अष्टपैलू ‘माह लाका’

दिव्य मराठी

Apr 23,2019 12:06:00 AM IST


निझामाच्या बरोबरीनं युद्धभूमीवर शौर्य गाजवणाऱ्या, लेखन, राजकारण, घोडेस्वारी, धनुर्विद्या, गायन, नृत्य अशा सर्वच कलांत तरबेज असणाऱ्या, त्या काळातील महिलांच्या तुलनेत स्वभावानं धाडसी असणाऱ्या माह लाका चंदा यांच्याबद्दल आजच्या भागात...

ना गुल से है गरज तेरे ना है गुलजार से मतलब
रख चष्म-ए-नजर शबनम मे अपने यार से मतलब
ना समझा हमको तू ने यार ऐसी जाँ फिशानी पर
भला पावेंगे ऐ नादां किसी हुशयार से मतलब
ना ‘चंदा’ को तमन्ना जन्नत की ना खौफ-ए-जहन्नम है
रहे है दो जहाँ मे हैदर-ए-करार से मतलब

काफिया आणि रदीफचा अत्यंत सुंदर उपयोग करून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या या महिला आहेत माह लाकाबाई चंदा. औरंगाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांशी संबंध असलेल्या माह लाका या चंदा या नावानं लेखन करत. ७ एप्रिल १७६८ रोजी जन्मलेल्या राजकुँवर आणि बहादूरखान या दांपत्याच्या चंदा या कन्या. राजकुँवर यांच्या निपुत्रिक भगिनी मेहताब माँ यांनी चंदा यांना नंतर दत्तक घेतले.लहानपणापासून चुणचुणीत असणाऱ्या चंदा यांची शिक्षणाची, घोडेस्वारीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था रुकनुद्दीन दौला यांनी व्यवस्था केली. अत्यल्प काळात चंदा या तरबेज घोडेस्वार आणि धुर्नधारी बनल्या. दुसऱ्या निझामाबरोबर पुरुषाच्या वेशात त्यांनी ३ युद्धांत सहभागी होत आपले शौर्य दाखवले. त्यामुळे निझाम २ मीर निझाम अली खान यांनी चंदाला माह लाका अर्थात चंद्रदर्शन ही पदवी बहाल केली. तेव्हापासून त्यांना माह लाका या नावानं ओळखलं जाऊ लागलं. निझाम द्वितीय आणि तृतीय यांच्या दरबारात अत्यंत वजन असलेली व्यक्ती म्हणून माह लाका दबदबा राखून होत्या. धोरणे ठरवताना अनेकदा तिचं मत निझाम घेत असे. चंदा यांच्या मरणोपरान्त हैदराबादच्या नामपल्ली परिसरातलं त्यांचं निवासस्थान आज मुलींसाठीचं वसतिगृह म्हणून आजही अस्तित्वात आहे. चंदा या जिथे कुठे जात तिथे त्यांच्यासोबत ५०० सैनिकांची फौज असे. अशा अत्यंत कर्तृत्ववान चंदा यांचं वयाच्या ५६ व्या वर्षी १८२४ मध्ये निधन झालं. उत्तर भारतातील महान उर्दू शायर मीर तकी मीर आणि मिर्झा मुहंमद रफी ‘सौदा’ आणि ख्वाजा मीर ‘दर्द’ यांच्या माह लाका चंदा या समकालीन. औरंगाबादचे श्रेष्ठ शायर आणि सुफी तत्त्वज्ञानावर ज्यांचा पगडा होता ते सिराज औरंगाबादी (१७१५-१७६३), हैदराबादचे तत्कालीन पंतप्रधान नबाव मीर अली आलम यांच्या काव्याचा, शायरीचा त्यांच्यावर प्रभाव होता. माह लाका यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व असले तरी अरबी, फारसी आणि भोजपुरी भाषांही त्यांना खूप चांगल्या प्रकारे अवगत होत्या.


१८२४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उर्दू गझलांचा दिवान ‘गुलजार-ए-महलका’ नावानं प्रसिद्ध झाला. या संग्रहात ३९ गझला असून प्रत्येक गझलेत ५ शेर आहेत. प्रेम, नाते आणि तत्त्वज्ञान उलगडून सांगणाऱ्या या साऱ्या गझला असून त्या नितांत सुंदर आहेत. आपल्या एका रचनेत त्या म्हणतात,

गर मेरे दिल को चुराया नही तू ने जालिम
खोल दे बंद हथेलियो को दिखा हाथो को

‘दिवान ए चंदा’ हा त्यांचा संग्रह हस्तलिखित स्वरूपात असून त्यात १२५ गझलांचा समावेश आहे. त्यातली सारी रेखाटनं १७९८ मध्येी माह लाका चंदा यांनी काढलेली आहेत. हा संग्रह १८ ऑक्टोबर १७९९ रोजी कॅप्टन माल्कम यांनी स्वत: हस्ताक्षर करून भेट दिला. मीर आलम यांच्या निवासस्थानी माह लाका यांच्या नृत्य सादरीकरणानंतर हा संग्रह भेट देण्यात आला. आजही हा संग्रह ब्रिटिश संग्रहालयात पहायला मिळतो.


त्यांच्या लेखनात बुलबुल, गुल (कळी, फूल) आणि साकी ( मद्य वाटणारा- वाटणारी) या शब्दांचा वारंवार उल्लेख आढळतो. माह लाका चंदा या उत्कृष्ट शायरा तर होत्याच, परंतु उत्कृष्ट नर्तिका आणि गायिकाही होत्या. त्या काळी मुशायरा अर्थात कविसंमेलनात पुरुष शायर सहभागी व्हायचे. मात्र, माह लाका या पहिल्या महिला शायर असाव्यात ज्या मुशायऱ्यात सहभागी व्हायच्या. मोगल सम्राट मुहंमद शाह विजापूरचे शासक इब्राहिम आदिल शाह यांनी स्वरबद्ध केलेल्या काही रचनाही गायल्या आहेत. हैदराबादमधे मौला अली टेकडीजवळ माह लाका यांनी कुंपण असलेली एक जागा बांधली ज्यामध्ये त्या नेहमी मुशायऱ्यांचे आयोजन करत. अशी ही हरहुन्नरी शायरा उर्दू साहित्याचा एक मोठा ठेवा आहे.

आया न इक दिन भी तू वादा पे रात को
अच्छा किया सुलूक तगाफूल शिआर खूूब


डॉ. इक्बाल मिन्ने

X