आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोई करीब से देखे तो हमको पहचाने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही बोचऱ्या शब्दांच्या वापराशिवाय थेट शब्दरचना करणाऱ्या, रूढार्थानं उर्दूतून कविता करणाऱ्या पहिल्या शायरा अदा जाफरी यांच्याबद्दल आज...

 

ज्यांच्या शायरीत शास्त्रीय शेर अर्थात पारंपरिक शेर आणि आधुनिक शेर यांचा सुंदर मिलाफ दिसतो त्या उर्दू शायरीतील प्रथम स्त्री म्हणजेच अदा जाफरी. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पर्व जेव्हा उच्च शिखराला पोहोचले होते तेव्हा म्हणजे १९४० मध्ये अदाजींच्या लेखनास प्रारंभ झाला. स्वातंत्र्य चळवळीचे पडसाद साहित्यातील लिखाणावर पडतच होते. अदा यांच्या शायरीत कुठल्याही शायराचे अथवा लेखकाचे अनुकरण नव्हते. अदा यांची शायरी मानवी भावना, संवेदना, जाणिवा यांनी ओतप्रोत भरलेली आहे. 


अदा यांचा जन्म आणि संगोपन एका कर्मठ व पुरातन विचारांच्या कुटुंबात झाले. जिथे स्त्रियाचं विश्व घराच्या चार भिंती आणि त्यातून दिसेल तेवढंच आकाश इतकंच मर्यादित होतं. अदाजींचा जन्म २२ ऑगस्ट १९२४ ला उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे झाला. अजीज जहाँ बेगम हे त्यांचे मूळ नाव. लहानपणीच पितृछत्र हरपल्यानं त्यांचं संगोपन त्यांच्या आजोळी झालं. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी लेखनास सुरुवात केली. सुरुवातीला अदा बदायुनी या नावानं त्या लेखन करत. १९४७ मधे नुरूल हसन जाफरी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांच्या शायरीत प्रियकराचं दु:ख आणि जगाचं दु:ख या दोन्हींचा उल्लेख आढळतो. उर्दूतील अख्तर शिरानी आणि असर लखनवी या दोन शायरांचे मार्गदर्शन अदा यांना लाभले. 


एक शमा बुझाई तो कई और जला ली
हम गर्दिश ए दौरँा से बडी चाल चले है

 

सुरुवातीस शाहकार, अदब ए लतीफ, रुमान या मासिकांमधून त्यांनी लिखाण केले. अदा या १९४७ पूर्वीच्या कवयित्रींपैकी एक अशा कवयित्री होत्या ज्यांना स्वातंत्र्यानंतरही खूप प्रसिद्धी मिळाली. १९५० मध्ये ‘मै साज ढूंढती रही’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, ज्यात रूढी-परंपरांबाबत त्यांची नाराजी जाणवते. त्यांच्या काव्यात अस्वस्थता व बंड करून उठण्याचे सामर्थ्य जाणवते.  


मैने घुटती हुई चिखो से सुने है नोहे
हाय वो अश्क जो पलकों से छलक भी ना सके

 

१९६७ मध्ये आशा, विश्वास यांची किरणं दिसावीत असा काव्यसंग्रह शहर ए दर्द प्रकाशित झाला. अदा यांच्या या संग्रहाबद्दल बोलताना फैज म्हणतात, अदा बदायुनी  जो साज ढूंढ रही थी वो गालिबन अदा जाफरी को शहर ए दर्द मे हाथ आ गया।’


नवीन ध्येयाकडे वाटचाल करण्याची उत्कट इच्छा व सतत प्रयत्न या काव्यसंग्रहात दिसून येतात. १९७४ मध्ये ‘गजाला तुम तो वाकिफ हो’ हा अदा यांचा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यात त्यांच्या शायरी लिखाणाचा एक वेगळाच पैलू उलगडला गेला. ज्यात अतिशय तिखट, परंतु सुसंस्कृत व गंभीर शब्दांतला अंदाज होता. यात त्यांच्या जीवनविषयक  दृष्टिकोनावर भाष्य करणारी  मस्जिद-ए-अक्सा ही कविता आहे. त्यात त्या म्हणतात,


हजारो कोस निगाहों से दिल की मंझिल तक
कोई करीब से देखे तो हमको पहचाने 

 

उर्दूतील प्रसिद्ध शायर हिमायत अली त्यांच्याबद्दल म्हणतात, ‘अदा जाफरी उन शायरो मे से नही है जो निसाइयत के इजहार को नुमाईश तक ले आती।’ अदा यांच्या शायरीत बोचऱ्या किंवा अपरिचित अशा शब्दांचा वापर नाही. 


भटक भटक के पहूँच ही रहेंगे मंझिल तक
निशान ए राह से बचकर कदम उठाते है

 

जीवनाचा अतिशय खोल अर्थ सांगण्याची अदा यांची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. आपल्या साज ए सुखन बहाना है या चौथ्या काव्यसंग्रहात त्यांनी जीवन आणि विश्व यांना केंद्रस्थानी ठेवत काव्यरचना केल्या. या काव्यसंग्रहात त्यांनी जपानी हायकू वापरून रचना केल्या आहेत. त्यांना आदमजी अदबी, तम्ग ए इम्तियाज, कमाल ए फन या अतिशय मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मार्च २०१५ मध्ये अदा यांनी जगाचा निरोप घेतला.

बातम्या आणखी आहेत...