आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलं ऐकतच नाहीत आमचं...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांना सूचना करायच्या असतील, काही सांगायचं असेल तर ते नेमकं कसं सांगावं हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. तेच सांगणाऱ्या पालकत्वाच्या काही युक्त्या आजच्या सदरात...

 

मुलं ऐकत नाहीत ही समस्या आज पालकांना आहे. या कडे  वेगळ्या दृष्टिकोनातून बघू या. मुलं ऐकत नाही म्हणण्यापेक्षा मुलांना कसं सांगावं म्हणजे ते ऐकतील असं म्हणूया. नियंत्रण करण्याच्या ऐवजी मुलांना पर्याय निवडायला सांगितले तर मुलं चांगल्या पद्धतीने ऐकतात. मुलांनी ऐकावं यासाठी पुढील काही गोष्टी करता येतील.
स्वातंत्र्य-नियंत्रणाचा समतोल :  प्रथमत: कोणत्या गोष्टी मुलांनी केल्याच पाहिजे हे पालकांनी ठरवलं पाहिजे. असे कोणते वर्तन आहे जे अगदी त्याच पद्धतीने नाही केले तरी चालेल हेही शोधले पाहिजे. यामुळे मुलांच्या लक्षात येईल की काही गोष्टी विशिष्ट पद्धतीनेच करायच्या आहेत, त्याला पर्याय नाही. तर काही वर्तन करताना त्यांच्याकडे पर्याय आहे. यामुळे स्वातंत्र्य आणि नियंत्रण या दोन्हीचा समतोल साधता येईल.

 

मोजक्या शब्दांचा वापर :

सूचना काही सांगणं नेमक्या, मोजक्या शब्दात  सांगा. छोट्या, ठाम वाक्यात मुलांना सूचना द्या. मुलांना सूचना देताना खूप जास्त स्पष्टीकरण, कारणं देण्याची गरज नाही. स्पष्टीकरण देताना मुलं पालकांना शब्दात पकडू शकतात.


समजलं का मी सांगितलेलं...? :

मुलांना सूचना दिल्यानंतर त्यांना काय समजलं हे विचारा. पालकांना जे सांगायचं आहे नेमकं तेच मुलांना कळलं आहे का हे यातून स्पष्ट होतं. बऱ्याचदा पालक एक सांगतात, मुलांना अर्थबोध वेगळा होतो. यातून मुलांना वाटतं आपण पालकांचा ऐकलंय. त्याचं  ऐकूनही ते आनंदी नाहीत मग कशाला ऐकायचं असा विचार मुलं करतात.
तुम्हीही मुलांचं ऐका : मुलांनी ऐकावं असं जर पालकांना वाटत असेल तर पालकांनी देखील मुलांचं ऐकलं पाहिजे. ज्यावेळेस मुलं पालकांना काही सांगत असतात त्यावेळेस लक्ष देऊन ऐका. मुलं पालकांचं अनुकरण करतात. मुलांचं म्हणणं पटत नसलं तरी ते ऐकून घ्या. संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला ते पटलं, नाही आवडलं असंच थोडक्या शब्दात मुलांना सांगा. 


सकारात्मक वाक्यात सूचना :

सूचना या सकारात्मक वाक्यांमध्ये द्या. हे करू नको,तू पडशील, तुला लागेल,तुला जमणार नाही, असं म्हणण्यापेक्षा त्यांनी काय करावं हे सांगा. तू हे का नाही करून बघत, चालताना लक्ष दे, प्रयत्न करून बघ, असे वाक्य वापरल्यास मुलं ते ऐकतात. सकारात्मक सूचना मेंदू  अधिक चांगल्या पद्धतीने ग्रहण करतो.
सतत टोचणी देऊ नका : मूल आपलं असलं तरी ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, त्याला त्याचे विचार, भावना आहेत, हे विसरू नका. मुलं सगळच ऐकतील असं नाही. काही गोष्टी मुलांनी नाही ऐकल्या तरी त्याची टोचणी मुलांना सतत पालकांनी देऊ नये. “तू ऐकतच नाही, तू नेहमी असंच करतो” अशी वाक्यं अजिबात टाळावीत.