आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात पुरवणी आरोपपत्र, तपास यंत्रणांची हायकोर्टात माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती सीबीआय आणि राज्याच्या विशेष तपास पथकाने मुंबई हायकोर्टात दिली. या दोन्ही हत्या प्रकरणात आणखी काही आरोपींची अटक झाल्याने पुरवणी आरोपपत्रे दाखल करावी लागणार आहेत. मात्र फक्त आरोपपत्रे दाखल करून चालणार नसून देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेकडून त्यापेक्षाही अधिक प्रगतीची अपेक्षा असल्याचे मत हायकोर्टाने नोंदवले. विशेष म्हणजे हे भाष्य करताना कोर्टाने पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि स्थानिक पोलीसांदरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींचाही उल्लेख केला.

 

दाभोलकर-पानसरे हत्याकांड प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही तपास यंत्रणांनी आपापल्या तपासाचा प्रगती अहवाल कोर्टात सादर केला. सीबीआयच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अनिल सिंग यांनी सांगितले की, दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक करण्यात आली असून त्या दोघांविरोधात येत्या 13 फेब्रुवारी रोजी पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे. तर पानसरे हत्या प्रकरणातही आणखी तिघांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणीही येत्या 12 फेब्रुवारी रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने कोर्टाने दिली. तसेच या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक करण्यावर तपास यंत्रणेने लक्ष केंद्रीत केल्याचीही माहिती विशेष तपास पथकामार्फत देण्यात आली. मात्र त्यावर काहीशी नाराजी व्यक्त करत, देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेकडून यापेक्षा अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे निरिक्षण कोर्टाने नोंदवले. अशा महत्वाच्या प्रकरणात तपास यंत्रणा नेमक्या काय करत आहेत, यावर अवघ्या जगाचे लक्ष असते. तसेच सोशल मीडियामुळे आता कोणती यंत्रणा काय करत आहे, हे लगेचच सर्वतोपरी होते. पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींबाबत आपल्याला हा प्रत्यय आलाच आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सीबीआयला फटकारले. तसेच देशातील सर्वोच्च तपासयंत्रणेने आपली पत स्वत:च सांभाळायला हवी, असा सल्लाही यावेळी कोर्टाने दिला.

 

तसेच या दोन्ही तपास यंत्रणांनी फरार आरोपींच्या शोधासाठी आपल्या तपासाची व्याप्ती अधिक प्रगल्भ करण्याची गरज असल्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली. कारण ज्या अर्थी आरोपी इतकी वर्षे मोकाट आहेत, त्याअर्थी त्यांना कुठून तरी सारी रसद पुरवली जात आहे, या आपल्या मताचा पुनरुच्चारही यावेळी कोर्टाने केला.

बातम्या आणखी आहेत...