interview / बालभारतीने जोडाक्षरे वगळून संख्या उच्चारणाचा दुसरा पर्याय दिला आहे याबाबत बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी दिव्य मराठीशी केलेली बातचीत

संख्यावाचनाचा वाद निरर्थक, आम्ही फक्त जुन्यासोबत एक पर्याय सुचवला

जयश्री बोकील

Jun 22,2019 10:06:46 AM IST

पुणे - बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनासंबंधी आम्ही फक्त पर्याय सुचवला आहे. पारंपरिक पद्धत चुकीची ठरवलेली नाही. जुनी पद्धत आहे तशीच लागू असेल. नव्या विद्यार्थ्यांना संख्यावाचन अधिक सोपे, सुलभ वाटावे, या हेतूने पर्याय दिला आहे. या पर्यायाची शिक्षक वा विद्यार्थ्यांवर सक्ती केलेली नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ गणितज्ञ व बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी केली. संख्यावाचनासंदर्भात निर्माण झालेले वाद निरर्थक आणि तर्कविहीन आहेत, असेही त्या म्हणाल्या.


पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने दुसरीच्या संख्यावाचनासंदर्भात जोडाक्षरे वगळून संख्या उच्चारणाचा दुसरा पर्याय दिला आहे. याबाबत प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांत उलटसुलट वाद सुरू झाले आहेत. शिक्षक, तज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञांसह या वादात साहित्यिकांनीही उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’शी बोलताना डॉ. नारळीकर यांनी उपरोक्त वाद निरर्थक असल्याचे सांगितले.


गणिताशी संबंध नसणारे का बोलतात? : संख्यावाचनाचा मुद्दा हा छोटे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांच्यापुरताच मर्यादित आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही गणित हा विषय शिकवला नाही, ती मंडळीही अहमहमिकेने याविरोधात बोलत - लिहीत आहेत, हे विचित्र आहे. या सर्वांचा मूळ हेतू स्वत:चा ‘अजेंडा’ पुढे रेटणे, इतकाच दिसतो. आम्ही सुचवलेला पर्याय फक्त मराठी माध्यमातून गणित - संख्यावाचन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित आहे, हेही स्पष्ट आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता, ज्यांचा काहीही संबंध नाही, ती मंडळीही विनाकारण वाद वाढवत आहेत.

मूळ उद्देशच भरकटतो, भाषेला श्रीमंत करतोय
भाषेच्या नावाने आरडाओरडा करणाऱ्यांना मला हे विचारावेसे वाटते की, भाषेचा मूळ उद्देश काय असतो? आपल्याला अभिप्रेत आहे, ते व तसेच दुसऱ्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचवणे, हाच उद्देश असतो. गणिताचा, संख्यावाचनाचा उद्देशही हाच आहे. मला जर ३१ (एकतीस) असा अर्थ पोहोचवायचा असेल, तर तो एकतीस तसेच तीस एक असे म्हणूनही पोहोचतो. एकतीसलाच ‘तीस एक’ पर्याय सुचवला आहे. एकतीस म्हणणे चूक, असे अजिबात नाही. पर्याय सुचवून आम्ही मराठी भाषेचे कुठलेही नुकसान करत नाही, उलट मराठी अधिक श्रीमंत करत आहोत, असे मी म्हणेन.

गणित विषय हा पाश्चात्त्य पद्धतीनेच शिकवला जातो
आपण जे गणित शिकतो आणि शिकवतो, ते संपूर्णपणे पाश्चात्त्य पद्धतीनेच शिकतो व शिकवतो. आपण काही विद्यार्थ्यांना भास्कराचार्यांचे गणित शिकवत नाही. पाश्चात्त्य पद्धतीचे संख्यावाचन, गणित आपण फक्त आपल्या भाषेत (इथे मराठीत) शिकवतो आहोत. यावर आक्षेप घेणाऱ्यांची मुले कुठल्या माध्यमात शिकतात, हे त्यांना विचारायला हवे.

टीका करणाऱ्यांची ‘अनुकरणे’ सोयीस्कर
संख्यावाचनाबाबत निरर्थक वाद घालणाऱ्यांनी आपली भाषा आणि पाश्चात्त्य अनुकरण यात गोंधळ चालवला आहे. सोयीस्कर आहेत, ते सगळे बदल त्यांनी कधीपासून स्वीकारले आहेत, फक्त स्वत:चा अजेंडा पुढे करण्यासाठी ही मंडळी सोयीस्करपणे वाद वाढवत आहेत. आमची बांधिलकी फक्त विद्यार्थ्यांशी आहे. त्यांना एकापेक्षा अधिक पर्याय मिळाले, तर ते नाकारण्याचे कारण काय? उलट पर्यायातून मूळ संज्ञेचे दृढीकरण होते. समजूत पक्की होते. ज्या कोवळ्या वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण समाजाचे भविष्य पाहतो, त्यांना पर्यायांपासून विन्मुख करणे चुकीचे आहे.

X
COMMENT