आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरे हालात ने मजबूर बनाया है मुझे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र अभिव्यक्ती असते. प्रत्येक शेरमधून भिन्न विचार, भिन्न आशय-विषय येऊ शकतो. एकाच गझलेतून प्रेम, विरह, मिलन, राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्न हाताळले जाऊ शकतात. अशा गझल लेखनाचं उत्तम उदाहरण म्हणजे मुमताज मिर्जा... 

 

कविता किंवा शायरी ही वैयक्तिक अनुभूतीमधून, जाणिवांतून अभिव्यक्त झालेला भाव-भावनांचा आलेख असते. शायरीमधे हृदयाचे भाव, मानवी अनुभवविश्व, वैचारिक अधिष्ठान आणि जाणिवा उमटलेल्या असतात. गझलेत, कवितेत चपखल आणि अचूक शब्दांत वास्तव मांडलेले असते. जीवनाविषयीचे सत्य, जीवनाचे वर्णन, काल्पनिक विश्व आणि भाव आढळतात. कविता हा साहित्यातला सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रकार आहे. त्यातून विविध कला, मानवी सभ्यता, सामाजिक विषमता, आणि सुख-दु:खाचे वर्णन घडते. प्रत्येक शायराची प्रतिभा, वैचारिक प्रगल्भता, मांडणीची शैली भिन्न असते. याचा वाचकाशी किंवा रसिकाशी काडीमात्र संबंध नसतो. पण जेव्हा रसिकाला एखाद्या शेरचे शब्द भिडतात,आपल्या अनुभवांशी तो जेव्हा कवीची मांडणी जोडून घेतो तेव्हा तो शेर यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. एकेका शेरमध्ये वैश्विक तत्त्वज्ञान मांडण्याचे सामर्थ्य असते. उर्दू शायरांनी गझल काव्यप्रकार लीलया हाताळून उर्दू साहित्याला समृद्ध केले. गझलेतील प्रत्येक शेर अत्यंत कमी, मोजक्या शब्दांत बरेच काही सांगतो. गझलेमध्ये कमीत कमी पाच शेर असावेत. त्यापेक्षा जास्त असल्यास ७,९,११,१३ अशा विषम संख्येत शेरांची रचना असावी असा संकेत आहे. गझल ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच वृत्तात बांधलेली असते. गझलेचा प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र अभिव्यक्ती असते. वृत्ताव्यतिरिक्त गझलेतल्या एका शेरचा दुसऱ्या शेरशी संबंध असेलच असे नाही. प्रत्येक शेरमधून भिन्न विचार, भिन्न आशय-विषय येऊ शकतो. एकाच गझलेतून प्रेम, विरह, मिलन, राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्न हाताळले जाऊ शकतात. अशा अनेक गझला उर्दू साहित्यात आहेत ज्यातून असे भिन्न विषय हाताळले गेले. अशा लिखाणाचा एक उत्तम नमुना म्हणजे मुमताज मिर्जा यांची शायरी. त्यांच्या अनेक रचना लक्षणीय आहेत. मुमताज यांचा जन्म दिल्लीत १९२९ मध्ये झाला. 


न जाने कब निगाह ए बागबाँ बदल जाए
हर आन फुलो को धडका लगा सा रहता है

 

(निगाह-ए-बागबाँ - माळ्याची नजर, आन -क्षण.  प्रत्येक क्षणी फुलांच्या काळजात धडकी भरते की न जाणो केव्हा माळ्याची कृपादृष्टी बदलेल आणि त्याची अवकृपा होईल.)


मुमताज यांच्या अशा अनेक गझला वाचकांना आपल्याशा वाटतात. 
हाल न पुछो रोज ओ शब का कोई अनोखी बात नही
दिन को कैसे रात कहे हम रात भी अब तो रात नहीं
दिल से भुला तो दे हम उनको लेकिन इस को क्या कीजिए
सदियों का रुदाद भुलाना अपने बस की बात नही

 

(रोज ओ शब - दिवस रात्र, रुदाद-वृत्तांत, कथा) अत्यंत सुंदर शब्दांत मनाची अवस्था कवयित्री व्यक्त करते. त्या म्हणतात, त्याच्या आठवणी मी हृदयातून काढून टाकीन. मात्र अनेक शतकांची आमची प्रेमकथा विसरणं अशक्य आहे. याचं मी काय करू?अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. आठवणी आपल्याला सोडून जातात त्या आठवणींचं करायचं काय? असा सवाल त्या करतात. आपल्याशी कुणी वाईट वागलं, काही बोललं किंवा नुसता कटाक्ष टाकला तरी आपल्या मनाला वाईट वाटते. आपण अस्वस्थ आणि बेचैन होतो. आपल्या सहनशक्तीपलिकडे जाते सगळे. जोपर्यंत ती गोष्ट आपल्या मनात असते तोपर्यंत आपले दुसरं कशात लक्ष लागत नाही. परंतू हाच अनुभव जेव्हा एखाद्या शायराला येतो तेव्हा तो शायर अथवा शायरा आपली बेचैनी, अस्वस्थता, घालमेल कविता, नज्म, गझलेतून व्यक्त करून मोकळा होतो. जोपर्यंत तो आपली कैफीयत शब्दातून मांडत नाही तोपर्यंत त्याच्या जीवात जीव नसतो. मुमताज मिर्झा यांच्या गझला अशाच प्रकारच्या आहेत. त्या वाचल्याक्षणी आपल्या मनाला शांतता मिळते.   


बे तरह आपकी यादों ने सताया है मुझे 
चांदनी रातो ने आ आ के रुलाया है मुझे
आपसे कोई शिकायत न जमाने से गिला
मेरे हालात ने मजबूर बनाया है मुझे

( बे तरह - खूप वाईटरीत्या)

बातम्या आणखी आहेत...