आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी लिपीतले दुर्मिळ शिलालेख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आंबेडकरी चळवळ एक सक्षम पर्याय म्हणून उभी आहे. लोक आपल्या  शोषणमुक्तीचा आधार आंबेडकरी चळवळीत शोधत आहेत, कुणात तरी जीव कुर्बान करून त्याच्यात मनानं गुंतण्याची प्रेरणा पुन्हा प्रबळ होऊ लागलेली आहे. अशा काळात मारोतराव भवरेंचं प्रस्तुत स्वकथन आंबेडकरी चळवळ समजून घेण्यासाठी  फार महत्वाचे ठरणार आहे...

 

पाळलेल्या पोपटाला मालक म्हणाला, मी काही कामानिमित्ताने बाहेरगावी चाललोय. संध्याकाळी परत येईल. पोपट म्हणाला, मालक त्या गावात माझे गुरु राहतात त्यांना माझा नमस्कार सांगाल. मालक म्हणतो, भेटला तर सांगेन. त्या गावात गेल्यावर मालक पोपटाच्या गुरूला नमस्कार सांगतो. हे ऐकताक्षणीच पोपटाचा गुरु मरून पडतो. घरी आल्यावर पोपटाला म्हणतो, तुझा नमस्कार सांगितला आणि तुझा मालक मरून पडला. असला कसला गुरु तुझा.  हे ऐकून पिंजऱ्यातील पोपटही मरून पडतो. पण मरताना, तो मालकाला एक गोष्ट सांगून जातो.  मालक तुम्हाला समजलं नाही, पण तुमच्याकडून माझ्या गुरूने मला एक संदेश पाठवला. आणि तो संदेश असा आहे की, "ज्याला स्वातंत्र्य हवे असेल, त्याला मरायलाही जमलं पाहिजे.’

 

ज्या काळात आमच्या आंबेडकरी प्रेरणा बधीर झाल्यात, अशा काळात  ही गोष्ट सांगण्याचं  कारण असे की,  १९५६ आम्ही एका तुरुंगातून बाहेर पडलो. आम्ही स्वतंत्र झालो त्यानंतर मात्र  मरायला आपण कधीही एकत्र आलो नाही. बाबासाहेब आंबेडकरांना एवढी मोठी क्रांती का करता आली, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण हे होतं की, त्या काळामध्ये लोक बाबासाहेबांसाठी काहीही करायला आणि वेळप्रसंगी मरायलाही तयार होते. बाबासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ज्यांची नोंद इतिहासाने घेतली, त्यांच्यापैकीच एक होते, मारोतराव भवरे.

 

‘संगराच्या पायवाटा’ हे त्यांचे आत्मकथन पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. २८८ पृष्ठांच्या या आत्मकथनातून आंबेडकरी चळवळीचे अज्ञात रूप अतिशय प्रभावीपणे समोर आले आहे. नवबौद्ध झालेल्या समुहाला आंबेडकर हे सर्वश्रेष्ठ संबोधन लागू होण्यापूर्वी. हा समाज अत्यंत धार्मिक वृत्तीने जगणारा आणि सर्वार्थानं नागवला गेलेला समूह होता. या समूहाला ही धार्मिकता विघातक असूनही सहन करण्याशिवाय तरणोपाय नव्हता. परंतु, सहनशीलतेला एक मर्यादा असते. जिथे सहनशीलतेची मर्यादा संपते, तिथूनच क्रांतीचा उदय होत असतो, असे म्हणतात ते काही खोटे नाही. हे आत्मकथन सहनशीलता आणि क्रांती या दोघांच्या संक्रमण काळामधला मौल्यवान खजिना आहे. भारतीय समाजातील  बहिष्कृत नायक प्रबुद्ध मानवाकडे कसा वाटचाल करतोय, परिवर्तनाचा केंद्रबिंदू कसा बनतोय, हे सांगणारे आत्मकथन म्हणजे ‘संगराच्या पायवाटा.’

 

ही अत्यंत महत्वाची कलाकृती आहे. दृश्य भाषेचा अत्यंत सशक्त वापर आणि मूल्यात्मक सामाजिक भान जागवत आंबेडकरी काळाचे जिवंत चित्र डोळ्यासमोर उभे करण्यात ही कलाकृती यशस्वी ठरली आहे. वाचताना हे स्वकथन अगदी सहज मला माझ्या परिसरात घेऊन जाते. एवढंच नव्हे, तर आंबेडकरी चळवळ आणि चळवळीचे परिमाण काय असावे याचे दिग्दर्शनही करते. चळवळीचे साहित्यशास्त्र, हा केवळ सैद्धांतिक तत्वज्ञानाचा विषय नाही अशा सिद्धांताची गर्भधारणा कुठल्यातरी कलाकृतीतच होत असते. कलाकृती वाचताना या गर्भीत अर्थापर्यंत आपण सहज  पोहचतो. हे स्वकथन चळवळीच्या साहित्यशास्त्राला कवेत घेते. साध्या भाषेत समजावूनही सांगते. केवळ वाङ्मयीनच नव्हे तर भाषिक ताकद काय असते, याचे दर्शनही घडवते.  

 

या स्वकथनात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, दुःखाचे भांडवल नाही. अतिशय संयमित आणि शांतपणाने बिघडलेल्या परिस्थितीला दुरुस्त कसे करता येईल, याचे दिशादर्शन म्हणजे प्रस्तुत आत्मकथन आहे. हेच या आत्मकथनाचे सामर्थ्य आहे. चळवळीच्या संदर्भात असंख्य अनुत्तरित घटना आणि प्रसंग मारोतराव भवरे यांनी आत्मकथनाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षामध्ये जी गटबाजी झाली, त्याची असंख्य कारणे आपल्याला माहिती असतात, परंतु रिपब्लिकन पक्ष हा सोमस जातीचा पक्ष आहे, पक्षावर खरा हक्क सोमस जातीचा आहे. सगळे पदाधिकारी सोमस असावेत, बाकीच्या महारांनी त्यांच्या मागे राहून काम करावे, असा घाणेरडा प्रचार करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. त्यात कोणते नेते होते आणि त्यांनी अशी बेईमाई का केली, याचाही सूक्ष्मलक्षी अभ्यास झाला पाहिजे, असे सातत्याने वाटत राहते. एका अर्थाने हे स्वकथन प्रश्नांच्या मुळालाच स्पर्श करते. दुर्दैवाने, आपण आंबेडकरी चळवळीच्या फुटिरतावादाची  सूक्ष्मलक्षी चिकित्सा करत नसल्यामुळे आपल्याला चळवळीचे नेमकं भान येत नाही. हे मूळ समजून घ्यायचे असेल, तर ‘संगराच्या पायवाटा’ हे स्वकथन वाचायलाच हवे.

 

आंबेडकरांचे नाव घेऊन रिपब्लिकन पक्षाची नेतेगिरी  दाखवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत सुखी आणि आनंदी जीवन जगणारे लोक मारोतराव भवरे, यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. तत्वे आणि विचारांची जोपासना करण्यासाठी पक्षाचे काम करत असताना अनेक हाल-अपेष्टांना त्यांना तोंड द्यावे लागले. चटणी-भाकर खाऊन दिवस काढावे लागले, कधी उपाशीही राहिले. पण स्वार्थ जागा होऊ दिला नाही. भ्रष्ट राजकारण केलं नाही, रिपब्लिकन पक्षाची कधी बेईमानी केली नाही. चळवळीत काम करताना आंबेडकरी आचारसंहिता आणि विचारसंहिता काय असावी, याचं नेमकं भान दिलं हे वाचक म्हणून मान्य करावेच लागते. हे मारोतराव भवरे यांचं जगणं  रिपब्लिकन पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मार्गदर्शक म्हणून नक्कीच मोलाचे ठरेल.

 

जो बाबासाहेबांचा उपदेश पाळत नाही. अन्यायाविरुद्ध बंड करत नाही, आपल्याच लोकांची फसवणूक करतो, स्वाभिमान गहाण ठेवून इतरांचे पाय धुण्यात धन्यता मानतो, अशा लोकांना त्या काळात ‘घमड्या’ म्हणून संबोधले जायचे. मारोतरावांनी अशा घमड्यांवर  टीकेची झोड उठवली. त्यांना आपल्यामध्ये घेऊ नका, त्यांना लग्नात सहभागी करू नका, त्यांच्यावर बहिष्कार टाका, असे भाषणातून त्यांनी ठणकावून सांगितले. तेव्हा घमडे घाबरले आणि मग हळूहळू नीच कामे सोडून स्वाभिमानाने जगायला लागले. हा प्रसंग फार मजेशीर आहे,तो  वाचला की मग वर्तमान काळातील घमडे आपल्या डोळ्यासमोर येतात. हे मारोतराव भवरे यांचे मोठे सामर्थ्य आहे.

 

दृश्यभाषेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या स्वकथनाकडे पाहावे लागेल. शब्दचमत्कृतीच्या जोरावर प्रसंग जिवंत करण्याची त्यांची क्षमता अमर्याद आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिल्यानंतरचे वर्णन तर मोठे विलोभनीय आहे. शब्दांच्या माध्यमातून काळाला  जिवंत करणारे मारोतराव भवरे बाबासाहेबांच्या मृत्यूसंबंधी लिहितात, ते शब्द मनाला चटका लावून जातात.  डोळ्यासमोर हुबेहूब तो प्रसंग तरळून जातो.

 

ही साहित्यकृती जीवनातील अनुभव तीव्र स्वरूपात जसेच्या तसे मांडत असली, तरी तिला एक कलात्मक रूप आहे. ही कलाकृती व्यवस्थेला प्रश्न उपस्थित करत दुःखाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. वाचक म्हणून आपल्या मनात प्रश्न निर्माण करते. जसे की, आशयसूत्र सामान्य कार्यकर्त्यांच्या भोवती का फिरते? समाजातील नासकी प्रवृत्ती का उघड करते? दलितांच्या जीवनातील ससेहोलपट का दाखवते? त्यातील व्यक्तिरेखा राजकारणाऐवजी सामाजिकीकरणात गुंतून का पडतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेखकाच्या मूल्यात्मक असणाऱ्या दृष्टिकोनात आढळतात आणि या दृष्टिकोनातूनच ही कलाकृती अधिक अर्थसघन बनत जाते.

 

आपल्या कार्यात आपली पत्नी समाधानी आहे, ही प्रचंड अभिमानाची बाब मारोतरावांना सुखावून जाते. आई-वडील, मुले, सुना, नातवंडे याची काळजी फक्त तिलाच असायची ही प्रांजळ भावना त्यामुळेच शब्दबद्ध होते. मात्र पत्नीच्या मृत्यूचं वर्णन करताना भावनाविवश होऊन हतबल झालेले मारोतराव भवरे इथेच भेटतात. उदा.पोटाच्या आजाराने पत्नी त्रस्त असायची, तेव्हा तिची तडफड पाहावत नसायची, प्राण कासावीस व्हायचा. तेव्हा ती म्हणायची, "मला एंड्रिल द्या, मी तुमच्या पाया पडते. मला एंड्रिल द्या, मी कुणालाही सांगणार नाही.’ पावसाळी दिवस असल्यामुळे एसटी बंद असायची, त्यामुळे तिला बैलगाडीने दवाखान्यात घेऊन गेलो. प्रकृती खालावत गेली, याचं तिला वाईट वाटत नव्हतं. आपला मुलगा महेंद्र आपल्याजवळ नाही, ही खंत तिला खात होती. सारखं महेंद्र… महेंद्र म्हणत होती.  तळमळत होती आणि अशा अवस्थेत तिने जगाचा निरोप घेतला.’ एका अर्थाने ही विषण्ण करणारी सुखात्मिकाही आहे. 

 

सवर्णांना सन्मान असतो, अस्पृश्यांना सोबती नसतात. हा जगाचा नियम फाट्यावर मारून एक कंगाल, पण मनाने संवेदनशील असलेला अवलिया मारोतराव भवरे यांनी विजयाचा अर्थ तर लावलाच, पण पराभवाचा अन्वयार्थ लावण्याचाही प्रयत्न केला. हे त्यांचे सकारात्मक चिंतन त्यांच्या व्यक्तित्वाची नवी ओळख आपल्याला करून देते. आपला जन्म सवर्ण म्हणून झाला नाही, ही खंत न बाळगता तिचं सामर्थ्यामध्ये रूपांतर करून अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला परिवर्तनाचा विचार देण्यासाठी, हा माणूस अखंड लढला आणि आंबेडकरी अस्मितेचा शिलालेख झाला.

 

दलित साहित्यातल्या वेदना, विद्रोह, नकार  ही कालची सूत्रे होती. नकाराने विधायकतेला आत्मसात केले नाही, तर विज्ञान जन्माला येणार नाही, विद्रोह एक फेज असते, त्यानंतर नवे रचण्याचा, घडविण्याचा सोस पुढे यायला हवा. हे नामदेव ढसाळांचे विधान या कलाकृतीला लावले, तर एका अर्थाने ही कलाकृती दलित साहित्याचे विज्ञानच म्हणावे लागेल...

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या(औरंगाबाद) मराठी विभागातले पोस्ट डॉक्टरल रिसर्चर  आहेत.)


डॉ. मनोज मुनेश्वर
manojbamu@gmail.com
संपर्क : ८८३०६५२६०८

बातम्या आणखी आहेत...