आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अनिल कुलकर्णी


वैविध्यपूर्ण धागे एकमेकांत मिसळून महावस्त्र बनतं. मानवी मनाचंही असंच आहे. मात्रं माणसं आज एकमेकांशी संवाद साधत नाहीत, एकमेकाला विश्वासात घेत नाहीत, अलिप्त राहतात, शरीराने जवळ, पण मनाने मैलोगणती दूर. प्रत्येक जण जणू वेगळंवेगळं ठिगळ. ठिगळं जोडल्याशिवाय गोधडी नाही. काही वस्त्रं ठेवणींतील असतात. असंच एक महावस्त्र रेखा बैजल यांनी वाचकांसाठी आणलं आहे.

वस्त्र असू दे किंवा महावस्त्र असू दे, त्याच्या आत, शेवटी एक हाडामासांचा गोळा असतो, त्याला भावना असतात.अशा भावभावनांचा मनोव्यापार रेखा बैजल यांनी रेखाटला आहे. ज्ञात इतिहासात ज्या ज्या महामानवांनी समाजाला एकसंघ बनवण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांना हे पुस्तक अर्पण केले आहे. प्रत्येकाचे संस्कार वेगळे, तत्त्वज्ञान वेगळे, प्रत्येकाची गोधडी वेगळी, प्रत्येकाची ऊब वेगळी. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. संघर्षातून यश मिळवताना गोधडीचं महावस्त्र कधी होतं ते कळत नाही. महापुरुषाच्या संघर्षाची गोधडी जेव्हा यशाची होते, तेव्हा ते आपल्यासाठी महावस्त्र होतं. एखाद्याचा संघर्ष आपल्यासाठी दीपस्तंभ ठरतो. 

बालपणीचे ३ मित्र जेव्हा ४५ वर्षांनी भेटतात, तेव्हा त्यांच्यात झालेल्या सांस्कृतिक, सामाजिक बदलाचा ऊहापोह लेखिकेने केला आहे. प्रगतीने चंद्र कवेत घेतला तरी परंपरा अजून चिखलात रुतून बसलेली आहे. केवळ भौतिक प्रगतीने नव्हे तर नैतिक प्रगतीने समाज ओळखला जातो. ही कादंबरी जीवनाबद्दल वेगळा विचार करायला भाग पाडते, अस्वस्थ करते, हेच तिचं यश आहे. आजही परंपरा व सामाजिक बदल हातात हात घालून चालतात. कितीही भवताल  बदललं तरी मेंदूतील जळमटं साफ करणं अशक्य आहे. प्रत्येकाचं आयुष्य महावस्त्रच असतं, फक्त त्याची जाणीव आपल्याला नसते इतकंच. महामानवाच्या चारित्र्याचे अर्थ लावताना, संस्कृतीचे अर्थ लावताना लोकजीवनाचे स्वर पाहताना जे अस्वस्थपण लेखिकेला आले, त्यातून तीन मित्रांची कहाणी लेखिकेला लिहावी वाटली. संस्कृतीचे संदर्भ नक्की कोणत्या समाजाला,जातीला लावायचे? जीवन या सर्वापलीकडे उभे आहे, त्याला समजून घेताना संदर्भ केवळ निसर्गाचाच घ्यावा लागतो, पण बाकीचेही संदर्भ येतात. सोबत दुःख, विषमता, दूरस्थपण येतं. तीन मित्रांची ही कहाणी प्रातिनिधिक आहे. अत्यंत वेगळ्या स्तरातले हे मित्र, जीवन जगून हळूहळू झेरॉक्स व्हायला लागतं, कंटाळवाणं होऊ लागतं, वयाचा साधारण हाच कालखंड- स्थिरावलेपण, साचलेपण येऊ लागतं. जीव गुदमरू लागतो. कोणाचा जीव मध्यरेषेवर तोल सांभाळत जाताना घाबरा होतो, तर एकाने चळवळीत झोकून दिलं तरी हळूहळू फोलपण लक्षात येऊ लागतं. अशा वेळी परस्परांच्या आयुष्याबद्दल आकर्षण वाटू लागतं. या आकर्षणातूनच एकमेकांचे जीवन, समस्या, खाचखळगे  समजून घेतले जातात. ३ मित्रांबद्दल लिहिता लिहिता हे गोधडीचे महावस्त्रपण लेखिकेच्या लक्षात आलं. त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिताना लेखिकेने जीवनाचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. खरं तर ही कादंबरी मनोगतच आहे. परमेश्वराने इतर प्राण्यांहून अधिक क्षमतांचा अंतराय मानवाला दिलं. काही माणसं आकाशाएवढी उंच होतात, काही रसातळाला जातात हे सर्व माणसाच्या मनातच असतं. या सर्वाच्या मनाच्या वाटा धुंडाळत लेखिका हरवून जाते. स्वतःला शोधते.

माणसे एकमेकांपासून इतकी अलिप्त, विभक्त झालीआहेत की एकत्र येत नाहीत, आणि आली तरीही मन मोकळं करत नाहीत.सगळे प्रश्न जास्तकरून संवादाचे आहेत, वादाचे नाहीत. माणसांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांची दुःखं समजून ती कमी कशी करता येतील याचा विचार केला पाहिजे. महावस्त्रात  जशी कलाकुसर असते तसे कादंबरीत सुरेख, वास्तव, आशयपूर्ण वाक्यांची पेरणी आहे. दहादा अनुकंपणारं मन एकदाही कृतीतून अनुकंपा का  व्यक्त  करू शकत नाही? आपण आपल्या स्टेटस सेफ्टीमध्ये राहताना दरवाजे बंद करून बसलो आहोत. एव्हरी वॉल इज अ डोअर. दारं उघडायला हवीत. जन्म आणि जीवन यातला फरक लक्षात घ्यायला हवा. जन्म घेणे ही नैसर्गिक घटना,तर जीवनाचा शोध ही कला आहे. अशा प्रकारे लेखिकेचं अस्वस्थपण तत्त्वज्ञानाच्या अवकाशात घेऊन जातं. ही कादंबरी विषयात शिरायला, गुंतायला, विचार करायला, अस्वस्थ व्हायला भाग पाडते.  या कादंबरीतून जीवन प्रवाही आहे असं वाटतं. प्रातिनिधिक पात्रं घेऊन समग्र जीवनाचं चित्र रेखाटलं आहे.  माणसाला नक्की काय हवं असतं, याचं उत्तर या कादंबरीत सापडतं. 

लेखकाचा संपर्क : ९४० ३८० ५१५३ 

कादंबरी : महावस्त्र

लेखिका : रेखा बैजल


किंमत :   २८०
रु. 

पृष्ठ संख्या : १९८

प्रकाशन :  दिलीपराज प्रकाशन, पुण

बातम्या आणखी आहेत...