Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Dr Nilesh Patil and Dr Renuka From Bhusawal Love Story on Valentine Day 14 Feb

प्रेमबंधातून मराठी अन् तामिळ संस्कृतीचा मिलाफ, भाषा अन् प्रांत प्रेमात अडसर ठरत नाही, डॉ.नीलेश व डॉ.रेणुका यांनी केले सिद्ध

हेमंत जोशी | Update - Feb 14, 2019, 03:36 PM IST

प्रेमाला भाषावादच काय कोणताही अडसर नसतो, याचे उदाहरण भुसावळात पहायला मिळते.

  • Dr Nilesh Patil and Dr Renuka From Bhusawal Love Story on Valentine Day 14 Feb

    भुसावळ- मुंबईतील जे.जे. हास्पिटलमध्ये फेलोशिप करताना भुसावळातील डॉ.नीलेश पाटील व तामिळनाडूतील पंड्यानाडू विभागातील तुतूकुरीन जिल्ह्यातील कोथाली येथील डॉ.रेणुका पेचीमुथ्थू यांचा प्रेमविवाह झाला. हे दाम्पत्य आता वरणगावातील वासुदेव नेत्रालयातून नेत्र रुग्णांना सेवा देत आहे. तामिळ आणि खान्देशी या संस्कृतीचा मिलाप झाल्याने डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी मराठी नववर्ष गुढीपाडव्याप्रमाणेच तामिळी सण पोंगलही तेवढ्याच जल्लोषाने साजरा केला जातो.

    प्रेमाला भाषावादच काय कोणताही अडसर नसतो, याचे उदाहरण भुसावळात पहायला मिळते. डॉ.नीलेश हे मुंबईला जे.जे.हॉस्पिटलमध्ये फेलोशिप करत होते. तेथे तामिळनाडूतील डॉ.रेणुका यांच्यासोबत ओळख आणि पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर डॉ. नीलेश यांनी १४ ऑगस्ट २००७ रोजी रेणुका यांच्याकडे प्रेम व्यक्त करत लग्नाचा प्रस्ताव दिला. करिअरचा विचार करता शिक्षणानंतर भुसावळात हॉस्पिटल टाकणार असल्याचे स्पष्ट सांगितले. डॉ.रेणुका यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. तरीही दोन भिन्न भाषा, दोन वेगळ्या संस्कृती-प्रांताचा मिलाफ होणार कसा? हा प्रश्न होताच. इकडे डॉ.पाटील यांच्या आई-वडिलांनी होकार भरला असला तरी, डॉ.रेणुका यांचे आई-वडील तयार होईनात. विशेष म्हणजे आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करायचे नाही, असा दोघांचा निश्चय होता. मात्र, मुलांचा आनंद आणि प्रेमापुढे आई-वडिलांनी हट्ट बाजूला करत या विवाहास संमती दिली. यानंतर १४ जुलै २०१३ रोजी चेंबूर (मुंबई) येथे दाक्षिणात्य पद्धतीने दोघे विवाह बंधनात अडकले. भुसावळातील गणेश कॉलनील एकत्र कुटूंब पद्धतीने दोघांचा संसार सुरू झाला. या पाटील दाम्पत्याकडे आता तामिळ व खान्देशी या दोन्ही संस्कृतींचा मिलाप झाला आहे. तेथे मराठी नववर्ष गुढीपाडव्यासोबतच तामिळनाडूतील पोंगल हा सण देखील उत्साहात साजरा होतो.

    बहुभाषिक खाद्यसंकृती बहरली, मुलगा दोन्ही भाषेत साधतो संवाद
    डॉ. रेणुका आता शुद्ध मराठी आणि खान्देशी लेवा-पाटीदार भाषाही चांगल्या पद्धतीने बोलण्यास शिकल्या. डॉ. पाटील मात्र तामिळी शिकले नाहीत. त्यांच्या घरात आता खान्देशी विशेष करुन भुसावळ विभागात प्रसिद्ध असलेली वरण-बट्टी, वांग्याची भाजी व वांग्याचे भरित ज्या पद्धतीने आवडीने खाल्ले जाते, त्याच पद्धतीने दाक्षिणात्य उत्तप्पा-डोसा, इडली व अन्य पदार्थ आवडीने खाल्ले जातात. डॉ. नीलेश व डॉ.रेणुका यांच्या प्रेम विवाहानंतर त्यांच्या संसार वेलीवर दोन गोंडस फुले उमलली. मोठा मुलगा वेदांत पाच, तर लहान मुलगा दुर्वांग एक वर्षाचा आहे. वेदांत मराठी भाषेप्रमाणे तामिळी भाषाही सुस्पष्टपणे बोलतो. आजोळच्या नातेवाईकांशी तो तामिळमध्ये, तर घरात शुद्ध मराठीत बोलतो.

Trending