आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीबाईचा माॅल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचा रविवार एक वेगळेपण घेऊन आला. नेहमीच्या सवयीप्रमाणे आम्ही दोघं श्री व सौ आठवड्याचा बाजार घेऊन घरी परत आलो तर घराच्या गेटजवळ उभं असताना एक आजीबाई डोक्यावर टोपली आणि हातात काही बॉल घेऊन चढत्या उन्हात आमच्या कॉलनीत विक्रीसाठी पायी येत होत्या. त्या आजीबाईंनी आम्हा दोघांचंही लक्ष वेधून घेतलं तसं एकाच वेळी आम्ही आजीला आवाज दिला. आजीबाई लगोलग जवळ आल्या आणि स्वतःच्या शैलीत, काय घेता? असं विचारत डोक्यावरची टोपली माझ्या मदतीने खाली टेकविली.


आजीबाईच्या त्या टोपलीत बऱ्याच वस्तू म्हणजे प्लास्टिकचे गोठ- सुया -पिना - पोत- कंगवे, केसांच्या वेणीसाठी रबर-बो, क्लचर आदींसह लहान मुलांच्या खेळणी आणि बॉलदेखील होते. खरं तर आम्हां दोघांनाही काहीही घ्यावयाचे नव्हते, परंतु आजीकडून काहीतरी घ्यायला हवं असं वाटलं म्हणून आम्ही बॉलकडे बोट दाखवत हा कितीला असं विचारताच आजीने टोपलीतून वेगळा करीत तीसला म्हणत हातात दिला. मीही तो घेतला आणि आजीला पैसे दिले. पैसे देताना सहज औपचारिकता म्हणून आजीशी चौकशीवजा संवाद साधला. आजीने सांगितलं, तिला सहा मुलगे, सर्वच ‘म्हमईला’ साहेब असून तिथेच राहतान. सगळीच माझी खूप काळजी घेतात, परंतु हे मी माझ्यासाठी करते, असं म्हणाली. तसेच आजीच्या आईला एकूण १० मुले म्हणजे आजी नऊ भावात एकटीच बहीण असल्याचेही सांगितले.


या वेळी माझी अठरा वर्षीय मुलगी दर्पणही माझ्यासोबत उभी होती. आजीबाईने तिच्याकडे बघत मला विचारले, तुझी पोरगी? मी होकार भरला. आजीबाई म्हणाली, माझ्या ‘ज्योती’सारखीच आहे. आजीबाईने पटकन तिच्या टोपलीत हात घातला आणि केसांना लावायचे ‘बो’ असलेले एक पूर्ण पाकीट मुलीच्या हातात दिले. पाकीट देताना आजीबाईने विचारले, ‘पहिली का? मी म्हटलं नाही, ही लहान आहे, हिच्यापेक्षा एक मोठी आहे. तशी आजीबाई म्हणाली, म्हणजे दोनी पोरीच का? अन् पोरगा नाही? मडकं कोण धरील? जावई कशाला करील?


खरंच स्त्री शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाचा अर्थ पुरुषांना कळणंही गरजेचं आहे. काही क्षणांत आपलंसं करणारं आजीबाईचं प्रेमळ बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. आजीच्या डोक्यावर तिची टोपली परत ठेवताना माझ्यातला शिक्षकही जागाच होता. मी म्हणाले, आजीबाई काय करायचा गं पोरगा. अगं, आता पोरीच सर्व काही करतात आणि त्याच करतील. आणि हो, कशाला जाळायचा हा देह, दवाखान्याला दान देऊन टाकायचा. असं ऐकताच निघता-निघता आजीबाई पुटपुटली, ही आजची पोरं.


आजीबाईच्या त्या येण्याने आम्ही दोघंही लहानपणाच्या आठवणीत गेलो. लहानपणी अशीच दारोदारी फिरणारी सुया-पोती घ्या अशी आवाज देणारी बाई झपकन डोळ्यांसमोर उभी राहिली, डब्याचा सिनेमावाला आठवला, वेगवेगळी आकार करून देणारा कडाकडीवाला आठवला, नरडे -शोले -बुढी के बाल असं खूप खूप काही आठवलं. ते सर्व मुलीलाही सांगितलं.


आजीबाईचा मोठेपणा माझ्या मुलीवरही प्रभाव टाकून गेला. तिच्यासाठी सहज म्हणून घेतलेला तो बॉल मुलीने आमच्या घराशेजारी होत असलेल्या बांधकामावर असलेल्या मजुरांच्या लहान मुलांना खेळायला दिला व त्यांच्या खेळाचा आनंद खिडकीतून घेतला.
आजीबाई खरंतर अंतराने दूर गेली होती, मनाने ती सोबतच राहिली. आजीबाईची टोपली म्हणजे आजीचा मॉलच होता. फरक एवढाच की मॉल एकावर एक फ्री देते परंतु त्याची ‘किंमत’ कशी वसूल करते ते कळू देत नाही पण आजीबाईने मुलीला दिलेल्या ‘एकावर एक फ्री’ची किंमत होऊच शकणार नाही.


डॉ. बंदिनी खडकीकर, औरंगाबाद
drbandinipremkhadkikar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...