आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता तकने वाला कोई तो हो...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. इक्बाल मिन्ने  

कवी, शायर, गझलकार हा समाजाचा डोळस समीक्षक असतो. बदलत्या समाजाच्या चढ-उताराचा मूक साक्षीदार असतो. समाजातली स्थित्यंतरेही तो टिपत असतो. त्या स्थित्यंतरांचे आकलन करून त्यांची गांभीर्यपूर्वक नोंद आपल्या काव्य दालनात करत असतो. या नोंदी परिपक्व झाल्यावर गझलकार, कवी लेखक आपल्या लेखणीतून मांडतो. स्थित्यंतराचे बरे-वाईट परिणामही आपल्या विचारसरणीतून स्पष्टपणे मांडणाऱ्या निलमा दुर्राणी यांच्याबदद्ल... 
गझलकार आत्मकेंद्री, आत्ममग्न असला तरीही तो बदलत्या सामाजिक पर्यावरणाच्या परिप्रेक्ष्यात आपली काव्यदृष्टी वृद्धिंगत करतो. गझलकार आपल्या सामाजिक कर्तव्यापासून कधीच परावृत्त होत नाही. किंबहुना सर्जनापासून हेतुपुरस्सर पराङ‌्मुख होणे म्हणजे सामाजिक अपराध आहे, असे समजणारा शायरच खरा शायर असतो. कोणत्याही काळात कुठलाही समाज भयमुक्त, दोषमुक्त, अपराधमुक्त, विषमतामुक्त होता असे मानणे धाडसी ठरेल. परंतु प्रत्येक काळात या साऱ्याविरुद्ध प्रत्येक कवीनं आपली लेखणी चालवली आहे. सर्वसामान्य माणसाचे क्लेशदायक जगणे, त्याच्यावर होणारा अन्याय, त्याच्यासोबत केला जाणारा दुजाभाव, त्याच्या प्रश्नाचा ऊहापोह आपल्या कवितेतून, गझलेतून करणारा शायरच खरा शायर असतो. लेखन करताना मानवी प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, माणुसकीला रक्तबंबाळ करणारा शब्द चुकूनही लिहिला जाणार नाही याची काळजी घेणं हे गझलकाराचं आद्य कर्तव्यं असतं. समाजातील अंधार आणि अज्ञानासोबतच वाईट चालीरीतीही समाजातून विसर्जित करण्यासाठी गझलकाराची लेखणी मशालीसारखी धगधगायला हवी. समाजातली सामान्य माणसंच समतामय जीवनाच्या प्रयोगात गुंतलेली असतात. या सामान्य माणसातच माणुसकीचे सौंदर्य असते. ही अशी साधी-भोळी माणसंच उजेडाची निर्मिती करतात. या माणसाच्या मनाची मोडतोड होऊ नये, त्याच्या मनावर जखमेचा ओरखडाही पडू नये म्हणून गझलकाराने आपल्या प्रतिभेचा वापर केला पाहिजे. हेच माणसाच्या सुखी जीवनाचं प्रयोजन आहे. हे असं तात्त्विक भान असणारा कवी, गझलकारच त्याच्या काळातच नव्हे तर त्याच्या नंतरच्या शतकातही आपलासा वाटतो. लोक अनेक दशकांनंतरही त्याची आठवण काढतात.असं सामाजिक भान जपणारी शायरा म्हणजे निलमा नाहीद दुर्राणी. आपल्या प्रगल्भ सामाजिक जाणिवा अभिव्यक्त करताना त्या म्हणतात,


उदास लोगों से प्यार करना कोई तो सिखे
सफेद लम्हो में रंग भरना कोई तो सिखे
कोई तो आए खिजा में पत्ते उगाने वाला
गुलो की खुशबू को कैद करना कोई तो सिखे...
(खिजा :
पानगळ)
 


समाजातली माणुसकी हळूहळू लोप पावत चालली आहे. माणसाचा माणसांवरचा विश्वास आटलाय. एकमेकांवरचं प्रेम संपत आलंय. आपापसातली नाती दृढ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाहीए. परस्परातली दरी वाढत चाललीय. शब्दातूनही क्रौर्य पसरताना दिसतं आहे. महिलांची असुरक्षितता, महिलांवरचे अन्याय-अत्याचार वाढताना दिसताहेत. या साऱ्या समस्यांचा ऊहापोह शायरीतून होत नसेल तरच नवल.  अशा स्थितीत समाजाचं नेमकं चित्रण शायर आपल्या लेखणीतून करत असतो. निलमा नाहीद या संवेदनशील कवयित्रीनं गझलेच्या शेरामधून या विषमतेचा आणि प्रश्नांचा परामर्श घेतलाय. कवीला आजूबाजूला होणारा अत्याचार, सामान्य माणसाची घालमेल, गरिबांची ससेहोलपट अस्वस्थ करते. आजूबाजूच्या घडामोडीवर आपले चिंतन व्यक्त करताना नाहीद म्हणतात,


शहर में बसते हैवानो से डर लगता है
मुझ को ऐसे इन्सानो से डर लगता है
ऊंची जात का ढोंग रचाकर डसते हंै
ऊंची जात के शैतानो से डर लगता
है...
 
अत्यंत सहज आिण समजून येणाऱ्या शब्दातून आणि लक्षवेधी शैलीद्वारे आपले विचार मांडणे हे निलमा यांचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक चिंतनाबरोबरच तरल प्रेमभावनांचा आविष्कारही त्यांच्या लेखणीतून सहज साकारतो. प्रेमाचे भाव उलगडताना त्या लिहितात.


मेरा रास्ता तकने वाला कोई तो हो
मेरे घर में रहने वाला कोई तो हो
बर्तन टूटे आवाजें हो, शोर मचे
लडने और झगडने वाला कोई तो
हो...
 

लेखकाचा संपर्क : ७४७०७९११३७

बातम्या आणखी आहेत...