आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मनमोहन सिंग यांच्या शीखविरोधी दंगलीच्या वक्तव्यावरून नवा वाद

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
इंद्रकुमार गुजराल यांच्या शंभराव्या जयंतीनिमित आयोजित समारंभात  डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर उपस्थित होते - Divya Marathi
इंद्रकुमार गुजराल यांच्या शंभराव्या जयंतीनिमित आयोजित समारंभात डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर उपस्थित होते

नवी दिल्ली - जर तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा लष्कर बोलावण्याचा सल्ला ऐकला असता तर १९८४ ची शीखविरोधी दंगल रोखता आली असती, असा दावा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी संध्याकाळी केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यानंतर गुरुवारी दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू होते.माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. मनमोहन सिंग यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यावर गुरुवारी भाजप आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कुटुंबीयांनी टीका केली आहे. भाजप नेते तथा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, लष्कर गृहमंत्री नव्हे तर पंतप्रधान आदेश देऊन बोलावतात हे डॉ. मनमोहन सिंग यांना माहीत आहे. जर त्यांना दिवंगत नरसिंह राव वाईट व्यक्ती वाटतात तर मग त्यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री का झाले? नरसिंह राव यांचे नातू एन. व्ही. सुभाष यांनी सांगितले की, राव कुटुंबाचा सदस्य म्हणून मला डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याने दु:ख झाले आहे. ते स्वीकारता येणार नाही. एखादा गृहमंत्री मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय एखादा निर्णय घेऊ शकताे का, असा सवाल त्यांनी केला आहे. शिराेमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंह बिरसा म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावरून हे सिद्ध झाले की, दंगलीला राजीव गांधी यांची फूस होती आणि त्यांनी नरसिंह राव यांना लष्कराला न बोलावण्याचे निर्देश दिले होते. तर काँग्रेस नेते के. टी. एस. तुलसी यांनी सांगितले की, मला वाटते की हे खरे आहे की, लष्कर तैनात केले गेले असते तर कत्तली रोखता आल्या असत्या. इंद्रकुमार गुजराल यांनी तत्कालीन पंतप्रधानांना लष्कर बोलावण्याचा सल्ला दिला होता. मात्र तसे झाले नाही.डॉ. मनमोहन सिंग बुधवारी म्हणाले होते की, दिल्लीत जेव्हा ८४ ची शीखविरोधी दंगल होत होती तेव्हा गुजराल गृहमंत्री नरसिंह राव यांच्याकडे गेले होते आणि त्यांना सांगितले की, स्थिती गंभीर आहे. सरकारने लवकरात लवकर लष्कर बोलावणे आवश्यक आहे. जर राव यांनी गुजराल यांच्या सल्ल्यावरून कारवाई केली असती तर १९८४ चा नरसंहार झाला नसता.शीखविरोधी दंगलीवर गृह मंत्रालयाची बैठक
 
केंद्रीय गृह मंत्रालयाने शीखविरोधी दंगलीत एफआयआर दाखल करण्यात आणि आरोपपत्र दाखल करण्यात झालेला गोंधळ व उशीर यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी एक बैठक घेतली. यात   दिल्लीतील नांगलोई पोलिस ठाण्यात दाखल दोन एफआयआरमधील गोंधळावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सीबीआय आणि इतर तपास पथकांना बोलावण्यात आले होते. या एफआयआर १९८७ आणि १९९१ मध्ये दाखल करण्यात आले होते.