Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Dr. baba Amte share his experince

मांत्रिकाने रिजेक्ट केलेले रुग्ण बरे झाले तेव्हा आदिवासींना डॉक्टर काय ते कळलेडॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितला ४८ वर्षांचा रोमांचक प्रवास

विशेष प्रतिनिधी | Update - Dec 07, 2018, 08:39 AM IST

अठ्ठेचाळीस वर्षांच्या रोमांचक जीवन प्रवासाचे वर्णन

 • Dr. baba Amte share his experince

  औरंगाबाद- मांत्रिकाकडून रिजेक्ट झालेल्या मरणासन्न अवस्थेतील रुग्णावर उपचार करून आम्ही त्याला बरे केले तेव्हा आदिवासींना डॉक्टर म्हणजे काय ते कळले, असा व यांसारखे हृदयस्पर्शी अनुभव ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी गुरुवारी सांगितले. औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्वकर्मा सभागृहात गुरुवारी ५६ वा रेअर-शेअर कार्यक्रम झाला. त्या वेळी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील आदिवासी लोक ४८ वर्षांपूर्वी कसे होते कसे होते आणि आता तेथे कसा बदल झाला आहे, याचा रोमांचक प्रवास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी रेअर-शेअर कार्यक्रमात सांगितला. सोशल आंत्रप्रेन्युअर असा विषय त्यांना देण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी, मुलगा डॉ. दिगंत यांची उपस्थिती होती.

  शाळा, शेती आणि शिक्षण आले :

  गेल्या ४८ वर्षांत या भागातील आदिवासी कसे शिकले, पुढे गेले, आता तेथे शाळा, शेती आणि शिक्षण कसे फुलले हेही त्यांनी सांगितले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी केला. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली. प्रथमच विश्वकर्मा सभागृह कमी पडले. जागा मिळेल तेथे बसून लोक हा कार्यक्रम एेकत होते.

  अठ्ठेचाळीस वर्षांच्या रोमांचक जीवन प्रवासाचे वर्णन :

  सन १९७० मध्ये बाबा आमटे यांनी आनंदवनातून भामरागडला सहलीच्या निमित्ताने नेले आणि तेथील जबाबदारी टाकली. त्या काळात आदिवासींच्या अंगावर कपडेदेखील नव्हते, शेती कशी करायची ते माहीत नव्हते, शिक्षण तर कोसोदूर होते. आरोग्य सेवा नव्हती. मांत्रिक इलाज करायचे. कधी कोंबडे कापायचे, तर कधी नरबळी द्यायला लावायचे. जो रुग्ण मांत्रिक हतबल होऊन सोडून द्यायचा ते रिजेक्ट झालेले रुग्ण आमच्याकडे येऊ लागले. खाटेवर आडवा पडलेला, मरणासन्न अवस्थेत आलेला रुग्ण बरा झाला. तो उभा राहून चालत गेला तेव्हा तेथील आदिवासींना डॉक्टर म्हणजे काय हे प्रथम कळले.

  ती ओली बाळंतीण २५ किमी चालत गेली

  डॉ. आमटे म्हणाले की, मी आणि माझी पत्नी सर्जरी शिकलो, पण आम्ही काही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. पण, तेथे सर्व प्रकारची सेवा द्यावी लागली. गरोदर आदिवासी स्त्रियांचे बाळंतपण सुईणी करायच्या, पण अडलेल्या अामच्याकडे येऊ लागल्या. एकीचे पोटात बाळ आडवे झाले. शेवटचा पर्याय म्हणून ती आमच्याकडे आली. ४८ वर्षांपूर्वी त्या जंगलातून तिला नागपूरला नेणे शक्य नव्हते. अशा वेळी बाळ कापून तिचा जीव वाचवावा लागला होता. हा प्रसंग सांगताना आमटे यांचे डोळे पाणावले. नंतर पुन्हा गरोदर राहताच नऊ महिने व्यवस्थित उपचार करून तिचे बाळंतपण केले. आता आमची सून स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. त्यामुळे तेथे कुणावर अशी वेळ येत नाही, याचा आनंद आहे.

Trending