दा ख ला

Apr 02,2019 10:10:00 AM IST

वैद्यकिय व्यवसाय म्हणजे खोऱ्यानं पैसा असा सर्वसाधारण समज असतो. मात्र, आपण एखाद्याला केलेली छोटीशी मदतही कुणाच्यातरी आयुष्यात फार मोठा बदल घडवू शकते. यावर विश्वास ठेवत गरीब म्हातारीला मदत करणाऱ्या डॉक्टरचा हा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो.

त्या दिवशी रविवार होता. रविवार म्हणजे सुटीचा दिवस असला एरवी तरी वैद्यकीय क्षेत्रात सुटीचा दिवसच नसतो. अपघात कक्ष म्हणजे दवाखान्यातील 24 तास सुरू राहणारी जागा. अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होतो तेव्हाची गोष्ट. अपघात कक्षात रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2 अशी ड्यूटी सुरू होती. सकाळची वेळ होती, रुग्ण जरा कमीच होते. तेवढ्यात साधारण 75 वर्षे वयाची एक आजी समोर येऊन उभी न राहता जमिनीवरच बसली. हातात काही कागदं होती. ती सगळी कागदं तिनं माझ्या हातात दिली. सगळ्या कागदांवर मी नजर फिरवली. सी.टी. स्कॅनचा रिपोर्टही त्यात होता.

“आजी काय झालं? कोणाला दाखवायला आणलं?” मी विचारलं.
“माया मानूस व्हय बापा. डोक्यात लय दुखते म्हनते तं हे मशिन लावून तपासलं अन् गोया देल्या लिहून त्या इथं नाई म्हनते बाहेरून घ्या लागते. पैसा नाई बापा, बुडा लय शिव्या देते. गपगुमानं आयकुन घेतो. देव त्याचे डोळे मिटत नाई, का मले वर नेत नाई. याले जाले पैसे लागते तं आनतो शेजारीपाजारी उसने मांगून. गोया घ्याले गेली तं अडीचशे रुपयाच्या होते म्हने. म्या म्हटलं शंभरात जेवड्या भेटतीन तेवड्याच दे.”

“आजी, मग आता डॉक्टरांनी आजोबांना गोळ्या लिहून दिल्यात तर या गोळ्या बरोबर देत जा. आता त्यांना घरी घेऊन जा आणि काही त्रास झाला तर ओ.पी.डी. ला घेऊन येत जा. या रिपोर्टमध्ये त्यांच्या डोक्यात रक्ताची गाठ आहे हे सांगितलं आहे. गोळ्या द्या त्यांना, बरं वाटेल. आणि काही वाटलं तर घेऊन येत जा.” मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. “शंभर रुपये या जाले लागते. कायचं जमते आता लवकर येनं.” “आजी कुठून आली तू? आता जाले पैशे हाय का मंग? घरी कोनीच नाई का?” जरा आता माझी भाषा बदलली होती, आजीला आपलेपणा वाटावा म्हणून ती बोलत असलेल्या भाषेत मी प्रश्न केला.
“जाले पैशे नाई, पोरंबाळं नाई. दोघंच बुडा बुडी रायतो.” “बरं मग हे घे शंभर रुपये,” हाती शंभर रूपयांची नोट ठेवत मी बोललो.

आता आणखी काही गोष्टींची उत्सुकता मला लागत होती. शासकीय रुग्णालयात काम करत असल्याने पासष्ट वर्ष वयाच्या वरच्या निराधार वृद्धांसाठी सरकारच्या श्रावणबाळ योजनेबद्दल अनेक वृद्धांना चौकशी करताना मी बघितलं होतं. योजनेचं आताचं नाव कदाचित वेगळं असेल पण सगळे श्रावणबाळ योजना म्हणून विचारताना मी ऐकलं होतं. “आजी मग घरी कोणी कमवत नाही तर श्रावणबाळ योजना आहे ना? त्याचा अर्ज काहून नाई करत?” मी विचारलं. “केला होता बापा पन वयाचा दाखला पायजे म्हणते, डाक्टरसायबाकडून लिहून आनाले सांगतलं. तुम्ही देत असान तं द्या वयाचा दाखला.” “आजी बघ तो दाखला तर मी नाही देऊ शकत पण आज जर थांबू शकत असशील तर थांब. आज रविवार आहे, ऑफिस बंद आहे. उद्या सकाळी मी सांगतो तिथं ये मी करून देतो जमलं तर.” असं म्हणत सोमवारी ज्या ओ.पी.डी.ला मला काम करायचं होतं तिथला क्रमांक एका चिठ्ठीवर लिहून ती तिच्या हातात देऊन यायला सांगितलं.

तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी ड्यूटीवर जाताना विचार आला, ‘ती म्हातारी येईल का? आली तर काम आज फत्ते करूच.’ माझ्या कार्यालयात येऊन मी माझ्या कामात बुडालाे. तीच गर्दी तेच काम.
साधारण दुपारी एक वाजताची वेळ असेल. कुणीतरी माझ्या सहकाऱ्याला नेमकं त्याच श्रावणबाळ योजनेबद्दल विचारताना ऐकलं. त्या आजीबाईचा विचार डोक्यात चमकून गेला. हातचं काम सोडून बघितलं तर ती कालचीच आजी चौकशी करत होती. हिचं काम आज करूनच देऊ, या विचारानं मी खुर्चीवरून उठलो आणि सहकाऱ्याला कामाचं स्वरूप सांगून या योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांची चौकशी करावी म्हणून आजीला घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात निघालो. ते कार्यालय वरच्या मजल्यावर असल्याने ही जागा या आजीला नविनच होती हे तिच्या बोलण्यातून जाणवलं.


“अस्सं हे हाफीस व्हय काय मले काई माईत नवतं,” शल्यचिकित्सक कार्यालयात जाताना ती बोलली. कार्यालयात जाऊन मी त्या योजनेबद्दल सगळं सविस्तर विचारलं आणि मग मी त्या आजीला विचारलं “आजी आधार कार्ड अनलं काय सोबत? तुझं अन् आजोबाचं?” “आनेल हाय पन बुड्याजवळ हाय, मी घेऊन येतो.” ती जरा आनंदून बोलली. घाईघाईत ती पायऱ्या उतरत होती. तिचा सुरकुत्या पडलेला चेहरा जरा खुललेला वाटत होता. मी माझ्या कार्यालयात येऊन माझ्या कामाला लागलो. पंधरावीस मिनिटांत आजी परत आली. मी सगळे कागदपत्र तिच्या पिशवीतून काढायला सांगितले आणि वयाच्या दाखल्यासाठी लागणारे दोघांचेही आधार कार्ड माझ्या हातात घेत म्हणालो, “चल आजी वरच्या मजल्यावर जावं लागेल परत.” ती माझ्याबरोबर येत बोलली, “डॉक्टरसाहेब देवासारखे आले तुम्ही, नाई तं माझ्यासारख्या अडानी बाईले कायले समजते यातलं.”
आम्ही कार्यालयात प्रवेश करून संबंधित व्यक्तीला ते आधार कार्ड दाखवलं. त्यांनी वयाच्या दाखल्याचे विहीत नमुने स्वतः भरून दिले आणि मला पैसे भरायला पाठवले. मी पैसे भरायला जात असताना आजी पण सोबत होतीच. “तुमी देलेले कालचे पैसे घ्या अन् भरून टाका,” ती बोलली. “असू दे आजी, तिकीटासाठी राहू दे ते.” मी खिशातून पैसे काढत बोललो. त्या पावत्या घेऊन परत संबंधित व्यक्तीला दाखवल्या. त्यांनी दाखल्याचे नमुने आणि पावत्या जोडल्या आणि म्हणाले “आजोबा कुठे आहेत? ते लागतील ना त्यांचा दाखला घेताना. आजीचा तर मिळून जाईल पण आजोबाचं विचारा साहेबांना एकदा.”

मी त्या आजीसोबत संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर गेलो आणि काम काय आहे ते सांगितलं. आजी आजोबांना पायऱ्यांवरून इथे आणू शकणार नाहीत हेही सांगितलं. “काल हे आजोबा अपघात कक्षात आले होते, मी वैद्यकीय अधिकारी आहे मी बघितलं आहे त्यांना, ते येऊ शकणार नाहीत इथपर्यंत, जमेल का सर हा दाखला देणं?” मी बोललो. “तुझे नातेवाईक आहेत का हे?” त्या अधिकाऱ्यांनी विचारलं. “नाही सर, काल अपघात कक्षात आल्या होत्या सहज विचारलं तर वयाचा दाखला नसल्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्यांच्याकडे औषधाला ना पैसे आहेत ना वयाचा दाखला कुठे मिळतो याची माहिती. म्हणून म्हटलं करून देऊ आपणच एवढं काम.” मी बोललो.
“साहेब, या डाॅक्टरनं काल तिकीटाले पैसे देले अन् आज दाखल्याचे पैसे बी भरले. देवासारखा भेटला बापा,” आजी बोलली. “ठीक आहे, मी देतो दाखल्यावर सही,” साहेब बोलले. तसा आजीचा चेहरा आणखीनच खुलला. त्या अधिकाऱ्याला हात जोडून आजी बाहेर आली. तिच्या पाठोपाठ मी पण आभार मानून बाहेर आलो.

आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. “आता पाय मी गावात गेली का लगेच हे बाकीचं काम करून टाकतो. हा दाखलाच नवता भेटत. भूक लागली असन ना तुमाले आता?” तिनं आपुलकीनं विचारलं. “हो आजी आता वेळ झालीच आहे जेवणाची, जाऊन जेवणच करतो.” मी बोललो. “पोरंबाळं किती हाय?” तिनं प्रश्न केला. जरा स्मित करून मी म्हणालो, “आजी अजून लग्न व्हायचं आहे माझं.” “बायको चांगली भेटन तुला,” आजी पाठीवर हात ठेवत बोलली. “लय चांगलं झालं बापा,” असं पुटपुटत ती तिच्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला लागलो. आपल्याला एखादी एवढीशी वाटणारी गोष्ट कुणाच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवू शकते. आता या योजनेच्या लाभाची सुरुवात झाल्यानंतर कमीत कमी दोन वेळचं जेवण, औषध, दवाखाना याची तरी या दोघांना चिंता असणार नाही या विचारानं आणि ते काम व्यवस्थित पार पडल्यानं मला समाधानी वाटत होतं हे वेगळं सांगायला नकोच.

डाॅ. गौरव देशमुख, अमरावती
[email protected]

X