आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅड. पुनाळेकरांनीच दिला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला : सीबीआय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील हल्लेखाेर शरद कळसकर याला अॅड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अणदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधात बुधवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात १३ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला अॅड. पुनाळेकर यांनी दिला. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली. हत्या केल्यानंतर तेथून कसे फरार व्हायचे याबाबत कळसकर आणि अणदुरे यांना मार्गदर्शन केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून स्पष्ट केले आहे. कळसकर याने दुसऱ्या प्रकरणाच्या तपासात दिलेल्या कबुलीजबाबावरून अॅड. पुनाळेकर आणि भावे यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. अॅड. पुनाळेकर यांना जामीन देण्यात आला आहे, तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली तेव्हा चाचणीत मी आणि साथीदार अणदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने सीबीआय दिली होती.

आजवरचे तिसरे दाेषाराेपपत्र

३ सप्टेंबर २०१६ रोजी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व त्यानंतर १९ फेब्रुवारी २०१९ रोजी शरद कळसकर व सचिन अणदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयचे तपास अधिकारी आर. आर. सिंग आणि विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात दाखल केलेले हे तिसरे दोषारोपपत्र आहे. भावे होता पुनाळेकर यांचा सहायक 
 
विक्रम भावे हा अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयात सहायक म्हणून नोकरीस होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शूटर शरद कळसकर याला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी जेव्हा कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती, तेव्हा कळसकरच्या नोंदवलेल्या जबाबात त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनीच दिला असल्याचे म्हटले होते. त्या प्रकरणात पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक झाली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याने रेकी केली होती. त्यामुळे भावे याला अटक झाली होती. यामध्ये पुनाळेकर यांना यापूर्वीच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर नुकताच भावेच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.