आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहपुरुषांच्या स्मारकाचा संकल्प पाच वर्षात पूर्ण, बाबासाहेबांच्या स्मारकाला झाली अक्षम्य दिरंगाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर मगर   चैत्यभूमी परिसरात इंदुमिलच्या साडे बारा एकरवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम आता सुरू झाले आहे. राज्य शासनाने त्यासाठी ७६३ कोटींची तरतूद केली आहे. स्मारकाच्या निर्मितीसाठी शापूरजी पालनजीला काम दिले आहे. स्मारकात १०६.६८ मीटर (३५० फुट) बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. गुजरातच्या ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ च्या तुलनेत ७५.३२ मीटरने (२४७ फुट) उंची कमी असणार आहे. विशेष म्हणजे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर अ‌वघ्या पाच वर्षांतच पटेलांचे जगातील सर्वाधिक उंच पुतळा उभा राहिला. बाबासाहेबांच्या स्मारकाला मात्र भूमिपूजनानंतर चार वर्षांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे स्मारक पूर्ण होण्यासाठी वर्ष-२०२२-२३ उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतर महापुरुषांप्रमाणे बाबासाहेबांचेही जागतिक दर्जाचे स्मारक मुंबईत असावे अन् त्यासाठी चैत्यभूमीच्या परिसरातील साडे बारा एकर जमीन सरकारने द्यावी अशी आंबेडकर अनुयायांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी  आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात ६ डिसेंबर २०११ रोजी इंदु मिलचा ताबा घेण्याचे प्रतीकात्मक आंदोलन केले गेले. त्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने जमीन देण्याचे मान्य केले. पुढे २०१४ दरम्यान केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाले. नॅशनल टेक्सटाइल्स कॉर्पोरेशन अर्थात एनटीसीच्या ताब्यातील जमीन राज्य सरकारला ७ ऑक्टोबर २०१५ रोजी हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर मोदींनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी एमएमआरडीएच्या मैदानावर भूमिपूजन झाल्याचे जाहीर केले. वास्तविक पाहता त्यानंतर त्वरित काम सुरू झाले असते तर तीन वर्षांत अर्थात २०१८ दरम्यान स्मारक तयार झाले असते. पण अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करत ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शापूरजी पालनजीला कार्यादेश दिले. त्यांनी आता सहा महिन्यापर्वी कामाला सुरुवात केल्याची माहिती आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाची किंमत, उंची अन् गतीची तुलना जर मोदींच्या ड्रिम प्रोजेक्ट लोहपुरुष वल्लभभाई पटेेलांच्या स्मारकाशी केली तर झालेली दिरंगाई अधोरेखित करता येईल. न्यूयॉर्क येथील ९३ मीटरचे (३०५ फुट)  ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’ २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उभारले होते. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या तुलनेत बाबासाहेबांचे स्मारक असलेले ‘स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी’ पुतळ्याची उंची १०६ मीटर करण्याची घोषणा ३० डिसेंबर २०११ रोजी केली होती. ११ मीटरने उंची वाढली की, जगातील सर्वाधिक उंच पुतळा बाबासाहेबांचा होईल अशी त्यांची इच्छा होती. मात्र गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदींनी आनंदराज यांच्या घोषणेनंतर दोन वर्षांनी ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ची घोषणा केली.  न्यूयॉर्क येथील ‘स्टॅच्यु ऑफ ‘लिबर्टी’ उंचीच्या तुलनेत दुप्पट अर्थात १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा मोदींनी ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी केली. एवढेच नव्हे तर तो संकल्प त्यांनी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी अनावरण करून पूर्ण देखील केला. पाच वर्षांत ३ हजार कोटींचे स्मारक उभे राहिले. पण ११ ऑक्टोबर २०१३ रोजी भूमिपूजन केलेल्या अन् ७६३ कोटींच्या खर्चाचे बाबासाहेबांचे स्मारक मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. पाच वर्षांनी काम सुरू झाले खरे पण स्मारक पूर्णत्वास येण्यासाठी आणखी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.   इंदुमिलचा घटनाक्रम

  • ६ डिसेंबर २०११ : इंदुमिलचा ताबा
  • २७ डिसेंबर २०११ : निर्णयासाठी बैठक
  • २९ डिसेंबर २०११ : आघाडीने केली वरळीच्या जाहीर सभेतून घोषणा
  • ३१ डिसेंबर २०११ : पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या घरी बैठक
  • १९ मार्च २०१३ : जमीन हस्तांतरित
  • ११ ऑक्टोबर २०१५ : मोदींच्या हस्ते भूमिपूजन
  • २५ ऑगस्ट २०१५ : राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
  • ९ फेब्रुवारी २०१८ : कार्यादेश दिले
  • २०२१-२२ : स्मारक होईल