Magazine / ...हमे ये सिला मिला

आपल्या लिखाणातून वाचकाला भविष्याचा प्रकाश दाखवणाऱ्या जेहराजींबद्दल आजच्या भागात...

डॉ. आसिया पटेल

Jun 18,2019 12:06:00 AM IST

स्त्री मनातील भावभावनांना व्यक्त करतानाच सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भान राखणाऱ्या, ते भान लिखाणातून धीटपणे मांडणाऱ्या जेहरा निगाह. आपल्या लिखाणातून वाचकाला भविष्याचा प्रकाश दाखवणाऱ्या जेहराजींबद्दल आजच्या भागात...

१९५० नंतरच्या काळातील यशस्वी शायरांच्या यादीतील एक प्रमुख नाव म्हणजे जेहरा निगाह. जेहराजींनी लेखनाची सुरुवात जरी गझलेपासून केली असली तरी नंतर कवितांच्या रचनांनी त्यांनी आकर्षित केले. त्यानंतर त्यांनी नज्म हा काव्य प्रकार खूप चोखंदळपणे हाताळला. त्यांच्या शायरीत त्यांच्या आणि समाजाच्या भावना व अनुभव यांची मांडणी समाविष्ट दिसते.याशिवाय त्यांच्या कवितेत प्रेमाची घटना, राजकारणातील घातपात, ममतेची भावना, स्त्रियांची विवशता हे विषयसुद्धा त्यांनी हाताळले. त्यांच्या विषयांच्या याच वैविध्यामुळे इतर कवयित्रींपेक्षा वेगळी अशी त्यांची ओळख निर्माण झाली.


इस रहगुजर मे अपना कदम भी जुदा मिला
इतनी सऊबतो का हमे ये सिला मिला

सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराण्यात १४ मे १९३७ ला जेहराजींचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव फातेमा जेहरा. त्यांच्या वडिलांची खमर मकसूद यांची बदायँूच्या सुप्रसिद्ध लोकांमध्ये गणना होत असे. फाळणीनंतर हे कुटुंब कराची येथे स्थायिक झाले. तिथेच जेहराजींचे शिक्षण पूर्ण झाले. नंतर अमेरिका, लंडन इथं त्यांचे वास्तव्य अधिक असे. लेखन प्रतिभा ही जेहराजींना वारसा म्हणून मिळाली होती. वयांच्या अकराव्या वर्षी त्यांनी गुडीया-गुड्डे की शादी ही कविता लिहिली. जिगर मुरादाबादी यांना जेहराजींनी गुरू मानले, तर फैज अहमद फैज यांच्या कवितेतून प्रेरणा घेतली. अगदी कौटुंबिक विषयांपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांनी कविता लिहिल्या. त्यांना परिस्थितीचे भान होते आणि ते त्यांना समजत होतं याची प्रचिती जेहराजींच्या अनेक रचनांमधून आपल्याला येते.


औरत के खुदा दो है
हकीकी और मजाजी
पर उसके लिए कोई भी अच्छा नही होता


स्त्रियांच्या भावना जेहराजींनी अतिशय तरलतेनं लेखणीतून व्यक्त केल्या. त्यांच्या काव्यातून हवा आणि वातावरण बदलाच्या कल्पनेचे स्त्री मनावर होणाऱ्या बदलाचीही दखल घेतली गेली.


तुम ने बात कह डाली, कोई भी न पहचाना
हम ने बात सोची थी, बन गए है अफसाने


स्त्री-भ्रूणहत्येसारख्या ज्वलंत विषयावरची त्यांची कविताही खूप प्रसिद्ध आहे. एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करताना त्या म्हणतात,


मै बच गई माँ, मै बच गई माँ,
तेरे कच्चे लहू की मेहंदी
मेरे कोर कोर मे रच गई माँ


जेहराजींनी फैज अहमद फैज यांच्यावरही काही पुस्तकं लिहिल्याचे उल्लेख सापडतात. गझल, नज्म याबरोबरच त्यांनी दूरदर्शनसाठी नाटकंही लिहिली. गीतं लिहिली. भारतीय संस्कृतीचं वर्णन त्यांच्या अनेक रचनांमधून दिसतं. आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवरील जुर्म ए वादा, इक पुरानी कहानी, जुनूबी अफ्रिका, दिवार, व्हिएतनाम या कविता खूप प्रसिद्ध झाल्या. शाम का पहला तारा, फिराक, वरक हे त्यांचे प्रसिद्ध काव्य संग्रह. रचनांमधून आत्मविश्वास आणि उद्याचा प्रकाश दाखवणाऱ्या जेहराजींना त्यांच्या साहित्यामधील योगदानाबद्दल राष्ट्रपती पदक आणि अल्लामा इकबाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे.

X
COMMENT