आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट एका पातेल्याची...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अनिता मुदकण्णा

दोन वर्षांपूर्वीची एक सकाळ माझ्या आयुष्यात आपण किती खुजे आहोत याची अनुभूती देणारी होती. जी आजही स्मरणात आहे. 

रविवारची ती सकाळ, साधारण आठ वाजले असतील. मी घरासमोर झाडू मारत होते. इतक्यात एका जुन्या बाइकवरून आलेला तरुण अगदी माझ्यासमोरच उभा राहिला. स्मितहास्य केले. मला क्षणभर अवघडल्यासारखे झाले. तो म्हटला, “ओळखलंत का मॅडम?” मला कळेनासे झाले. मी म्हटलं,नाही ओळखले.” तो हसला. म्हणाला, ‘मॅडम, मी आपला विद्यार्थी.चार वर्षांपूर्वी आपल्या महाविद्यालयात होतो. त्या वेळी तुम्ही प्राचार्य होतात.” तशी मी ओळख दिल्याची खोटी कबुली म्हणून हसले, पण वास्तवात ओळखले नव्हतेच मुळी. पण सभ्यतेच्या संकल्पनेत आपल्याला तसं दाखवता येत नाही. मी सहज त्याला औपचारिक प्रश्न केला, “काय करतो सध्या?” तसा तो उत्तरला, “मॅडम भंगार गोळा करतोय, उन्हाळ्यात गाडीवर फळं विकतो, चाललाय संसार.” आता मात्र मला काय बोलावं हेच सुचत नव््तं. उच्च शिक्षणाची झालेली वाताहत पाहून अपराधी वाटायला लागलं, मी उगीच  हसले, माझ्यावर की या शिक्षणावर? हा प्रश्न मात्र अवघडच. जे आहे ते बरं चाललंय असा खोटाच आव चेहऱ्यावर आणला. पण आत मात्र एक द्वंद चालूच होते. काय उपयोग होतोय या शिक्षणाचा? भंगार गोळा करण्यासाठी उपयोग होतोय आपल्या तत्त्वज्ञानाचा? तशी मी निरुत्तरितच होते तेवढ्यात त्यानं आग्रह केला, “मॅडम, तुम्ही माझ्याजवळची एखादी वस्तू घ्या ना.” 

“ पण माझ्याकडे भंगार नाही की रे.” मी सांगून दिले, तसा त्यानं हट्ट केला,” विकत घ्या ना मॅडम.” मला नको म्हणता नाही आले आणि मी तयार झाले. एक छोटंसं पातेलं निवडलं आणि त्याचे किती पैसे झाले याची विचारणा केली. तसा तो हसत बोलला,” काही पैसे नाही मॅडम.” मला काहीच कळेना की असं आपण काय केलं याच्यासाठी. “ मॅडम, मला फीस भरायला एकशे पंचवीस रुपये कमी पडले होते.आपण दिले होते.

दिवाळीच्या सुट्टीत कपड्याच्या दुकानात ‘काम लावून देते’ हा शब्द पण दिला होतात त्या वेळी. “खूप छान वाटलं होत मॅडम मला तेव्हा, खूप आधार वाटला होता.आज मी तुमच्यासाठी काही तरी करू शकतो याचं समाधान वाटतयं” तो अगदी आनंदात बोलत होता. त्या दिवशी माझे शब्द मात्र मुके झाले होते, तो मला विचारांनी, कृतीनं खूप मोठा वाटत होता. आपण शिकलेल्या आणि शिकवलेल्या अनेक तत्त्वज्ञानांपेक्षा त्याचे मोठेपण, आपण किती खुजे आहोत याची जाणीव होत होती.
   
पदवी आणि पदांनी व्यक्ती मोठी होत नसते. ही फक्त अहंकाराला चिकटलेली देखणी रूपे असतात. खरा मोठेपणा तर तो आहे जिथे जाणीव जिवंत असते, आपल्याकडे आहे त्यातला थोडा हिस्सा देण्याची भावना असते.
  
आजही त्यानं दिलेलं पातेलं  दिसलं की  ती रविवारची सकाळ मनात उभी राहते आणि अभिमान वाटतो माझ्या विद्यार्थ्याचा आणि अनमोल भेट ठरलेल्या त्या पातेल्याचा...

लेखिकेचा संपर्क- ९९७०९४८८७३