Home | Magazine | Madhurima | Dr.Iqbal Minne writes about Meena Kumari's Ghazal's

जिस्म तनहा और जाँ तनहा...

डॉ. इक्बाल मिन्ने, | Update - Jul 09, 2019, 12:08 AM IST

गझलेचा प्रचार आणि प्रसार करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीचा खूप मोठा वाटा आहे

 • Dr.Iqbal Minne writes about Meena Kumari's Ghazal's

  भारतीय जीवनसरणीचा गझल हा एक महत्त्वाचा आविष्कार म्हणून रसिकांच्या हृदयावर आरूढ झाला आहे. गझलेचा प्रचार आणि प्रसार करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीचा खूप मोठा वाटा आहे. सुप्रसिद्ध गायकांचे गझल गायनाचे कार्यक्रम, कॅसेट संस्कृती, मुशायरे, ही कारणेही गझल लोकप्रिय होण्यामागे आहेत. मोहंमद रफी, बेगम अख्तर, अनुप जलोटा, पंकज उधास, जगजितसिंग, चित्रासिंग, मनहर उधास, तलत अजीझ आदी गायकांनी महान शायरांच्या गझला गाऊन त्या जगभरात लोकप्रिय केल्या. नौशाद, मदनमोहन, रवी, खय्याम, हे संगीतकार गझलप्रेमी तर होतेच, परंतु गझलेला हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, मजरूह सुलतानपुरी, जाँनिसार अख्तर, निदा फाजली, बशर नवाज यांसारख्या महान शायरांनी हिंदी चित्रपटांसाठी गझला लिहिल्या.


  हिंदी चित्रपटसृष्टीने जसे प्रतिभावान कलाकार दिले तसे कलाकारांमधील कवी, शायरही जगासमोर आणले. साठ- सत्तरीचे दशक गाजवणारी सुंदर अभिनेत्री मीनाकुमारी हीसुद्धा अत्यंत प्रतिभाशाली आणि आशयघन शायरा होती,


  आगाज तो होता है पर अंजाम नही होता
  जब मेरी कहानी मे वह नाम नही होता

  महजबी नाज बक्ष हे मीनाकुमारी यांचे मूळ नाव. १ ऑगस्ट १९३३ ला मुंबई इथं त्यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीतल्या आपल्या ३३ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल ९२ चित्रपटांत नायिका म्हणून भूमिका केल्या.साहित्य, कविता हा मीनाकुमारी यांचा आवडता प्रांत होता. आपल्या वैयक्तिक जीवनातील चढउतार, सुखदु:खाचे प्रसंग, त्यांचं प्रतिबिंब मीनाकुमारी यांच्या शायरीतून उमटत असे,


  चाँद तनहा है, आसमाँ तनहा
  दिला मिला है कहाँ कहाँ तनहा
  बुझ गयी आस छुप गया तारा
  थरथराता रहा धुवाँ तनहा
  जिंदगी क्या इसको कहते है
  जिस्म तनहा और जाँ तनहा
  हमसफर गर कोई मिले भी कहीं
  दोनो चलते रहे यहाँ तनहा

  एकटेपणा, एकांत, एकाकीपणाचे जीवनातील महत्त्व आणि त्याचा अनुभव त्यांनी वरील गझलेत अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे एकाकीपण येतच असते. एकटेपणा जेव्हा छळू लागतो तेव्हा माणसाची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. परंतु मीनाकुमारी यांची वरील गझल वाचल्यानंतर एकटेपणात जगणाऱ्या व्यक्तीला दिलासा मिळाल्याशिवाय राहत नाही.


  यूँ तेरी रहगुजर से दीवाना वार गुजरे
  कांधे पे अपने रख के अपना मझार गुजरे
  बैठे है रास्ते मे दिल का खंडर सजाकर
  शायद इस तरफ से इक दिन बहार गुजरे
  दार-ओ-रसन से दिल तक सब रास्ते अधुरे
  जो इक बार गुजरे वो बार बार गुजरे
  बहती हुई ये नदियां घुलते हुए किनारे
  कोई तो पार उतरे कोई तो पार गुजरे

  (रहगुजर : मार्ग, दीवाना वार : वेड्याप्रमाणे, मजार:कब्र,दार ओ रसन : सुळी आणि फाशी)


  मीनाकुमारी यांनी लिहिलेल्या गझलांना मुहंमद जहुर ‘खय्याम’ यांनी संगीतबद्ध केले आणि मीनाकुमारी यांनी स्वत:च्या आवाजात त्या गायल्या. हा अल्बम १९७१ मध्ये प्रकाशित झाला होता.
  १९७२ मध्ये मीनाकुमारी यांच्या मृत्यूनंतर विख्यात कवी गुलजार यांनी तन्हा चाँद या शीर्षकाचा मीनाकुमारी यांच्या उर्दू कवितांचा संग्रह संकलित करून प्रकाशित केला.


  मीनाकुमारी यांची उत्तम अभिनेत्री अशी जशी हिंदी चित्रपटसृष्टीत मान्यता आहे तशीच लाजवाब शायरा असं उर्दू साहित्य सृष्टीत महत्त्वाचं स्थान आहे.

Trending