Home | Magazine | Madhurima | Dr Kshama Shelar writes about motherhood

आईपणाचं ओझं

डॉ. क्षमा शेलार, बेल्हा | Update - Aug 28, 2018, 12:39 AM IST

आईपण प्रत्येक स्त्री जिच्या तिच्या परीनं निभवतच असते. पण तिनं कितीही केलं तरी तिच्या चुका काढायला सगळे शस्त्रं परजून तया

 • Dr Kshama Shelar writes about motherhood

  आईपण प्रत्येक स्त्री जिच्या तिच्या परीनं निभवतच असते. पण तिनं कितीही केलं तरी तिच्या चुका काढायला सगळे शस्त्रं परजून तयारच असतात. आईपणाचं खूप उदात्तीकरण केलं जातंय का? तिच्याकडून आई म्हणून केल्या जाणाऱ्या अपेक्षा तिच्यातली स्त्री गुदमरवून मारून टाकत असतील का?

  आ ज मी आनंदीची गोष्ट सांगणार आहे. आनंदीवहिनी. माझी नेहमीची पेशंट. किरकोळ तब्येत, घरात वयोवृद्ध सासूबाई, तीन मुलं, नवरा यांचं करता करता वहिनी अगदीच हल्लक झाल्या होत्या. क्लिनिकला आल्या की, फक्त संसार आणि मुलं याविषयीच बोलत. त्यांचं अवघं विश्व त्यांच्या तीन मुलांमध्ये सामावलं होतं. त्यांच्या मनातले बरेच सल त्या माझ्याकडे बोलून दाखवत. तसं फार टेन्शन घेण्याइतकं वेगळं काही नव्हतं त्यांच्याकडे. (२९ नोव्हेंबर २०१७पर्यंत तरी) त्याच घरगुती विवंचना, सासूशी पटत नसणं, मुलांचा अभ्यास, त्यांची आजारपणं आणि यातलं काहीच आपलं नसल्यासारखं वागणारा नवरा.


  दोनदोन वर्षांच्या अंतरानं झालेल्या तीन मुलांचं सगळं करण्यात त्या स्वतःला धन्य समजत असत. मोठी दोन्ही मुलं अभ्यासात भरपूर हुशार. वागणूक, संस्कार, आरोग्य सगळ्याच बाबतीत अगदी नजर लागण्याजोगी. धाकटा सुजीत मात्र थोडासा हूड. तिघांनाही सारखीच शिस्त लावूनदेखील सुजीतच्या बाबतीत फारसं चमकदार यश काही वाट्याला येत नव्हतं. सुजीत हुशार होता पण खेळात जास्त रस होता त्याला. कदाचित शहरात असता तर त्याच्या खेळाच्या आवडीला कोचिंगची जोड मिळाली असती आणि तो गुणी खेळाडू म्हणून चमकलाही असता. पण ते व्हायचं नव्हतं. वर्षं सरत होती तसा त्याचा अभ्यासातला रस कमी कमी होत गेला. हातावर टॅटू गोंदवून घेणं, मित्राची बाइक फुल स्पीडमध्ये हाकणं हे आणि असे बरेच त्याच्या पापभीरू कुटुंबाला न पचणारे उद्योग तो करीत असे.
  मोठी दोन्ही मुलं इंजीनिअरिंग व फार्मसीला गेली. सुजीतनं किमान बीएस्सी अॅग्री करून आपलं पारंपरिक शेतमालाचं दुकान चालवावं अशी आईवडलांची अपेक्षा. पण सुजीत चंचल. शिवाय त्याला त्याच्या चुकांबद्दल रागावलेलं, बोललेलं घरात सासूबाईंना चालत नसायचं.
  "बया! माझी च्चार पोरं हुती पन मी कधी पाच बोटं म्हनून लावली नाहीत. या आजकालच्या बायांना सोन्यासारख्या पोरांचं काही अाप्रूकच नाई."
  वहिनी बिचारी गप्प बसे. वहिनीचा नवरा, ज्याला दुकानदारीच्या व्यवसायामुळे सर्वजण 'शेठ' म्हणत, दुकानातून घरी आलं की, "काय गं पोरांचा अभ्यास कसा चाललाय? जेवली का पोरं?" एवढं विचारलं की त्याला बापाची इतिकर्तव्यता झाली असं वाटायचं. सुजीतचा थोडा हूडपणा सोडला तर घराची तेवढी ठरावीक चाकोरी वर्षानुवर्षं होती. त्या चाकोरीला सुरुंग लागायला सुरुवात झाली ती मोठी दोघं होस्टेलला गेल्यानंतर. त्या दोघांचा अंकुश नाहीसा झाल्यावर हे नुकतंच वयात आलेलं पोर कानात वारं गेलेल्या वासरागत करू लागलं. वहिनी बोलायची, समजवायची, कधीकधी रडायचीदेखील पण हा मात्र, 'पहिले पाढे पंचावन्न.' त्यात आपल्याला बोलल्यावर आजी आईचा राग करते या गोष्टीचाही तो गैरफायदा उचलू लागला. एकदा घर आवरत असताना वहिनीला त्याच्या वह्यापुस्तकांच्या कप्प्यात व्हाइटनरच्या तीन बाटल्या सापडल्या. वहिनीनं त्याला जाब विचारला. पण त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. 'वयात आलेल्या मुलाच्या अंगावर हात टाकू नये,' ही सासूची सांगी वहिनीनं त्या वेळी धुडकावून लावली. त्या गोष्टीमुळं तिच्या आईपणाला सतत नापास केलं गेलं. याच आईनं मोठ्या दोघांचं भविष्य उत्तम घडवलं होतं याचा जणू त्यांना विसर पडला होता.
  २८ नोव्हेंबर २०१७
  त्या दिवशी सुजीत घरी उशिरा आला. मित्रांबरोबर पिक्चरला गेलो होतो असं त्याने घरी सांगितलं होतं मात्र त्याचे डोळे तारवटलेले होते. वहिनी काय ते ओळखून अर्थातच रागावली. दुसऱ्या दिवशी वहिनीनं कोणाचंच ऐकलं नाही. झाडूनं मारलं सुजीतला. सगळ्या गल्लीनं ते पाहिलं. सुजीत बाहेर निघून गेला. वहिनी बेफाम झाल्यासारखी 'परत तोंड दाखवू नको' म्हणत त्याला अजूनही रागवत होती. तिच्या इतक्या बेफाम होण्याचं कारण कुणालाच कळलं नाही. पण गल्लीतून निघून कानोकानी जात ही बातमी गावभर झाली.
  शेवटी आईच ती. दुपारनंतर सुजीतच्या फोनवर वहिनी फोन मागून फोन लावत राहिली. फोन उचलला गेला नाही. रात्री साडेअकराच्या आसपास पुणे पोलिस स्टेशनातून फोन आला. पुण्यातल्या रेल्वे ट्रॅकवर एक बॉडी सापडली आहे. हातावर सुजीत नावाचा टॅटू आहे. ओळख पटवून बाॅडी घेऊन जा.
  नंतर...
  आक्रोश. आणि दूषणं. 'हिच्यामुळेच पोरानं डोक्यात राख घालून घेतली. हिनेच घालवलं पोराला. हीच कैदाशीण आहे.' अजूनही काय काय.
  पण २८ नोव्हेंबरच्या रात्री त्या तरुण पोरानं नशेच्या धुंदीत आईकडेच वाकड्या नजरेनं पाहायचा प्रयत्न केला होता, हे गुपित मात्र मी सोडून या समस्त बोलणाऱ्या माणसांना माहीत नाही.
  आजही वहिनीच्या विझल्या डोळ्यात घडून गेलेल्या घटनांच्या सावल्या दिसतात. आजही वहिनीचं जिवंत प्रेत उरलेल्या दोन पोरांसाठी घरात राबतंय.
  एका फसलेल्या आईपणाचा धसका घेऊन.
  आता आईपणाविषयी थोडंसं. आईपण प्रत्येक स्त्री जिच्या तिच्या परीनं निभवतच असते. पण तिनं कितीही केलं तरी तिच्या चुका काढायला सगळे शस्त्रं परजून तयारच असतात. आईपणाचं खूप उदात्तीकरण केलं जातंय का? या अपेक्षा तिच्यातली स्त्री गुदमरवून मारून टाकत असतील का?
  एखादी आई मुलाला पाळणाघरात ठेवून जात असेल तर ती मंथरा, कैकेयी, कुब्जेच्या रांगेत जाऊन बसते. करिअर आणि घर याची सांगड घालता घालता ती किती मानसिक ताणामधनं जात असेल याचा विचार कोणी करत नाही. उलट त्यात भर घालत असतात आनंदीवहिनीच्या सासूसारखे काही शहाजोग लोक. 'हिनं घरी बसून पोरांना सांभाळावं. सासू घरात नको या सुनांना. सासू घरात असती तर मुलं पाळणाघरात ठेवायची वेळच आली नसती. हिचं मुलांकडे लक्षच नाही. मुलांची महत्त्वाची वर्षं असून हिला मुलांकडून अभ्यास करून घेता येत नाही.'
  यँव आणि त्यँव.
  आईपण कितीही जबाबदारीनं निभवा, प्रत्येक आईचा पेपर वेगळा असतो, हे लक्षात ठेवायला हवं.

  - डॉ. क्षमा शेलार, बेल्हा
  shelarkshama88@gmail.com

Trending