आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शकीला बानो भोपाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.आसिया पटेल 

शकीला बानो यांच्याकडे भारताची महिला कव्वाल होण्याचा मान जातो. मोठ्या संघर्षांनंतर त्यांनी चित्रपटातही काम केले. या काळात महिलांनी स्टेजवर येणे किंवा कव्वाली गाणे हे खूप कमीपणाचे मानले जात होते. पण शकीला बानो यांनी भारतातही तसेच भारताबाहेरही कव्वालीचे शो केले.   


शकीला बानो यांचा जन्म ९ मे १९४२ ला भोपाळमध्ये अब्दुल रशीद खान यांच्या घरी झाला. त्यांचे वडील व मोठे काका शायरी करायचे. त्यामुळे त्यांना शायरी करण्याचा छंदच लागला. त्या म्हणतात शायरी करणे ही निसर्गाने दिलेली देणगी असेल तर मग ही  देणगी मला जन्मजातच मिळाली आहे, असं त्या म्हणायच्या. 

शकीला लहानपणापासून आपल्या वडील व काकाबरोबर मुशायऱ्यांमध्ये जायची. त्यामुळे त्यांना शायरी करण्याची शायरी समजण्याचा छंद लागला. हा छंद त्यांच्या प्रतिभेत रूपांतरित झाला व त्या शायरी करू लागल्या. घरातही शेर गुणगुणायची व हे गुणगुणणे गाण्यात रूपांतरित झाले. मग त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी अनेक  मोठमोठ्या शायरांची शायरी वाचली. त्यांची लहान बहीण व घरातील इतर सदस्यही त्यांना शायरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. 


‘उतरती जाती है जिस तरह चांदनी दिल में 
वो इस तरह मेरे दिल में समा गया या
रब’ 

साधेपणा आणि अर्थपूर्ण रचना हे त्यांच्या शायरीचे वैशिष्ट्य आहे. त्यांची स्मरणशक्ती खूप प्रभावी होती. एखादा शेर समजून घेणं हेच त्यांचं कौशल्य होतं. शेर सांगण्याची त्यांची हातोटी उत्तम होती. उच्चार स्पष्ट व बोलके होते, ते ऐकून, शेर ऐकण्याचा स्वाद द्विगुणित  होत असे. सुप्रसिद्ध कथालेखक राजेंद्रसिंग बेदी त्यांच्याबद्दल लिहितात, “उर्दू की नशर व ईशात में शकीला बानो एक अकादेमी की हैसियत रखती है।” 

शायरी, कव्वाली व थिएटर यांच्याशी त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते. कव्वालीने त्यांना समाजात खूप प्रसिद्धी दिली. नंतर त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. कव्वाली गायनात फक्त भारतातच नाही तर परदेशांतही त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम व्हायचे. शकीला बानो यांचे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी होते. शेरोशायरी, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा या सर्व गुणांमुळे अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना पाहणारे व एेकणारे सर्वच त्यांच्यामुळे प्रभावित व्हायचे. अनेक नामवंत लेखक गायक यांनी त्यांची प्रशंसा करत अनेक ओळी लिहिल्या आहेत. त्यांच्या कव्वालीबद्दल सुप्रसिद्ध लेखक अली सरदार जाफरी लिहितात : 

“शकीला बानो ने कव्वाली के जरीये उर्दू जबान और शायरी को आम हिंदुस्तानियों तक पहुंचाने का बड़ा काम किया है।” 

त्यांचे लग्न झाले पण ते लग्न टिकू शकले नाही. त्यानंतर त्यांनी बहिणीचा मुलगा दत्तक घेतला.  त्यांना भोपाळबद्दल खूप प्रेम होते. दरवर्षी २ महिने त्या भोपाळमध्ये राहायच्या. १९८४ साली भोपाळमध्ये वायुगळती दुर्घटना घडली त्याचा दुष्परिणाम त्यांच्या शरीरावरही झाला. 
 
त्यांना गाणी गाताना अडथळा निर्माण होऊ लागला. कोणत्याही गायकासाठी त्याचा आवाज जाणे हे एखाद्या मृत्यूपेक्षा कमी नसते. गाता न आल्यामुळे  त्यांची प्रकृती जास्तच खालावली व १६ डिसेंबर २००२ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.  

लेखिकेचा संपर्क : 8329550315
 

बातम्या आणखी आहेत...