आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकांची भीती कशाला?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रश्न : मला कोणताही निर्णय घेणे खूप कठीण जाते. खूप गोंधळ होतो आपण चुकू अशी भीती वाटते म्हणून अनेकांचा सल्ला घेतो, पण त्याने गोंधळ अजूनच वाढतो. काय करू म्हणजे निर्णय घेणे सोपे जाईल? 
– अमित के. 

> उत्तर -  अमित, तुमच्या समस्येबद्दल तुम्ही फार संक्षिप्त लिहलं आहे. थोडं सविस्तर लिहिले असते तर नेमकं कारण लक्षात येऊ शकले असते. हरकत नाही. भीती ही माणसाला नेहमी कृती करण्यापासून लांब ओढत असते. आपण चुकू नये हा अवास्तव विचार आहे.(इररशनल विचार) आहे. चुकांची इतकी भीती कशाला? प्रत्येक माणूस चुका करतो आणि त्यातून शिकत असतो. कृती करायची असेल तर निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घ्यायचा असेल तर जोखीम पत्करावी लागणार आहे. 

 

एखाद्या घटनेकडे, समस्येकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या जागी राहून आपल्या क्षमतेनुसार, अनुभवानुसार सल्ला देत असतात तो आपल्याला लागू पडेलच असे नसते आणि एखाद्या व्यक्तीने दिलेला सल्ला बरोबरच असेल हे कशावरून? त्यापेक्षा आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेतली तर चुकण्याची भीती वाटणार नाही आणि स्वतः निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून आत्मविश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढला की चुकांची भीती वाटणार नाही. आव्हाने स्वीकारण्यात मजा वाटायला लागेल.नकारात्मक विचार गळून पडतील.


सुरुवात छोटे छोटे निर्णय घेण्यापासून करा. सर्वप्रथम निर्णय घेतांना त्याबाबत सकारात्मक आणि नकारात्मक दिसणाऱ्या सर्व पैलूंचा विचार करा. कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे शोधा. आपल्या क्षमतेनुसार कोणता पर्याय जास्त लाभदायी आणि उपयुक्त आहे त्याची निवड करा. खूप आनंदी किंवा खूप दु:खी असतांना निर्णय घेणे टाळा.  इतरांच्या दबावाला बळी पडण्यापेक्षा स्वतःच्या मतावर ठाम रहा. एखादं निर्णय चुकला असे वाटले तरी त्यामुळे नाराज होवू नका त्यातून शिका. चुकांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी काय करावे हे त्यातून शिकता येईल. बऱ्याचदा निर्णय घेणं अवघड असते, संभ्रम निर्माण होवू शकतात पण त्यात आलेली निराशा दूर करून तुम्ही कसा निर्णय घेतला हे तुमच्या डायरीत नोंदवून ठेवू शकता. त्यातूनही आत्मविश्वास वाढेल.  


(व्यक्तीपरत्वे समस्या बदलते. अनेक समस्यांना सोडवण्याच्या नादात त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. ताण वाढतो. कुणाशी बोलता येत नाही. प्रश्न तर पिच्छा सोडायला तयार नसतात. आणि म्हणूनच मधुरिमा तुमच्यासाठी घेऊन आले आहे हे हक्काचं व्यासपीठ. इथं तुमच्या समस्यांवर मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून बोललं जाईल.  त्याची उकल केली जाईल. या सदरात मनातले प्रश्न, समस्या थोडक्यात सांगा. v.nishigandha@gmail.com वर तुम्ही तुमचे प्रश्न/ समस्या पाठवू शकता. )

बातम्या आणखी आहेत...