आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकोशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यात फरक असतो. बेबी ब्लूज म्हणजे नवीन माता झालेल्या बायांची चिडचिड, विनाकारण मूड जाणे, झोप न येणे वगैरे, जे बऱ्याच वेळा आपोआप नियंत्रणात येतात. मात्र, यात आत्महत्येचे विचार किंवा बाळाला इजा करण्याचे विचार आले की, ते पोस्टपार्टम डिप्रेशन असतं. या संदर्भातलाच एक सुन्न करणारा अनुभव...


मॅडम तुम्हाला पैठणी घ्यायचीय, रंजना मला म्हणत होती.
ग्रामीण भागात पेशंट्स त्यांचं डॉक्टरप्रती असणारा आदर वा प्रेम दर्शवण्यासाठी खूप छोट्या-छोट्या, पण महत्त्वाच्या भेटी देत असतात, जसं की, कुणी ताज्या ताज्या कोथिंबिरीच्या जुड्या आणतं, कुणी बागेतली फळं, मक्याची कणसं, अळूची पानं अगदी गावठी तूपसुद्धा वानवळा म्हणून येत असतं. त्यांना त्यांच्या त्रासातून बरं करण्यासाठीची ही फीव्यतिरिक्त मिळणारी पोचपावतीच असते.
हल्ली बरेच जण म्हणतात की, फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण सुदैवाने ग्रामीण भागात अजूनही ही संज्ञा जिवंत आहे. आपण आपल्या व्यवसायात प्रामाणिक असलं तर पेशंट्सचं भरपूर प्रेम मिळतं. कधी कधी त्यांच्या घरातल्या किरकोळ मतभेदांमध्ये लक्ष घालून मांडवली करून द्यावी लागते. अशा वेळी आपण ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतोय याचा सूक्ष्मसा अभिमानच वाटतो.
तर एकंदरीत हे असं असताना जेव्हा एखादी पेशंट मला पैठणी घ्यायची गोष्ट करत असेल तर मला किती आनंद आणि अभिमान वाटायला हवा. पण रंजनाच्या केसमध्ये मला ती मुभा नव्हती. कारण ही केस होती पोस्टपार्टम डिप्रेशनची. म्हणजे प्रसूतीनंतरचे औदासिन्य. केस म्हणजे टिपिकल पोस्टपार्टम सायकाॅसिसची. बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यात थोडासा फरक आहे. बेबी ब्लूज म्हणजे नवीन मात झालेल्या बायांची चिडचिड, विनाकारण मूड जाणे, झोप न येणे वगैरे, जे बऱ्याच वेळा आपोआप नियंत्रणात येतात. मात्र, यात आत्महत्येचे विचार किंवा बाळाला इजा करण्याचे विचार आले की, ते पोस्टपार्टम डिप्रेशन आहे हे डॉक्टर्स समजून जातात. ते वेळीच लक्षात आलं नाही तर स्वभाव कायमस्वरूपी बदलू शकतो,  मानसिक विकार त्रासदायक पातळीवर जाऊ शकतो. याला पोस्टपार्टम सायकाॅसिस म्हटलं जातं.
बाळंतपणानंतर तीन महिने बाईची परिस्थिती मानसिक, शारीरिक पातळीवर अगदीच कमकुवत असते. अशा परिस्थितीत जर कुठला मानसिक धक्का बसला तर मनःस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या सायकाॅसिसचे दुष्परिणामही दूरगामी असतात.
तसंच रंजनाच्या बाबतीत झालं. (नाव बदललेलं आहे.) तिला पहिली मुलगी दीड वर्षाची आणि आताचं दुसरं गर्भारपण. बाकीच्या सर्वच नातेवाइकांना आता मुलाची अपेक्षा होती. अर्थात कुणाचा दबाव वगैरे नव्हता. वैयक्तिक रंजनालाच आता मुलगा हवा होता. त्यासाठी तिनं नवस वगैरेही बोलून ठेवले होते कुठल्या कुठल्या देवांना. नवरा सतत वेड्यात काढायचा यावरनं तिला. तीही हसून प्रतिवाद करायची.
“माझ्या सगळ्या मैत्रिणींना पहिला मुलगाच आहे. सगळ्या वर्गातल्या मुलींमध्ये फक्त मलाच पहिली मुलगी आहे.”
“अगं, मुलगामुलगी काही नसतं गं. दोघेही समान असतात,” मी समजवायला बघायचे.
“मॅडम, तुम्हाला मुलगा आहे. तुम्हाला नाही कळायचं ते...’
“बरं बाई.”
मीही हसून सोडून द्यायचे. आमच्यातल्या या हलक्याफुलक्या संवादावरनं कुणालाच असं वाटलं नसेल की, रंजनाचा हा लाडिक हट्ट कधी तरी दुराग्रहात परिवर्तित होईल म्हणून. अदृष्टाच्या पोटात खूप काही लपलेलं असतं खरंच. प्राथमिक उपचार माझ्याकडे घेतल्यानंतर तिला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे पाठवलं. तिथे तिचे उपचार सुरू होते. नवव्या महिन्याच्या सुरुवातीला रक्तदाब, वजन वगैरे तपासण्यासाठी ती माझ्याकडे आली होती. थोडीशी चिंताग्रस्त वाटत होती.
“मॅडम! मला ना असं वाटतं, डिलिव्हरी होऊच नै.”
“का गं? असं का वाटतंय तुला?”
“म्हंजे मुलगा झाला का मुलगी हा प्रश्नच यायचा नै.”
“अरे देवा! तुझ्या डोक्यात आहेच का ते खूळ अजून?”
मी परत एकदा फॅमिली डॉक्टरच्या अधिकारानं तिला प्रेमळ समज दिली. तिनंही त्या वेळी शहाण्या मुलीसारखी मान डोलावली. मात्र, माझ्या मनात पाल चुकचुकतच राहिली. ...तिच्या शेजारणीकडून नंतर कळलं की, तिला नववा महिना भरला तरी कळा आल्याच नाहीत. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रंजना सिझेरियनसाठीदेखील वेळकाढूपणा करत होती. मला मागच्या भेटीतले तिचे शब्द आठवले. मी अंदाज बांधला की, कदाचित सतत असा विचार केल्यामुळेच तिला कळा आल्या नसाव्यात, कारण मनाचा आणि शरीराचा खूप संबंध असतो. पुढे शेजारणीनं सांगितलं की, रंजनाला छान गुटगुटीत मुलगी झाली होती.
मी सहजभावानं म्हणाले, “अरे वा! छान झालं.”
“अवो म्याडम, कशाचं छान? तिला कळाया पाहिजे नं ते. सोन्यासारखं लेकरू झालंय तं या रंजीनं पाहिलंसुद्दा नै त्या पोरीकडं.”
मला धक्काच बसला. कारण काय, तर ‘दुसरीही मुलगी झाली.’ रंजनाची शेजारीण इतिवृत्तांत सांगून रंजनाला नाव ठेवत निघून गेली. मीही पुढच्या पेशंट्सकडे वळले असले तरी मेंदूचा एक कोपरा विषादानं भरून गेलेला मला लख्ख आठवतो आहे. नंतर कधी तरी माझ्या मेंदूनंच माझ्या मनाची समजूत काढली. झाली असेल नाराज थोडीशी. होईल तिची नाराजी दूर. शेवटी आई आहे ती. इतकं गोंडस लेकरू बघितल्यावर विरघळेल आपोआप. कधी तरी रोजच्या दिनचर्येत तिचा विचार स्वाभाविकपणे मागे पडत गेला. साधारण महिनाभरानंतरची गोष्ट. तिची शेजारीण फॉलोअपसाठी आली. मी स्त्रीसुलभ उत्सुकतेनं तिला रंजनाच्या बाळाबद्दल विचारलं. त्यानंतर तिनं जे सांगितलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. रंजना नाराजच होती. गप्प राहायची. बाळाला घ्यायची नाही. मोठ्या मुलीकडेही बघणं तिनं सोडून दिलं होतं. नवऱ्यानं, सासरमाहेरच्या प्रेमाच्या, अधिकाराच्या माणसांनी सांगून, समजावून पाहिलं. रंजनात फरक झाला नाही. कामापुरतं बोलणं यापलीकडे जिवंतपणाची कुठलीच खूण नाही. सगळेच काळजीत होते. आज न उद्या ठीक होईल या आशेवर जगत होते. दुर्दैवाने ही गंभीर मनःस्थिती आहे. यावर उपचारांची गरज आहे हे कुणाच्या लक्षात आलं नाही. शेतकरी कुटुंब. पाऊस झाला होता. पेरण्यांची झुम्मड उडाली होती. रोज रोज कोण थांबणार बाळंतिणीजवळ? कदाचित बाळाला कुणी घ्यायला नसलं की रंजना आपोआपच बाळाला घेईल, असा विचार करून सासूनं तिच्या मोठ्या मुलीला घेतलं आणि शेतातल्या कामांवर निघून गेली. घरात कुणी नाही बघून रंजनानं आपल्या सतरा दिवसांच्या बाळाला घरासमोरच्या बावडीत टाकून दिलं. झोळीत जुने कपडे टाकून त्या झोळीला झोका देत बसली. सासूबाई घरात आल्यानंतर 
तिला झोका देताना बघून आनंदल्या, पण तो आनंद क्षणिक ठरला. बराच वेळ बाळ रडलं नाही. रंजना किती तरी वेळ झोकाच देत होती. हसत होती. तिच्या डोळ्यात वेडाची झाक तरळली होती. या सगळ्याची शहानिशा केल्यानंतर हे अघटित लक्षात आलं होतं. पोलिसांना घाबरणारे साधेभोळे लोक ते. 
माझ्याकडे सल्ला घ्यायला आले. पुढे काय करायचं याचा सल्ला दिला खरा, पण त्यांचे घाबरलेले, भेदरलेले चेहरे...रंजनाचा मॅडम तुम्हाला पैठणी घ्यायचीय, असा उद्गार... आणि त्या दुर्दैवी नकोशीचा पाण्यात फुगून वर आलेला निष्प्राण देह किती तरी दिवस मेंदू 
कुरतडत राहिला.

बातम्या आणखी आहेत...