आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षाच्या मुशीतल्या असामान्य महिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अनिल कुलकर्णी  

डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेल्या "विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया' या पुस्तकांमधून ११ स्त्रिया, ज्यांची दखल इतिहासालाही घ्यावी लागली त्यांचा समर्थपणे घेतलेला धांडोळा आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अथांग समुद्रामधून विशिष्ट व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे म्हणजे ओंजळ अर्पण करण्यासारखेच आहे. सामान्यांची नोंद इतिहास घेत नाही, पण सामान्य जेव्हा संघर्षातून असामान्य बनतात तेव्हा त्यांची नोंद घ्यावीच लागते. अशा स्त्रियांची ओळख, ज्या मानवतेचा मंत्र देणाऱ्या कर्मयोगिनी आहेत, या पुस्तकातून होते. 
 
डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेल्या "विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया' या पुस्तकांमधून ११ स्त्रिया, ज्यांची दखल इतिहासालाही घ्यावी लागली त्यांचा समर्थपणे घेतलेला धांडोळा आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अथांग समुद्रामधून विशिष्ट व्यक्तिमत्त्वांची ओळख करुन देणे म्हणजे ओंजळ अर्पण करण्यासारखेच आहे. सामान्यांची नोंद इतिहास घेत नाही, पण सामान्य जेव्हा संघर्षातून असामान्य बनतात तेव्हा त्यांची नोंद घ्यावीच लागते. अशा अकरा स्त्रियांची ओळख, ज्या मानवतेचा मंत्र देणाऱ्या कर्मयोगिनी आहेत, या पुस्तकातून होते. अनेकांच्या यशोगाथा समाजासमोर येतच नाहीत. अनेक Unseen & Unsung Heroes आहेत. अनेक सामान्याचं वेगळेपण, सामर्थ्य याची नोंद होत नाही, त्यांचीही नोंद व्हायला हवी. इतिहासाचे देदीप्यमान संदर्भच देतात जीवनाला अर्थ. व्यक्तिमत्त्वाला जितके सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कंगोरे, संदर्भ असतील तितके व्यक्तिमत्त्व इंद्रधनु होते, परिपूर्ण होते. व्यक्ती ओळखली जाते ती अशा विशिष्ट संदर्भात... सामर्थ्यशाली व्यक्तिमत्त्वे बहुआयामी असतात, त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच नवीन व्यक्तिमत्त्वे उदयास येतात. स्त्रीत्वाला मोहोर येण्यासाठी, अंत:स्फूर्तीला बहर येण्यासाठी आदर्श व पोषक वातावरण हवेच. या पुस्तकातील ११ पैकी ५ जणी नोबेल पुरस्काराने सन्मानित आहेत, जो एक सर्वोत्कृष्ट सन्मान आहे. पुस्तकातील चरित्रांमुळे आपलं भान व ज्ञान वाढत जातं, जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, जीवनातील समस्यांना सामोरं जातांना स्फूर्ती, ऊर्जास्रोत आवश्यक असतं. जीवनाला वेगळेपणानं सामोर गेलं की, अनेक प्रश्नांची उकल होते. 
पुस्तकात समाविष्ट जागतिक पर्यावरणाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. वंगारी मथाई केनिया यांच्या मते "जोपर्यंत तुम्ही एखादे झाड लावत नाही, त्याला पाणी घालत नाही, त्याचे संगोपन करत नाही, तोपर्यंत तुमचे इतर सगळे भाषण बाष्फळ ठरते!' कुपोषणाचा बळी ठरलेल्या केनियाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवत सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रीन बेल्ट मुव्हमेंटमधून हरितक्रांती घडवणारे हे हिरवे नेतृत्व होतं. केनियासाठी देवदूत ठरलेल्या डॉ. वंगारी मथाई या उच्चविभूषित स्त्रीची जगभरात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून नोंद झाली आहे. पृथ्वीचे बाह्य आवरण हिरवे करण्याचे आणि निसर्ग संगोपनाचा वापर मानवाच्या कल्याणासाठी करण्याचे स्वप्न डॉ. वंगारी यांनी दिले. राजकर्मा संन्यासिनी आंग सान स्यूची यांचा म्यानमारमधील लढा अनेक पातळ्यांवर असामान्य, विलक्षण होता. मलालाच्या रूपाने पाकिस्तानामध्ये जणू सावित्रीबाई फुलेंनीच जन्म घेतला आहे. केवळ १७ वर्षांच्या असताना शांततेचे नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला, कर्तृत्वाला वयाचे बंधन नसते, हेच यावरुन सिद्ध होते. जर्मनीच्या शास्त्रज्ञ डॉ. अँजेला मर्केल संदेश देतात, "आपली अर्थसत्ता आणि समाज यांचे सार म्हणजेच स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्याशिवाय मानवी मनाला बंधनमुक्त नवनिर्मिती करता येणार नाही. त्या आपल्या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेच्या शिल्पकार आहेत.' मादाम मेरी क्युरी विज्ञान जगातील एक वलयांकित नाव. नोबेल पुरस्काराने दोन वेळा गौरवली गेलेली पहिली महिला संशोधक. जगाला रेडियम व पोलोनियमची बहुमोल देणगी देणारी मादाम क्युरी यांचे चारित्र अत्यंत प्रेरक आहे.

पृथ्वीतलावर अवतरणाऱ्या काही व्यक्ती देवाच्या दूत बनून येतात. मानवी कर्माच्या मर्यादा ओलांडून उच्च कोटीचे काम करतात. मदर तेरेसा यांचे स्वत:चे संपूर्ण आयुष्य सेवाधर्माला वाहून घेतले आहे. भारतरत्न, संतपद, नोबेल पुरस्कार, त्यांना बहाल करण्यात आले. या पुस्तकात समाविष्ट प्रियदर्शिनी इंदिरा गांधी या भारताचे पंतप्रधानपद भूषवणारी महिला. वृद्धांच्या सन्मानासाठी लढणारी संघर्षव्रती आयझेन पू (अमेरिका) तरुण चळवळीची कार्यकर्ती यांचाही पुस्तकात समावेश आहे. घरगुती काम करणाऱ्या स्त्रियांच्या अत्यंत दुर्लक्षित प्रश्नांकडे मोठा लढा उभारून त्यांनी स्त्रियांना कायद्याचे संरक्षण प्राप्त करून दिले. अमेरिका प्रशासनाने त्यांच्या आग्रही मागण्यांमुळे 'डोमेस्टिक वर्क्स बिल' पारित केले. 

सारी माणसं ही एकाच देवाची लेकरं आहेत हे आग्रहाने नमूद करणाऱ्या कॉमन सिव्हिल राइट‌्स चळवळीच्या जननी, रोझा पार्क्स हे दक्षिण अमेरिकेतील महत्त्वपूर्ण महिला नेतृत्व. समस्त मानवजातीला समान अधिकाराने जगण्याचा हक्क प्रस्थापित करणाऱ्या रोझा पार्क्स म्हणूनच जगातील मानवकल्याणकारी दूतच आहेत. "ओ  फॉर ओप्रा विनफ्रे' हे दूरदर्शनच्या क्षेत्रातलं अनेक विक्रम प्रस्थापित करणारं व्यक्तिमत्त्व. "टॉक शो' या दुर्लक्षित कार्यक्रमाला तिच्यामुळे चांगले दिवस आले. टाइम मासिकाने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार सलग ५ वर्षे जगातील अत्यंत प्रभावशाली व्यक्ती ठरली. पैसा, प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन मानवतावादी कार्यामुळे ओप्राला प्रिस्टन विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली. जेनेट मॉक या कृष्णवर्णीय ट्रान्सजेंडर स्त्रीने आपल्या अस्तित्वासाठी लढा दिला. जेनेटचा लढा प्रस्थापित समाजाविरुद्ध होता, सरकारविरुद्ध होता. त्याहीपलीकडे तो निसर्गाशी होता. ट्रान्सजेंडरसाठी तिने पुढे मोठी चळवळ उभी केली. ज्याची दखल टाइम मॅगझिनलाही घ्यावी लागली. 

एक संदर्भ, दुसऱ्या संदर्भाला जन्म देतो, एक यश दुसऱ्या यशाला जन्म देतं. त्याप्रमाणे या सामर्थ्यशाली वडाला, सामर्थ्यशाली पारंब्या येणार, असे आदर्श वड हेरण्याचं काम डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी केले आहे. अजून विस्तृत व इतर क्षेत्रातलं कार्य, याचा परीघ विस्तारता आला असता, तसेच या सर्व स्त्रियांच्या कर्तृत्वाचं आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये कसं साधर्म्य आहे, याची ओळख मांडता आली असती. 

> विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया 
> डॉ.ज्योती धर्माधिकारी
> साकेत प्रकाशन, औरंगाबाद
> पृ. संख्या २४० 
> किंमत -२५० रु.

लेखकाचा संपर्क - ६४०३८०५१५३