Magazine / टेन्शन लेने का नै...

आजच्या मुलांंना सामाजिक परिस्थितीमध्ये जुळवून घेण्यात जी अडचण येते ती अडचण पालकांच्या थोड्याशा बदलांनी कमी करता येऊ शकते

डॉ. अपर्णा अष्टपुत्रे

Jun 18,2019 12:08:00 AM IST

आजच्या मुलांंना सामाजिक परिस्थितीमध्ये जुळवून घेण्यात जी अडचण येते ती अडचण पालकांच्या थोड्याशा बदलांनी कमी करता येऊ शकते. पालकांची चिंता कमी झाली की पालक आनंदी. आणि पालक आनंदी तर मुलंही आनंदी. मूल आनंदी असावं हेच खरं पालकांना हवं असतं. मग करूया चिंता कमी आणि जगूया आनंदी.

आजच्या गतिमान जीवनात इतक्या वेगानं बदल होताहेत की त्याचं आकलन होण्याआधीच गोष्ट घडून गेलेली असते. मग काळजी, भीती आणि चिंता. या बदलांना आपण कसेबसे ऍडजेस्ट करतो. पण मुलं हे कसं करतील अशी काळजी पालक म्हणून वाटते. या काळजीचं रूपांतर चिंतेत होतं. मग चित्रच बदलतं. चिंता वाढली की अस्वस्थता, अति प्रमाणात विचार, नकारात्मकता येते. पालकांमधली ही चिंता नकळतपणे मुलांमध्ये संक्रमित होते. चिंतातुर पालक मुलांपर्यंत जग चांगलं नाही, लोक चांगले नाहीत, सगळं अस्थिर आहे, भविष्य फार खराब आहे,अशी नकारात्मकता पोहोचवतात. याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर दिसतो. शाळेतल्या सामाजिक कार्यांत मुलं मिसळत नाहीत, स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. त्यांचे इतरांशी फारसे चांगले संबंध नसतात. अशा मुलांच्या वागण्याचा पालकांना ताण येतो. आपण मुलांसाठी खूप चांगलं वातावरण देत असूनही मुलं असं का वागतात हे लक्षात येत नाही.

स्वत:च्या चिंतेवर नियंत्रण
मुलांनी आनंदी जगाव वाटत असेल तर पालकांनी पहिल्यांदा स्वतःच्या चिंतेवर नियंत्रण आणावे. चिंता भविष्याची असते. माझ्या मुलाचं कसं होईल हा प्रश्न सतावत असतो. मात्र हा प्रश्न चिंता करून सुटणारा नक्कीच नाही. त्यामुळे जो प्रश्न लगेच सुटणार नाही त्याची काळजी कशासाठी?

व्यायाम करा
चिंता कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम सगळ्यात महत्त्वाचा आहे. व्यायाम केल्याने शरीरातील चयापचय सुधारते. चिंतेमुळे निर्माण झालेले नकारात्मक हार्मोन्सचा व्यायामातून निचरा होतो. सकस आहारामुळे शरीर तंदुरुस्त असेल तर मन कमी चिंता करते.

भावनेचाही व्यायाम करा
विचार, भावनेसाठी देखील व्यायाम गरजेचा आहे. कुठल्याही घटनेविषयी व्यक्तीविषयी अति विचार करू नका. मनात सतत विचार येत असतील तर ते कागदावरती लिहा आणि दुसरं काम हाती घ्या. दुसरं काम देखील असं निवडा की ज्यामध्ये विचार करावा लागेल. स्टॉप थॉट ही पद्धत यासाठी उपयुक्त आहे. यात विचारांना थांबण्यास सांगितले जाते प्रयत्नांनी आणि सर्वांनी हे हळूहळू जमायला लागते. क्रिएटिव्ह गोष्टींमधे ताकद वापरा.

स्पष्टपणे नकार द्या
पालकांनी चिंतेची सवय मोडण्यासाठी एक पथ्य पाळणं गरजेचे आहे ते म्हणजे स्पष्ट नाही म्हणण .ज्या गोष्टी चालणार नाहीत, जमणार नाहीत, होणार नाहीत त्यांना स्पष्टपणे नाही म्हणा. हे फक्त मुलांच्याच बाबतीत करावं असं नाही तर सगळ्याच ठिकाणी नाही म्हणता येणं फार गरजेचं असतं. नाही म्हणणं अवघड आहे. कारण नाही हा नकारार्थी शब्द आहे, यामुळे आपला स्वदेखील नकारात्मक होतो. पण नाही का म्हणायचं आणि नाही म्हणल्याचे फायदे जर लक्षात घेतले तर नाही चा स्व शी नकारात्मक संबंध जोडल्या जात नाही. योग्यवेळी नाही म्हटल्यास चिंता कमी होते.

मुलांसोबत मैदानी खेळ खेळा
मुलांविषयी चिंता कमी करण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे मुलांसोबत आठवड्यात न किमान एकदा कुठलातरी खेळ खेळा. हा खेळ मैदानी असावा. यामधून मुलांच्या क्षमता समजतात मुलांशी असलेलं पालकांचं नातंहे अधिक घट्ट होतं. पालक आणि मुलं यांच्यात संवाद निर्माण होतो.ज्या ठिकाणी संवाद आहे तिथे चिंता कमी दिसते.

X
COMMENT