आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्ख मिट्टी की रिदा ओढे..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांची शायरी वाचून वाचकाच्या तोंडून स्वाभाविकपणे ‘वाह’, ‘क्या बात है’ ‘क्या खूब’ अशी दाद बाहेर येते त्या जहिदा जैदींबद्दल आजच्या भागात.

 

आमिर खुस्रोने भारत हा धरित्रीवरील स्वर्ग आहे असं म्हणले आहे. विविध भाषा, विस्तीर्ण भूप्रदेश, नैसर्गिक सौंदर्य, भिन्न-भिन्न विचारधारा, वििवधतेतही एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविध प्रांत, विविध भाषा ही आपल्या देशाची खासियत असली तरी समन्वयाच्या, राष्ट्रप्रेमाच्या धारा इथं वेगवेगळ्या भाषेत गुंजारव करत आहेत. जितक्या विविध भाषा त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी भाषेच्या बोलीभाषाही आहेत. या भूमीतच ज्या उर्दू भाषेचा जन्म झाला त्या भाषेची वैभवस्थळे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 


उर्दू साहित्याला अनेक जाती-धर्माच्या साहित्यिकांनी समृद्ध केले आहे. त्यात महिलांचा वाटा मोठा आहे. ३०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास असलेली उर्दू गझल अधिकाधिक सौंदर्यपूर्ण आणि देखणी झाली आहे. ४ जानेवारी १९३० मध्ये उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या अलीगडच्या जहिदा जैदी यांनी उर्दू साहित्यात खूप मोठे योगदान दिले. त्यांच्या नावे उर्दू साहित्यात १५ ग्रंथांची भर आहे. नज्म, गझल आणि इतर साहित्य प्रकारात त्यांचा संचार होता. अत्यंत नाजूक आणि हळव्या गझला त्यांनी लिहिल्या. खरेतर उर्दू शायरीचे पीठ म्हणून दिल्ली आणि लखनऊ ही शहरे ओळखली जायची. याच लखनऊच्या उत्तर प्रदेशातील जैदी यांच्या गझलेचे सौंदर्य वेगळेच आहे. मनातील भावना व्यक्त करताना जे शब्द प्रवाही होतात ते गझलेचा आकार घेतात. त्यांच्या गझलेतील प्रत्येक शब्द नी शब्द वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवल्याशिवाय राहत नाही. एका हळव्या पण अर्थपूर्ण गझलेमध्ये त्या म्हणतात,


तिश्नगी हद से सिवा और सफर जारी है
और सराबो से बहल जाए जरूरी तो नही

(तिश्नगी - तहान, हद से सिवा-आटोक्याबाहेर, सराब-मृगजळ)


या गझलमध्ये शायराने जरूरी तो नहीं हा रदीफ अत्यंत प्रभावीपणे वापरला आहे. एखादी कविता किंवा गझल, एखादी अभिव्यक्ती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा रसिक किंवा वाचकाला आपल्या अनुभवांची अनुभूती या अभिव्यक्तीतून होते. एखादा अनुभव किंवा आलेली प्रचिती गझलेच्या शब्दातून व्यक्त होताना दिसते. तेव्हा रसिकांच्या तोंडातून हसजपणे ‘वाह’,क्या बात है हे शब्द आपोआपच बाहेर पडतात. जहिदा जैदी यांच्या गझलेचं हेच वैशिष्ट्य आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. प्रत्येक माणूस पाण्याच्या थेंबासाठी तरसतो आहे. वाढत्या तापमानानं त्याच्या जिवाची लाहीलाही होते आहे. अशातच जैदी यांची खाली दिलेली  गझल केवळ   आपणा सर्वांसाठीच लिहिली गेलीय की काय असे वाटते. आपल्या एका गझलेत जैदी म्हणतात,


कतरा ए आब को कब तक मेरी धरती तरसे
आग लग जाए समंदर मे तो पानी बरसे
सुर्ख मिट्टी की रिदा ओढे है कब से आकाश
न शफक फूले न रिम-झिम कही बादल बरसे
हम को खींच ले जाते है सराबो के भँवर
जाने किस वक्त मे हम लोग चले थे घरसे

( कतरा ए आब - पाण्याचा थेंब, सुर्ख -लाल, रिदा - पांघरूण, शफक - उषा, सराब- मृगजळ)


    या गझलेत शायराने स्पष्ट केले आहे की, माझी ही धरणी पाण्याच्या थेंबासाठी कुठवर वाट पाहील? कुठवर उपेक्षित राहील? जर समुद्रात आग लागली तर पाऊस बरसेल. बहुतेक अशीच परिस्थिती मराठवाड्यात आज सर्वदूर दिसते आहे. कोणताही शायर संवेदनशील आणि दूरदृष्टी असणारा असतो. तत्कालीन काळातच नव्हे, तर कोणत्याही काळासाठी लागू पडतील असे विचार आपल्या शायरीतून व्यक्त करण्याचे सामर्थ्य ज्या शायराच्या शब्दांत असते तो शायर अजरामर होतो. जहिदा जैदी यांचे लेखन अशाच शायराच्या पातळीवरचे आहे हे निर्विवाद आहे..
 

बातम्या आणखी आहेत...