंदरीच्या परिभाषेत हिला ‘डालमलिका’ असे म्हणतात. हिचे शिरोभूषणास पंख्यासारखा तुरा आहे, त्यावरूनही ही सौंदर्य प्रसाधनात तत्पर आहे हे कळते. गळ्यात हिच्या एक नाजूक मुक्तामाला आहे. कटिवेष्टित आहे, ती कलाकुसरयुक्त मेखला आहे. मनगटीभोवती १४ कंकणे असून पोटरी व्याप्त वलये आहेत. ही चंद्रानना उभार वक्षस्थळाची असून, करभोपऊरू म्हणजे हत्तींच्या पिलाच्या सोंडेसारख्या मांड्यांची आहे. खरे तर हिचे नेसूचे वस्त्र सापाच्या कांतीसारखे असल्यामुळेे ही विवस्त्र भासते. या अशा ‘ऐवजांना’ लक्षात घेता, एक जोमाची गतिशीलता शरीरभर पसरलेली असून, त्याला जिवंतपणा लाभलेला आहे. सारी देहावयव सुसंवादी असल्यामुळे त्यातून एक लय पसरलेली आहे. अशा जिवंतपणाचा भास निर्माण करणाऱ्या, सळसळत्या रक्ताच्या अनेक शालभंजिका मथुरा येथील वस्तुसंग्रहालयात आणि अन्यनही आहेत.


  लातूर जिल्ह्यात पानगाव येथील मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावर अशा अनेक शालभंजिका आहेत. पैकी एकीबद्दल लिहिलेच पाहिजे. रसिक जनांना तिची ओळख होणे आवश्यक आहे. तिचे नाव गौरी! गौरी म्हणजे, शिवमहादेवाची पत्नी अशी ओळख आपणास आहे, पण मूर्तिशास्त्रदृष्ट्या पार्वती जेव्हा गोधा(घोरपड) या वाहनासह असते, तेव्हा तिला गौरी असे म्हणतात, ‘गोधासना भवेद्गौरी.’ ती सिंहासह असली, की तिला दुर्गा म्हणतात. पण जेव्हा सुरसुंदरी म्हणून गौरीचे शिल्पांकन केले जाते, तेव्हा तिचे प्रयोजन अगदी वेगळे असते, निराळे असते. एका अर्थाने ते धक्कादायक असते. अशा गौरीला ‘क्षीरार्णव’ नामक ग्रंथात सिंहमर्दिनी असे संबोधिले आहे.

  ‘गौरीच सिंहमर्दिनी! येथे ती अगदी आकर्षक रीतीने उभी असून तिच्या उजव्या पायाशी उभा सिंह आहे. उजव्या वर उचललेल्या तिच्या हातात तलवार आहे. निरखून पहिल्यास तिच्या डोक्याच्या वरच्या बाजूस असलेल्या झाडाच्या पानात ती तलवार दिसून येते. सिंहावर वार करण्याचा तिचा हेतू लपून न राहता, तो स्पष्ट होतो. येथे गौरीला भीतीप्रद दाखवण्यापेक्षा आकर्षक दाखविणे शिल्पकाराने पसंत केले आहे. ती यामुळेच धनुष्याकृती किंवा लिंबोळीच्या पानागत भुवयांची, सरळ धारदार किंवा गोड्या तेलाच्या धारेसारख्या नासिकेची, मीनाक्षी, पातळ ओठांची, आकारबद्ध (Shapely) किंवा अंब्याच्या कोयीसारख्या हनुवटीची, गजतुंडवत् खांद्याची, उन्नत वक्षस्थळची, नाजूक कटिप्रदेशाची आणि विस्तृतजघना अशी सुभगसुंदरी आहे. झालेच, तर तिची दृष्टी तिच्या सावजाकडे म्हणजे, सिंहाकडे आहे. या प्रकारच्या गौरीनामक शालभंजिका सुरसुंदरीचे शिल्प अख्ख्या दक्षिण भारतात हे एकमेव आहे. त्यामुळे या गौरीला अनन्यसाधारण असे मानता येईल. शत्रू कितीही बलदंड असला तरी न डगमगता त्याचा समाचार घेता येतो, हे बहुधा येथे अभिप्रेत असावे.

  संस्कृत साहित्यात कविकुलगुरू कालिदास आणि कवींनी लोकप्रिय केलेली ‘दोहद’ ही संकल्पनाही शिल्पबद्ध झाल्याचे दिसते. ती शालभंजिका या प्रकारातील शिल्पातूनच उद््भवली असावी, असे वाटते. दोहदाचे अनेक प्रकार साहित्यात वर्णिले आहेत. कालिदासाने ‘मालविकाग्निमित्रम्’मध्ये म्हटलेय - नवकिसलयरागेणाग्रपादेन बाला स्फुरितनरवरूचा द्वौ हन्तुमर्हत्यनेन । अकुसुमितमशोकं दोहदापेक्षया वा प्रणिहितशिरसं वा कान्तमार्द्रापिराधम् ।। (३.१२) एखाद्या पुरंध्रीच्या, सुभगेच्या लत्ता प्रहराने न फुलणारा अशोकही फुलायला लागतो अशी एक संकल्पना संस्कृत कवींना प्रिय आहे. वरील काव्यपंक्तीत म्हटलेय, की सुभगा दोघांनाच ठोकरू शकते; न सुफलित होणाऱ्या अशोकाच्या झाडाला, किंवा प्रेम दर्शविताना कचाट्यात सापडलेल्या कुषाण कलेत आणि काही ओडिशाच्या शिल्पातून दोहद हा प्रकार प्रकर्षित झालेला आहे. भार्हूत येथील सुदर्शना यक्षी जिने, वृक्षाला पायाचा विळखा घातला आहे, तीही याच पंक्तीतली आहे.

  udeglurkar@hotmail.com

Trending