आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समकालीन कवितेचे प्रातिनिधिक परिदृश्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पी. विठ्ठल यांचे ‘मराठी कविता : समकालीन परिदृश्य’ हे पुस्तक म्हणजे काही कवितेची सैद्धांतिक समीक्षा नाही, तर मराठी कवितेतील स्थित्यंतराचा, भाषिक आणि सांस्कृतिक अभिसरणाचा नव्या काळाच्या पार्श्वभूमीवर केलेला एक विचार आहे. यामुळे समकालीन मराठी कवितेचे परिदृश्य कोणत्या प्रकारचे आहे, ते स्पष्ट होते.

 

१ “कविता हा अन्य साहित्यप्रकारापेक्षा अतिसर्जनशील साहित्यप्रकार असल्यामुळे कवितेविषयी लिहिणे हे धाडसाचे आहे.”


२ “फेसबुक, व्हाॅट्सअ‍ॅप इ. अभिव्यक्तीचे नवे माध्यम हाताशी आल्यामुळे कवितेचे सर्जनक्षेत्र खूपच विस्तारले आहे, हे सांस्कृतिकदृष्ट्या फारच बरे असले तरी, या माध्यमात थोडेफार अपवाद सोडले तर उथळ पाण्याला खळखळाट फार हेच दिसेल!”


 ३ “कोणत्याही काळात परंपरेची ‘री’ ओढणारे आणि अनुकरणाच्या ओझ्याखाली दबून वेगळ्या अभिव्यक्तीचा आव आणणारे ‘सुमार कवी’ असतातच; तसे या काळातही ते आहेतच; काव्यगायनाच्या आंगिक हावभावाने ते सर्वत्र परिचित देखील आहेत; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनही मराठी कवितेचे वर्तमान अत्यंत उत्तम असल्याचेच दिसते.”


ही आणि यासारखी वास्तव निरीक्षणं कवी व कवितेचे अभ्यासक पी. विठ्ठल यांनी ‘मराठी कविता : समकालीन परिदृश्य’ या समीक्षाग्रंथात नोंदवली आहेत. आपल्याकडे समीक्षकांनी ललित साहित्य वा कवितेविषयी गौरवोद्गार काढलेले चालतात; पण झोंबणारे सत्य लिहि‍णे, बोलणे हे सृजकांना रुचणारे आणि पचणारे नसते; मात्र आपल्या कविकुळातील कोणी बोलले तर ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. काहीसा असाच प्रकार समीक्षक, कवी पी.विठ्ठल यांच्या प्रस्तुत निष्कर्षांमुळे झाला आहे. याचा अर्थ त्यांनी कवितेविषयी नकारात्मक मांडणी केली आहे, असे नाही. समकालतील कविता निर्मितीचा ओघ, सोशल मीडियामुळे excessively social झालेले कवी आणि त्यांच्या कवितांचा दर्जा हा चिंतेचा विषय असला तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात उत्तम कविता लिहिली जाते. अशा कवितांविषयी पी. विठ्ठल यांनी या ग्रंथात गांभीर्याने मांडणी केली आहे.


समकाल हा अनेकविध अंगांनी गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक असला तरी समकालीनांना तो सातत्याने आपल्याविषयी विचार करण्यास, चिंतन करण्यास व लिहिण्या-बोलण्यास प्रवृत्त करतो. यातही संवदेनशील कलावंतांसाठी तो आस्थेचा, पण त्यांच्याकडून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उद्युक्त करणारा असतो. त्यामुळे पी.विठ्ठलसारखा एखादा कवी हा कविता लि‍हीतलिहीत समकालीन कवींविषयी बोलायला लागतो, लिहायला लागतो. कविता हा त्यांच्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय असल्याने सातत्याने कवी आणि कवितेविषयी लिहिण्या, बोलण्यातून व चिंतनातून त्यांचा प्रस्तुत ग्रंथ आकारास आला आहे. पण “हे पुस्तक म्हणजे काही कवितेची सैद्धांतिक समीक्षा नाही, तर मराठी कवितेतील स्थित्यंतराचा, भाषिक आणि सांस्कृतिक अभिसरणाचा नव्या काळाच्या पार्श्वभूमीवर केलेला एक विचार आहे.” अशी प्रांजळ कबुली ते सुरूवातीलाच देतात. यामुळे समकालीन मराठी कवितेचे परिदृश्य कोणत्या प्रकारचे आहे, ते स्पष्ट होते. नव्वदोत्तर काळातील कविता हा पी.विठ्ठल यांच्या चिंतनाचा, लेखनाचा प्रांत असला तरी पूर्वसुरींच्या कवितांनीही त्यांना भुरळ घातलेली आहे. यामुळे या ग्रंथाचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात नव्वदोत्तर व समकालीन कवितेविषयीचे चार लेख आहेत. तर दुसऱ्या भागात मराठी कवितेचे मानदंड असलेल्या कवींविषयीचे सहा लेख असून तिसरा भाग हा नव्वदोत्तर ते समकालीन कवींच्या कवितासंग्रहाविषयीचे भाष्य व परीक्षणांचा आहे. यासर्वांमध्ये अभ्यासकाच्या सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीसोबतच रूपवादी दृष्टीचादेखील प्रत्यय येतो. पहिल्या भागातील ‘जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन कविता’ हा नव्वदोत्तर कवितेसंदर्भातील मोठा पैस असलेला महत्त्वाचा दीर्घ लेख आहे. यामध्ये प्रकाश देशपांडे केजकर यांनी मराठी कवितेची तीन पर्वात केलेली विभागणी आधरभूत धरून ते नव्वदोत्तर चौथे पर्व मानावे असे म्हणतात. तसेच स्वत: कवी असलेल्या प्रवीण बांदेकरांनी केलेली वर्गवारी विठ्ठलने अध्याह्रत धरून मांडणी केली आहे. तसेच ‘मराठवाडा : कवितेची सर्जनभूमी’ व ‘मराठी कवितेचे वर्तमान हे दोन लेखही कवितेच्या समृद्धपरंपरेचा विचार करणारे आहेत. मराठी कवितेला मराठी कवींसोबतच अनुवादित कवितेनेही समृद्ध केले; परंतु काही उचलेगिरी करणाऱ्या कवींनी अनुवादापेक्षा परभाषेतील कवितांचं वाचन करून, मराठी वाचकांच्या वाचन मर्यादांचा गैरफायदा घेऊन हिंदी किंवा इंग्रजीतील वा परभाषेतील आशय आपल्या कवितेतून वाचकांच्या पुढ्यात ठेवण्याचे उद्योग केले आणि करीत आहेत. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सुरू आहे. मराठी साहित्यातील ही फेकाफेकी रा. शं. वाळिंबे यांनी १९६२ च्या काळात विशद करून ‘प्रलयग्रस्त पुस्तकांची कहाणी’ मांडली होती. साहित्यिकांचा हा कित्ता समीक्षकांनी सुद्धा गिरवला. त्यांचे डॉ. आनंद पाटलांनी ‘टीका वस्त्रहरण’ केले. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. पण काही प्रामाणिक अभ्यासक/अनुवादक ह्या अनैतिक भोवऱ्यात न अडकता निकोप वाङ्मयीन पर्यावरण अनुवादाद्वारे समृद्ध करतात. ‘भाषांतर ही नवनिर्मितीचीच प्रक्रिया असल्याने कवी पी.विठ्ठल चंद्रकांत पाटलांपासून ते अगदी अलीकडील विद्या सुर्वे-बोरसेंनी केलेल्या अनुवादापर्यंतचा परामर्श घेतात. आणि अनुवादकांनी मराठी भाषा व सांस्कृतिक वैभवात कशी भर घातली ते सांगतात. ग्रंथाच्या दुसऱ्या परिदृश्यात केशवसुत, वा.रा. कांत, ज. वि. पवार, नागनाथ कोत्तापल्ले, अनुराधा पाटील व आत्माराम कनीराम राठोड आदींच्या कवितेसंदर्भात आशय व घाट या दोन्ही दृष्टीने विवेचन करणारे लेख आहेत. पी. विठ्ठल हे कवितांच्या आशयापासून परिशीलनाला प्रारंभ करतात, त्यांची सामाजिक व सांस्कृतिक संदर्भाने उकल करत पुढे कवितेची भाषा, विशेषत: प्रतिमा, प्रतीकं, रचना, शब्दकळा इत्यादी दृष्टीने मांडणी करतात. उदा. वा. रा. कांत यांनी मराठी कवितेला भाषिक वळण कसे दिले हे, ते कवितेतील कल्पना, भावना यांच्या साह्याने मांडतात. तर अनुराधा पाटील यांच्‍ा कवितांतील स्त्रियांच्या वाट्याला आलेले सार्वकालिक दु:खाचे सूत्र उलगडताना ‘दिगंत’ मधील पाऊस, पाणी, आकाश, अंधार, काळोख इ. निसर्ग प्रतिमांचा विचार,  ‘तरीही’ व ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’मधील निसर्ग व कृ‍षी प्रतिमांचा विचार असेल वा आत्माराम कनीराम राठोड यांच्या कवितेतून अभिव्यक्त होणाऱ्या वंचितांच्या वेदनेसंदर्भाने येणाऱ्या प्रतिमांसोबतच म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, अलंकार संदर्भाने अधिक तपशील देतात. यामुळे सौंदर्यवादी असल्याची अनुभूती येत असली तरी ते पूर्णत: सौंदर्यवादी वा रूपवादी नाहीत. तर अनुराधा पाटील, कविता महाजन, श्रीकांत देशमुख, कल्पना दुधाळ, बालिका ज्ञानदेव, सुचिता खल्लाळ यांच्या कवितांचे चिंतन वाचताना त्यांच्यातील स्त्रीत्वाच्या अंगाचा अधिक प्रत्यय येतो. यापेक्षाही सुचिन्हा भागवत यांच्या ‘पाळी जातानाच्या कवितां’चा लिंगभावाच्यादृष्टीने आकलन मांडतात, तेव्हा त्यांची कवितेकडे पाहण्याची सापेक्ष दृष्टी लक्षात येते. तर समग्र लेखांमध्ये त्यांची संमिश्र समीक्षादृष्टी जाणवते. तसेच काळ, काम आणि वेग या सूत्राप्रमाणे प्रस्तुत विवेचन हे कविता, समकाळ आणि स्थित्यंतरे या परिप्रेक्ष्यातून दृग्गोचर होते.


तिसऱ्या परिदृश्यात समकाळात केंद्रवर्ती असलेल्या १९ कवींच्या महत्त्वाच्या कवितासंग्रहावरील भाष्ये व परीक्षणे आहेत. येथेही कोणत्याही प्रकारचा समीक्षकी शब्दबंबाळपणा वा आव न आणता आकलन मांडले जाते‌. पण पी. विठ्ठल कवितेचा अन्वयार्थ लावताना स्वत: कवी व उत्तम अभ्यासक असूनही कवितेच्या निर्मिती प्रक्रियेच्या खोल तळाशी वाचकांना घेऊन जात नाहीत. तद्वतच कवितांविषयीची सार्वत्रिक अशी काही विधाने वगळता, ते मध्यम मार्गाचा स्वीकार करुन परिदृश्याची मांडणी करतात. असे असले तरी समकालीन कवितेतील परिदृश्यात अंतर्भूत असलेले प्रातिनिधिक कवी हे वर्तमानातील महत्त्वाचे कवी आहेत. यापैकी बहुतेक कवी/कवितासंग्रह सातत्याने चर्चेत राहिलेले विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहेत. यामुळे अभ्यासकांना समकालीन कविता आणि कवींना समजून घेण्यासाठी हा संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतो.


> मराठी कविता : समकालीन परिदृश्य (समीक्षा)
> पी‌. विठ्ठल > मुखपृष्ठ : रवी पवार
> कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद
> पृष्ठे : ३२८, किंमत : ३५० रु.

लेखकाचा संपर्क - ९४२३७०५०८१