आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरी वारीमागचे भारतीय मानसशास्त्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारी म्हणजे आवर्तन.  वारकरी म्हणजे स्वतःच्या दुर्गुणांवर वार करणारा, स्वतःच्या शोधार्थ  निघालेला यात्रेकरू हे विवेकनिष्ठ विचार पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण. वारी हा स्वतःकडे नेणारा प्रवास आहे. याच प्रवासातल्या वारकऱ्याच्या मानसशास्त्राचा मागोवा घेऊ पाहणारा हा लेख...
 

 

मानसशास्त्र विषय हा तसा युनिव्हर्सल आहे, जिथे जिथे माणसं तिथे तिथे तेच मनाचे शास्त्र लागू पडेल. 
वारीमागचं मानसशास्त्र हा असाच अभ्यासाचा विषय. कुठला असा  एक धागा आहे जो एका प्रचंड  समुदायाला एकत्र बांधतो? एनजीओ, खासगी किंवा सरकारी संस्था यांची मक्तेदारी नसलेल्या  या समूहाचं  व्यवस्थापन कसे  इतके व्यवस्थित होते? इतका मोठा जनसमुदाय एकत्र असतानाही संसर्गजन्य आजाराचे साम्राज्य का फारसं दिसत नाही? या आणि यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं या प्रश्नाचा अभ्यासक म्हणून बघितल्यास आपल्याला भारतीय अध्यात्मात दिसतील.


पाश्चात्त्य देशांतील मानसशास्त्राचा पाया भौतिक जग आहे. आणि भारतीय मानसशास्त्राचा पाया अनुभव पातळीवर आणि भौतिक जगाला भेदणारा असा आहे. मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणामध्ये  सुप्त वासनांना (त्यामध्येदेखील कामवासनांना) प्राधान्य दिले. फ्रॉइड यांनी जाणीवयुक्त मन (conscious mind) आणि नेणीवयुक्त मन (unconscious mind) यांच्या क्रिया-प्रक्रियांच्या पलीकडे जाऊन मनाचे विश्लेषण करून अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्यांना असे आढळले की, नाना कारणांनी  रोगी आपल्याच वासना किंवा इच्छा दाबून टाकतात. त्या वासना, इच्छा प्रामुख्याने कामुक स्वरूपाच्याच असतात आणि त्या कामवासना या लाजेमुळे, लोक काय म्हणतील  या भीतीमुळे  दाबून टाकल्या जातात नेणिवेच्या अंधारात!


भारतीय मानसशास्त्राचा अभ्यास मात्र उपभोगापलीकडे जाऊन विचार करण्याची प्रेरणा देतो. विष्णू कृष्णमय दैवत्व म्हणजे भागवत धर्म आणि जेव्हा विष्णू कृष्णमय विठ्ठलरूपामधे रूपांतरित होतो तेव्हा सुरू होतो वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे देवासोबत संत आणि प्राणिमात्रांना दिलेले समान महत्त्व.  वारकरी संप्रदायात द्वैत आणि अद्वैत, सगुण आणि निर्गुण यांचा कमालीचा मिलाफ पाहायला मिळतो. याचे उदाहरण म्हणजे विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक एकत्र येतात खरे,  पण विठ्ठलाच्या मूर्तीत न अडकता प्रत्येक माणसामध्ये माउली पाहबन तृप्त होतात. वारी म्हणजे आवर्तन आणि वारकरी म्हणजे स्वतःच्या दुर्गुणांवर वार करणारा, स्वतःच्या शोधार्थ  निघालेला यात्रेकरू. वारीचा काळ हा शेतीकामासाठी अतिशय आवश्यक, पण तरीही वारीसाठी येणारे वारकरी मनात असणाऱ्या विठ्ठल भक्तीत मिळणाऱ्या आत्मिक शांततेसाठी चालताना दिसतात. वर्तमानात आनंदाने राहायला शिकवणारी वारी ही विवेकनिष्ठ विचार मनात जोपासल्याशिवाय जमेल कशी? स्व-स्वीकार आणि तुझे आहे तुजपाशी हे शिकवणारी वारी एक अविस्मरणीय थेरपी आहे. फक्त गरज आहे ती अभ्यासपूर्वक काही गोष्टी अनुभवण्याची. वारी हा स्वतःकडे नेणारा प्रवास आहे.एखादी गोष्ट शिकायची असल्यास काही पूर्वतयारी करावी लागते. त्यामध्ये पूर्वग्रहदूषित न राहता एखाद्या गोष्टीचे निरीक्षण म्हणजे निवृत्ती. त्या गोष्टींच्या निरीक्षणानंतर त्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे आकलन, म्हणजे ज्ञानदेव. त्या ज्ञानाचा सर्वोपरी कल्याणासाठी वापर म्हणजे सोपान. आणि ज्ञान प्रसारानंतर, कल्याणानंतर कशातही न अडकता आलेली अनुभूती म्हणजे मुक्ताई तर नसेल ना? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या पायऱ्या आहेत “आपणच ब्रह्म आहोत”  हे जाणून घेण्याच्या. आत्मपरीक्षण हा मुळात वारकरी संप्रदायाचा गाभा आहे.

बातम्या आणखी आहेत...