डॉ. नरेंद्र दाभोलकर / दहशतवादाचा राजकारणाशी संबंध येत असल्याने अडचणी, डॉ. हमीद यांचा आरोप, 'जवाब दो’ आंदोलन करणार

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 20 ऑगस्टला होतील 6 वर्षे पूर्ण

प्रतिनिधी

Aug 17,2019 09:20:00 AM IST

पुणे - दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी देशात समग्र नीती आवश्यक आहे. दहशतवाद हा धार्मिकतेशी जोडला गेला आहे. त्यातून होणाऱ्या दहशतवादाचा राजकारणाशी संबंध असल्यामुळे प्रत्यक्षात कारवाई होताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे शासन यंत्रणेने धर्माच्या नावावर दहशत करणाऱ्या व्यक्तींशी कठोरपणाने वागले पाहिजे, अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी डाॅ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. शुक्रवारी ते पुण्यात बोलत होते.


अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस २० आॅगस्ट राेजी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील सूत्रधारांना अटक कधी होणार? असा सवाल उपस्थित करत अंनिसकडून दाभाेलकर यांची हत्या झाली त्या पुलावर कँडल मार्च काढून डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच या पुलावरच “जवाब दो आंदोलन’ केले जाणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे ज्येष्ठ पत्रकार व “द हिंदू’चे संपादक एन. राम यांचे “विवेकावरील हल्ला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने आणि जनसमूहांच्या वंचिततेचे वास्तव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.


कळसकर, अणदुरेला भडकवणारे कोण?
हमीद दाभाेलकर म्हणाले, डाॅ. दाभाेलकर यांचा खून झाला तरी त्यांचे विचार मारेकऱ्यांना संपवता आले नाहीत. सीबीआयने मारेकरी पकडले, पण सूत्रधार अद्याप सापडले नाहीत. शरद कळसकर आणि सचिन अणदुरे हेच हल्लेखाेर असल्याचे सीबीआयने दाेषाराेपपत्रात नमूद केले असून त्यांना भडकवणारे नेमके व्यक्ती काेण आहेत? याचा शाेध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

X
COMMENT