आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल माझा गुरू...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अनिल कुलकर्णी   गुगलशिवाय आज पान हलत नाही. गुगलमुळे आयुष्य सुकर झाले आहे. पूर्वी गुरूशिवाय पान हलत नव्हते. पूर्वी गुरूवर निष्ठा होती. गुरू ज्ञानाने समर्थ, संपन्न असत. गुरु-शिष्यांमध्ये नातं असे, संवाद असे.    आजकाल आपणच सर्वस्व, आपल्याला सर्वच माहिती आहे, अशी वृत्ती पाहायला मिळते. त्याच्यामुळे गुरू ही संकल्पनाच बहुतेकांना मान्य नाही.  आपण बोलू ती पूर्व दिशा. कोणत्याच प्रकारे आपल्या अडचणीसाठी गुरू नसून गुगल आहे. जिथे अडेल तिथे गुगल आहे. पुण्यातला गाडी चालवणारा कोलकात्यात गुगल सर्चने पत्ता शोधून मोबाइलच्या साह्याने  जाऊ शकतो. अनाकलनीय वाटत होते ते उघडणे गुगलने सरळसोपे केले आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा तर पूर्वी वडीलधारी माणसे किंवा ग्रुपची गरज लागायची, आज एका सेकंदात गुगल तुमच्यासमोर माहिती सादर करते. अनेक बाबतीत गुगलमुळे आज मानवी जीवन सुसह्य झाले आहे. तिळा तिळा दार म्हणायचा अवकाश की अलिबाबाची गुहा उघडते. गुरू चांगलाच मार्ग दाखवतो. अनेक प्रश्नांची जो उत्तरे देतो तो गुरू, आज अशी व्याख्याच झाली आहे. गुगलवरून माणसे शोधता येतात, पण त्यांच्या मनाचा तळ शोधता नाही येत. गुगल माझा गुरू का असू नये ? कारण कुटुंबात माणसेच कमी झाली आहेत. गोतावळा कमी झाला आहे, घरात सर्व निर्जीव यंत्रे मदतीला हजर, पण संवाद साधण्यासाठी कोणीच नाही.आईबाबांना काही विचारावं तर ते मोबाइलमध्ये गुंग. घरात तोंड उघडण्याची संधी मिळत नाही, कारण पूर्वीच्या सारखी भरलेली कुटुंबे राहिलीच नाहीत. आजोबांना त्यांच्या गोष्टी सांगण्याची संधी मिळत नाही. काका, मामा, मावशी, वडीलभाऊ, मित्र हीच मंडळी गुरूची भूमिका बजावायची.ते सर्व लुप्त झालं. माय मरो पण मावशी जगो यामधील मावशीही आता हद्दपार झाली आहे. मुलांना आत्या, काका, मामा, आतेभाऊ, मावसभाऊ, मावशी ही संकल्पनाच नाही, कारण माणसे एकमेकांना भेटत नाहीत, भेटली तर संवाद साधत नाहीत. माणसांचा सहवास दुर्मिळ झाल्यामुळे घरात कोणतंच संवादाचं  वातावरण न राहिल्यामुळे, सर्वजण आपापल्या मोबाइलमध्ये टीव्हीमध्ये रममाण झालेले आहेत. कुणाला विचारावे, काय विचारावे ही अडचण आहे.  एखादी संकल्पना समजून घ्यायची असेल, एखाद्या रोगाबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तर गुगलशिवाय पर्याय नाही. चंद्रावर यान, माणूस गुगलमुळेच गेला. चांद्रयानाचा संपर्क तुटला, गुगल गुरूंचा संपर्क तुटल्यामुळे, यान उतरले असेल पण संपर्क नाही. गुगलमुळे विज्ञान एका उंचीवर गेलं आहे. माणसाचे गुरू अनेक असतात. आई पहिली गुरू असते व नंतर शिक्षक आणि प्रसंगानुरूप आयुष्याच्या वाटचालीवर अनेक गुरू असतात. अनेक जण गुरूंवर श्रद्धा ठेवून जीवनाचा प्रवास  करीत असतात. गुरूच्या शब्दाबाहेर जात नाहीत. गुरू म्हणेल ती पूर्व दिशा, हे चांगलेच आहे, यामुळे व्यक्तिविकास होतो. आज  गुरू, गुरूसारखे राहिले का? एखाद्या गुरूवर निष्ठा ठेवावी आणि त्याची प्रतिमा आपल्यासमोर उद्ध्वस्त व्हावी, असे अनेक प्रसंग जीवनात घडत आहेत.  असे गुरू स्वतः आपल्यालाही उद्ध्वस्त करतात तेव्हा गुगलच साथ देतो, म्हणून गुगल माझा गुरू. एखाद्या व्यक्तीचा आदर्श यावर लेख पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या भानगडीची बातमी येते.फीड करू तसं आपल्याला गुगल  उत्तर देतो. आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून गुगलला प्रश्न विचारायला हवा.  गुरूची सेवा केल्यानंतर,  मार्गदर्शनाप्रमाणे मार्गक्रमण केल्यानंतर माणसे तालमीत तयार होत. संगीत शिकायला गेलेला, संगीत गुरूच्या आज्ञेनुसार शिकत जातो आणि ती कला अवगत करतो, समर्पणाची आवश्यकता होती. आज गुगल आपल्याकडून काही अपेक्षा नाही करत. गुरूमुळे आपण कौशल्य शिकत होतो. गुगलमुळे आज आपण आळशी झालो आहोत.  गुगल नसेल तर सर्व व्यर्थ, निष्क्रिय अशी परिस्थिती झाली आहे गुगलमुळे ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली आहे. गुगलमुळे माणसे व्यक्त व्हायला लागली, लिहायला व्यासपीठ मिळालं. स्वतःची कला, अभिनय, नृत्य, गाणं, चित्रकला, फोटोग्राफी जगभर पसरली. अनेक आशा, लता आहेत.हवाय तो आधार. हा आधार गुगल देतो. रेल्वस्थानकावर भीक मागणारी राणू मंडल, तिचा एक व्हिडिअो व्हायरल काय होतो व तिची दखल घेऊन तिला पैसे, घर सुबत्ता मिळाली, ती गुगलमुळेच. सूर जेव्हा भीक मागतो, तेव्हा यश दूर पळतं.   सूर जेव्हा गाणं म्हणतो, तेव्हा यश पळत येतं. गुगलमुळे माणसे देव झाली. गुगल आहे म्हणून आलबेल आहे. असा गुगल द्रोणाचार्य गुरूप्रमाणे तुमचा अंगठा मागत नाही, तर तुमची बोटे मागतो. गुरू असावा तर गुगलसारखाच...

लेखकाचा संपर्क : ९४०३८०५१५३

बातम्या आणखी आहेत...