आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गांधींच्या खऱ्या कामाचा विसर हीच चिंतेची बाब: डॉ. भटकळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर इंग्रजांचे राज्य होते, तरी कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्यलढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते. मात्र, याच कार्याचा आज समाजाला विसर पडला आहे. गांधींच्या विचारांचा विसर ही चिंताजनक बाब असल्याचे प्रतिपादन प्रख्यात गांधीविचारक आणि साहित्यिक डॉ. रामदास भटकळ यांनी केले वर्धा येथे बोलताना केले. 


महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्ताने सेवाग्रम आश्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघाची वर्धा शाखा आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था वर्धा यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित "गांधी विचार आणि मराठी साहित्य" या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षस्थानी होते. या वेळी सुप्रसिद्ध लेखक रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ उपस्थित होते. 


गांधी केवळ जनतेच्या भावनेला हात घालत नव्हते तर ते मानवी समूहाचे आणि समूहाच्या मानसिकतेचेही उत्कृष्ट अभ्यासक होते. गांधी वैज्ञानिक होते आणि बुद्धिवादीही होते. म्हणूनच आइनस्टाईन आणि बर्ट्रान रसेल गांधींबद्दल सतत आदर व्यक्त करतात. साधनांच्या वापरापासून तर साधन शूचितेपर्यंतचा गांधींचा प्रवास अवघड होता. गांधींच्या दृष्टीने धर्म म्हणजे नैतिकता. माणसाने आपला धर्म सोडू नये, असे जेव्हा गांधी म्हणत होते तेव्हा त्यांना रुढार्थाने धर्म म्हणायचा नव्हता, तर नैतिकतेचे प्रत्येकाने पालन करावे, इतकेच सांगायचे होते. सर्वांगीण विचार, सर्वोदय, सर्वहारांचे सुख हाच गांधीविचारांचा पाया आहे. म्हणूनच गांधी विचारांचा प्रभाव वर्षानुवर्षे जनमानसावर राहणार असल्याचे भटकळ म्हणाले. 


गांधी विचारांचा आजच्या काळात अन्वयार्थ लावणे आणि आजच्या तरुणांच्या प्रश्नांना गांधी विचारांशी जोडणे, ही काळाची गरज आहे. गांधींवरचे प्रभावी नाट्य अद्यापही निर्माण झाले नाही. मात्र ते ज्यावेळी रंगभूमीवर येईल तेव्हा लोकांचा प्रतिसाद अभूतपूर्व असेल. आगामी काळातील पर्यावरणवादी साहित्य हे गांधी विचारांनीच प्रेरित असेल, असे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सांगितले. 


श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे समयोचित भाषण झाले. डॉ. अजय देशपांडे यांनी समयोचित विचार मांडले. चर्चासत्राचे संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. इंद्रजीत ओरके यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. 

 

0